YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 11:18-32

अनुवाद 11:18-32 MARVBSI

म्हणून तुम्ही माझी ही वचने आपल्या ध्यानीमनी साठवून ठेवा, ती चिन्हांदाखल आपल्या हातांना बांधा आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लावा. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना ती शिकवा आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा. ती आपल्या दारांच्या चौकटीवर आणि फाटकांवर लिहा. म्हणजे जो देश तुमच्या पूर्वजांना देण्याचे परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक वचन दिले होते त्यात तुम्ही व तुमची मुलेबाळे पृथ्वीच्या वर आकाश असेपर्यंत चिरायू होतील. ही जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे ती सर्व तुम्ही काळजीपूर्वक पाळाल, आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल, त्याच्या सर्व मार्गांनी चालाल आणि त्यालाच धरून राहाल, तर परमेश्वर ही सर्व राष्ट्रे तुमच्यासमोरून घालवून देईल आणि तुमच्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रांना तुम्ही आपल्या ताब्यात घ्याल. जेथे तुमचे पाऊल पडेल ते प्रत्येक स्थळ तुमचे होईल. रानापासून लबानोनापर्यंत आणि नदीपासून म्हणजे फरात नदीपासून पश्‍चिम समुद्रापर्यंत तुमच्या देशाचा विस्तार होईल. तुमच्याशी कोणी सामना करणार नाही; ज्या भूमीवर तुम्ही पाऊल टाकाल तेथल्या रहिवाशांच्या मनात तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमच्याविषयी भीती व दहशत उत्पन्न करील. पाहा, आज तुमच्यापुढे आशीर्वाद व शाप हे दोन्ही मी ठेवत आहे, म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा मी आज तुम्हांला सांगत आहे त्या तुम्ही पाळल्या तर तुम्हांला आशीर्वाद मिळेल; पण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत आणि ज्या मार्गाने जाण्याची मी आज तुम्हांला आज्ञा करीत आहे तो सोडून तुम्हांला अपरिचित अशा अन्य देवांच्या मागे तुम्ही गेलात तर तुम्हांला शाप मिळेल. जो देश ताब्यात घ्यायला तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेऊन पोहचवील तेव्हा तू गरिज्जीम डोंगरावरून आशीर्वाद आणि एबाल डोंगरावरून शाप उच्चारावास. हे डोंगर यार्देनेपलीकडे सूर्य मावळतो त्या दिशेला अराबात राहणारे कनानी ह्यांच्या प्रदेशात गिलगालासमोर, मोरे येथील एलोन वृक्षाच्या जवळ आहेत ना? जो देश तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देत आहे तो वतन करून घेण्यासाठी तुम्ही यार्देन ओलांडून जात आहात; तुम्ही तो ताब्यात घ्याल व त्यात वस्ती कराल. तेव्हा जे विधी व नियम मी आज तुम्हांला देत आहे ते सर्व काळजीपूर्वक पाळा.