YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 4:1-9

दानीएल 4:1-9 MARVBSI

नबुखद्नेस्सर राजा ह्याच्याकडून सर्व पृथ्वीवर राहणार्‍या सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणार्‍या लोकांना : तुमचे कल्याण असो! परात्पर देवाने जी चिन्हे व जे अद्भुत चमत्कार माझ्यासंबंधाने दाखवले आहेत ते विदित करावेत हे मला बरे वाटले आहे. त्याची चिन्हे किती थोर! त्याच्या अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा! त्याचे राज्य सर्वकालचे आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. मी नबुखद्नेस्सर आपल्या गृहात चैनीत होतो, आपल्या मंदिरात समृद्ध होतो. मी स्वप्न पाहिले त्याने मी भयभीत झालो; मी पलंगावर पडलो असता माझे विचार व माझ्या मनात घोळत असलेल्या कल्पना ह्यांनी मी चिंताक्रांत झालो. तेव्हा मी आज्ञा केली की मला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी बाबेलातील सर्व ज्ञानी पुरुषांना माझ्याकडे आणावे. तेव्हा ज्योतिषी, मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ हे आत आल्यावर मी आपले स्वप्न त्यांच्यापुढे मांडले; पण त्यांनी त्याचा अर्थ मला सांगितला नाही. सरतेशेवटी दानीएल माझ्यापुढे आला; त्याचे माझ्या देवाच्या नावावरून बेल्टशस्सर हे नाव ठेवले आहे व त्याच्या ठायी पवित्र देवांचा आत्मा वसत आहे, त्याला मी आपले स्वप्न सांगितले. मी म्हणालो, हे बेल्टशस्सरा, ज्योतिष्यांच्या अध्यक्षा, पवित्र देवांचा आत्मा तुझ्या ठायी आहे व कोणतेही रहस्य तुला समजायला अवघड नाही हे मला ठाऊक आहे, तर मी पाहिलेल्या स्वप्नातील दृष्टान्त व त्यांचा अर्थ मला सांग.