मग राजा मोठ्या पहाटेस उठून त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला. तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, “हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय?” दानीएल राजाला म्हणाला, “महाराज, चिरायू असा. माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काहीएक उपद्रव केला नाही; कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो; व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही.” तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की, “दानिएलास गुहेतून बाहेर काढा.” त्याला गुहेतून बाहेर काढले तेव्हा त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरवसा होता. तेव्हा ज्या माणसांनी दानिएलावर आरोप आणला होता त्यांना राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यांना व त्यांच्या बायकामुलांना सिंहांच्या गुहेत टाकले; तेव्हा ते सिंहांच्या तडाक्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला. मग पृथ्वीवरील सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणार्या लोकांना, दारयावेश राजाने असे लिहून कळवले की, “तुमचे कल्याण असो!” मी फर्मावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे; कारण तो जिवंत देव आहे; तो सर्वकाळ जवळ आहे; त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे. ज्याने दानिएलास सिंहांच्या पंजांतून सोडवले तोच बचाव करणारा व मुक्तिदाता आहे; तो आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उत्पात घडवणारा आहे.” हा दानीएल दारयावेशाच्या कारकिर्दीत व कोरेश पारसी ह्याच्या कारकिर्दीत उत्कर्षास पोहचला.
दानीएल 6 वाचा
ऐका दानीएल 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: दानीएल 6:19-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ