YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 5:1-31

दानीएल 5:1-31 MARVBSI

बेलशस्सर राजाने आपल्या एक हजार सरदारांना मोठी मेजवानी केली; त्या हजारांसमक्ष तो द्राक्षारस प्याला. द्राक्षारसाचे सेवन करीत असता बेलशस्सराने हुकूम केला की, ‘माझा बाप नबुखद्नेस्सर ह्याने यरुशलेमेतील मंदिरातून जी सोन्यारुप्याची पात्रे आणली आहेत ती घेऊन या, म्हणजे मी, माझे सरदार, माझ्या पत्नी व उपपत्नी ह्यांना त्यांतून द्राक्षारस पिता येईल.’ तेव्हा यरुशलेमेतील देवाच्या मंदिराच्या पवित्रस्थानातून आणलेली सोन्याची पात्रे ते घेऊन आले; राजा, त्याचे सरदार, त्याच्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली. त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने. रुपे, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांपासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले. त्याच घटकेस मानवी हाताची बोटे प्रकट झाली व त्यांनी दीपवृक्षासमोर राजवाड्याच्या भिंतींच्या गिलाव्यावर काही लिहिले आणि हाताची बोटे लिहीत होती ती राज्याच्या दृष्टीस पडली. तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला; त्याच्या कंबरेचे सांधे ढिले पडले, आणि त्याचे गुडघे लटपटू लागले. राजाने मोठ्याने ओरडून म्हटले की, “मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ ह्यांना घेऊन या.” राजा त्या बाबेलच्या ज्ञान्यांस म्हणाला, “जो कोणी हा लेख वाचील व ह्याचा अर्थ मला सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल व तो राज्यातील तिघा अधिपतींतला एक होईल.” मग राजाचे सर्व ज्ञानी पुरुष वाड्यात आले; पण त्यांना तो लेख वाचता येईना व त्याचा अर्थ राजाला सांगता येईना. तेव्हा बेलशस्सर राजा फार चिंताक्रांत झाला, त्याची मुद्रा पालटली आणि त्याचे सरदार घाबरले. राजा व त्याचे सरदार ह्यांचे शब्द ऐकून राणी भोजनगृहात आली. ती म्हणाली, “महाराज, चिरायू असा; आपल्या मनाची तळमळ होऊ देऊ नका; आपण आपली मुद्रा पालटू देऊ नका. पवित्र देवांचा आत्मा ज्यात आहे असा एक पुरुष आपल्या राज्यात आहे; आपल्या बापाच्या कारकिर्दीत प्रकाश, विवेक व देवांच्या ज्ञानासारखे ज्ञान ही त्याच्या ठायी दिसून आली; महाराज, आपला बाप नबुखद्नेस्सर राजा ह्यांनी त्याला ज्योतिषी, मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ ह्यांचा अध्यक्ष नेमले होते; कारण उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नांचा अर्थ सांगणे, कूट प्रश्‍न उलगडणे, कोडी उकलणे, ह्यासंबंधाने ज्याला राजाने बेल्टशस्सर असे नाव दिले होते तो दानीएल प्रवीण होता असे दिसून आले; तर आता दानिएलास बोलावून आणा म्हणजे तो अर्थ सांगेल.” तेव्हा दानिएलास राजापुढे आणले. राजा त्याला म्हणाला, “माझा बाप, जो राजा, त्याने यहूदातून पकडून आणलेल्या लोकांपैकी दानीएल तो तूच काय? मी तुझ्याविषयी ऐकले आहे की देवांचा आत्मा तुझ्या ठायी आहे आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान ही तुझ्या ठायी दिसून आली आहेत. आता हा लेख वाचून त्याचा अर्थ मला सांगावा म्हणून हे ज्ञानी व मांत्रिक लोक माझ्यापुढे आणले, पण त्याचा अर्थ त्यांना सांगता येईना. मी तुझ्याविषयी ऐकले आहे की, तुला स्वप्नांचा अर्थ सांगता येतो व कोडी उकलता येतात; आता तुला हा लेख वाचता येऊन त्याचा अर्थ मला सांगता आला तर तुला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, तुझ्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल आणि तू राज्यातील तिघा अधिपतींतला एक होशील.” तेव्हा दानिएलाने राजास उत्तर दिले की, “तुझ्या देणग्या तुझ्याजवळच राहू दे, तुझी इनामे दुसर्‍या कोणास दे, तथापि मी हा लेख राजाला वाचून दाखवतो व त्याचा अर्थ करून तुला सांगतो. हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सर ह्याला राज्य, महत्त्व, वैभव व महिमा ही दिली. त्याने त्याला मोठेपणा दिला म्हणून सर्व लोक, सर्व राष्ट्रांचे व सर्व भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत व त्याला भीत; वाटेल त्याला तो ठार मारी व वाटेल त्याला जिवंत राखी; वाटेल त्याला तो थोर करी व वाटेल त्याला तो नीच करी. पुढे त्याच्या हृदयात ताठा शिरला, व त्याचा आत्मा कठोर होऊन उन्मत्त झाला तेव्हा त्याला त्याच्या राजपदावरून काढण्यात आले व त्याचे वैभव हिरावून घेण्यात आले. त्याला मनुष्यांतून घालवून देण्यात आले; त्याचे हृदय पशूंसारखे झाले; तो रानगाढवांमध्ये वस्ती करू लागला; तो बैलाप्रमाणे गवत खाई व त्याचे शरीर आकाशातील दहिवराने भिजत असे. मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो त्यावर पाहिजे त्याला स्थापतो, असे ज्ञान त्याला होईपर्यंत तो असा राहिला. हे बेलशस्सरा, तू त्याचा पुत्र आहेस. हे सर्व तुला ठाऊक असून तू आपले मन नम्र केले नाहीस; तर स्वर्गीच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केलास; त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्यापुढे आणली आहेत; तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली आहेत आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस; पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाहीस; म्हणून त्याने ती हाताची बोटे पाठवली व हा लेख लिहिला. हा लिहिलेला लेख असा : मने, मने, तकेल, ऊफारसीन. ह्याचा अर्थ असा : मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला आहे. तकेल म्हणजे तुला तागडीत तोलले व तू उणा भरलास. परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी ह्यांना दिले आहे.” तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केल्यावरून त्यांनी दानिएलास जांभळ्या रंगाचा पोशाख लेववला. त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घातला व त्याच्यासंबंधाने सर्वत्र द्वाही फिरवली की हा राज्यातील तिघा अधिपतींतला एक आहे. त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर ह्याचा वध झाला. आणि दारयावेश मेदी हा सुमारे बासष्ट वर्षांचा असता राजपदारूढ झाला.