YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 12

12
उपासनेसाठी नेमलेले स्थळ
1जो देश तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला वतन म्हणून दिला आहे त्यात तुम्ही ह्या भूलोकी जिवंत राहाल तोपर्यंत हे विधी व हे नियम काळजीपूर्वक पाळावेत.
2जी राष्ट्रे तुम्ही ताब्यात घ्याल, त्यांतले लोक ज्या ज्या ठिकाणी, उंच डोंगरांवर, टेकड्यांवर आणि हरतर्‍हेच्या हिरव्या वृक्षांखाली आपापल्या देवांची सेवा करीत असतील त्या सर्व ठिकाणांचा अवश्य विध्वंस करा;
3त्यांच्या सर्व वेद्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ फोडून टाका, त्यांच्या अशेरा मूर्ती अग्नीत जाळून टाका; त्यांच्या देवांच्या कोरीव मूर्ती फोडून तोडून टाका, त्या ठिकाणातून त्यांची नावनिशाणी नाहीशी करा.
4तुमचा देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तसे करू नका.
5पण तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाची स्थापना करण्यासाठी तुमच्या सर्व वंशांच्या वतनातून जे स्थान निवडून घेईल तेथे त्याच्या निवासस्थानी तुम्ही त्याला शरण जा व तेथेच जात जा;
6आणि तेथेच तुम्ही आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करायची अर्पणे, नवसाची अर्पणे, स्वसंतोषाची अर्पणे आणि आपल्या गुराढोरांचे व शेरडामेंढरांचे प्रथमवत्स आणावेत;
7तेथे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर भोजन करावे आणि ज्या ज्या कामात तुम्ही हात घातला व ज्यात तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला यश दिले त्या सर्वांबद्दल तुम्ही व तुमच्या घरच्या माणसांनी आनंद करावा.
8आज येथे आपण प्रत्येक जण स्वत:च्या दृष्टीला योग्य दिसेल ते करीत आहोत तसे तेथे करू नका;
9कारण जो विसावा व जे वतन तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देत आहे तेथे तुम्ही अद्याप पोहचला नाही.
10पण जेव्हा तुम्ही यार्देन उतरून तुमचा देव परमेश्वर तुम्हांला जो देश वतन करून देत आहे त्या देशात वस्ती कराल, आणि जेव्हा तुमच्या चोहोकडल्या सर्व शत्रूंपासून त्याने तुम्हांला विसावा दिल्यामुळे तुम्ही निर्भय राहाल,
11तेव्हा जे स्थळ तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडील तेथेच मी तुम्हांला सांगतो त्या सगळ्या वस्तू आणा : आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करायची अर्पणे आणि तुम्ही परमेश्वराला कराल ते सर्व विशिष्ट नवस.
12तेथे तुम्ही आपले मुलगे व मुली, दास व दासी ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद करावा; तुमच्या वेशींच्या आत राहणार्‍या लेव्यासहित आनंद करावा, कारण तुमच्याबरोबर त्याला काही वाटा किंवा वतन नाही.
13दिसेल त्या भलत्याच ठिकाणी आपले होमबली अर्पण न करण्याची सावधगिरी ठेव;
14पण तुझ्या एखाद्या वंशाच्या वतनात जे स्थान परमेश्वर निवडील तेथेच तू आपले होमबली अर्पावेत आणि ज्या ज्या गोष्टींविषयी मी तुला आज्ञा करीत आहे त्या सर्व तेथेच कराव्यात.
15तरीसुद्धा आपल्या वेशीच्या आत तुला वाटेल त्याप्रमाणे आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला बरकत दिल्याप्रमाणे पशू मारून खा; त्यांचे मांस, हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे, कोणाही माणसाने खावे; मग तो अशुद्ध असो वा शुद्ध असो.
16त्याचे रक्त मात्र सेवन करू नये, पाण्याप्रमाणे ते जमिनीवर टाकून द्यावे.
17आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा दशमांश, आपली गुरेढोरे अथवा शेरडेमेढरे ह्यांचे प्रथमवत्स, नवसफेडीची वस्तू अथवा स्वसंतोषाची अर्पणे व स्वहस्ते समर्पित करायचे आपले अर्पण ही आपल्या वेशीच्या आत तुम्ही खाऊ नयेत;
18पण तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे तुझा देव परमेश्वर ह्याच्यासमोर खा; तू आपला मुलगा व मुलगी, आपले दास व दासी व आपल्या वेशीच्या आत असलेला लेवी ह्यांच्याबरोबर ती खा; आणि जे जे काम तू हाती घेशील त्या सर्वांबद्दल तुझा देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद कर.
19तू आपल्या देशात राहशील तोपर्यंत तू लेव्याला सोडता कामा नये, हे लक्षात ठेव.
20तुझा देव परमेश्वर ह्याने आपल्या वचनानुसार तुझ्या देशाची मर्यादा वाढवल्यावर मांसावर तुझे मन जाऊन तुला ते खावेसे वाटले तर तू ते मनसोक्त खावेस.
21जे स्थान तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या स्थापनेसाठी निवडील ते तुझ्यापासून फार दूर असले तर जी गुरेढोरे व शेरडेमेंढरे परमेश्वराने तुला दिली असतील त्यांपैकी तुला वाटेल ते माझ्या आज्ञेप्रमाणे मारून आपल्या वेशीच्या आत आपल्या इच्छेस येईल त्याप्रमाणे तू खावेस.
22त्यांचे मांस, हरिण अथवा सांबर ह्यांचे मांस खातात त्याप्रमाणे खावे; शुद्ध माणसाने व अशुद्ध माणसानेही ते खावे.
23त्याचे रक्त मात्र मुळीच सेवन करू नये, हे लक्षात ठेव; कारण रक्त हे जीवन होय; म्हणून मांसाबरोबर जीवन खाऊ नये;
24ते सेवन करू नये; पाण्याप्रमाणे ते जमिनीवर ओतून द्यावे.
25परमेश्वराच्या दृष्टीने जे यथार्थ ते तू केल्याने तुझे व तुमच्या पश्‍चात तुझ्या संततीचे कल्याण व्हावे म्हणून ते सेवन करू नये.
26पण तुझ्याजवळच्या पवित्र वस्तू आणि तुझे नवस हे घेऊन परमेश्वर निवडील त्या स्थानी तू जावेस,
27आणि तेथे आपले होमबली, म्हणजे मांस व रक्त, आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीवर अर्पावेस. आपल्या यज्ञांचे रक्त आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीवर ओतावेस आणि मग त्यांचे मांस तू खावेस.
28तुझा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे चांगले व योग्य ते तू केल्याने तुझे व तुझ्या पश्‍चात तुझ्या संततीचे निरंतर कल्याण व्हावे म्हणून ज्या आज्ञा मी तुला करीत आहे त्या लक्षपूर्वक ऐक.
मूर्तिपूजेविरुद्ध ताकीद
29ज्या राष्ट्रांचा ताबा घेण्यास तू जात आहेस त्यांचा पाडाव तुझा देव परमेश्वर तुझ्यासमोर करील व तू ती ताब्यात घेऊन तेथे वस्ती करशील;
30तेव्हा सांभाळ, नाहीतर तुझ्यासमोर त्यांचा पाडाव झाल्यावर तुला त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल आणि ही राष्ट्रे आपल्या देवांची ज्या प्रकारे सेवा करीत होती तशीच आपणही करावी असे मनात आणून त्या देवांच्या नादी तू लागशील.
31आपला देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तू असे करू नकोस; कारण ज्या गोष्टींचा परमेश्वराला वीट येतो व तिरस्कार वाटतो त्या सर्व गोष्टी ते लोक आपल्या देवांच्या बाबतीत करीत आले आहेत; ते देवांप्रीत्यर्थ आपल्या मुलामुलींचादेखील होम करीत असतात.
32मी तुला आज्ञापीत आहे ती प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाळ; तिच्यात अधिकउणे काही करू नकोस.

सध्या निवडलेले:

अनुवाद 12: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन