YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 10:1-21

दानीएल 10:1-21 MARVBSI

पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बेल्टशस्सर हे नाव मिळालेल्या दानिएलास एक गोष्ट प्रकट झाली; ती गोष्ट सत्य असून मोठ्या युद्धाविषयीची होती; त्याला ती गोष्ट समजली; त्या दृष्टान्ताचे मर्म त्याला कळले. त्या दिवसांत मी दानीएल सबंध तीन सप्तके शोक करीत होतो. तीन सबंध सप्तके संपेपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही, मांस व द्राक्षारस ही माझ्या तोंडात गेली नाहीत आणि मी तैलाभ्यंगही केला नाही. पहिल्या महिन्याच्या चोविसाव्या तारखेस महानदी हिद्दकेल (टायग्रीस) हिच्या तीरी मी असता मी डोळे वर करून पाहिले तर तागाची वस्त्रे परिधान केलेला आणि कंबरेस उफाज देशाच्या शुद्ध सोन्याचा पट्टा घातलेला असा एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. त्याचे शरीर वैडूर्यमण्यासारखे असून त्याचे मुख विद्युल्लतेसारखे होते. त्याचे नेत्र पेटलेल्या दीपांसमान होते, त्याचे हातपाय उज्ज्वल पितळेसारखे होते आणि त्याच्या शब्दाचा ध्वनी एखाद्या समुदायाच्या गजबजाटासारखा होता. मी दानिएलाने एकट्याने तो दृष्टान्त पाहिला; माझ्याबरोबर असलेल्या मनुष्यांनी तो दृष्टान्त पाहिला नाही; तरी त्यांना मोठा कंप सुटला आणि कोठेतरी लपावे म्हणून ते पळून गेले. मग मी एकटाच राहिलो व हा मोठा दृष्टान्त पाहिला; माझ्यात काही त्राण उरले नाही. मी निस्तेज होऊन मृतप्राय झालो; मला काहीच शक्ती राहिली नाही. तरी त्याच्या शब्दांचा ध्वनी माझ्या कानी पडला; मी त्याच्या शब्दांचा ध्वनी ऐकला तेव्हा मी भूमीवर पालथा पडलो व मला गाढ झोप लागली. तेव्हा पाहा, एका हाताने मला स्पर्श केला, त्याच्या योगाने मी गुडघे व तळहात जमिनीवर टेकून थरथरत राहिलो. तो मला म्हणाला, “हे दानिएला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो ते शब्द समजून घे; नीट उभा राहा; कारण मला आता तुझ्याकडे पाठवले आहे;” तो माझ्याबरोबर असे बोलला तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो. तो मला म्हणाला, “दानिएला, भिऊ नकोस; कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा, व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्‍चय केलास त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले; त्या तुझ्या शब्दांवरून मी आलो आहे. पारसाच्या राज्याचा अधिपती एकवीस दिवस मला आडवा आला; तेव्हा पाहा, मुख्य अधिपतींपैकी एक, मीखाएल, माझ्या साहाय्यास आला; व मी पारसाच्या राजांजवळ राहिलो. आता ह्या शेवटच्या दिवसांत तुझ्या लोकांचे काय होणार हे तुला कळवण्यास मी आलो आहे; कारण दृष्टान्ताची परिपूर्ती होण्यास बराच अवधी आहे.” ह्याप्रमाणे तो हे शब्द माझ्याबरोबर बोलल्यावर मी जमिनीकडे आपले तोंड करून गप्प राहिलो. तेव्हा पाहा, मानवपुत्रासारख्या एकाने माझ्या ओठांना स्पर्श केला; तेव्हा मी आपले तोंड उघडून, जो माझ्यासमोर उभा होता त्याला म्हटले, “हे माझ्या स्वामी, ह्या दृष्टांताने क्लेश पावून मी व्याकूळ झालो आहे व माझ्यात काही त्राण राहिले नाही. स्वामी महाराज, मी तर आपला सेवक, माझ्या स्वामीबरोबर बोलण्याचे सामर्थ्य मला कोठून? मला तर मुळी त्राण राहिले नाही; माझ्यात दम राहिला नाही.” तेव्हा मनुष्याप्रमाणे दिसणार्‍या एकाने मला स्पर्श करून माझ्यात त्राण आणले. तो म्हणाला, “परमप्रिय मानवा, भिऊ नकोस; तुला शांती असो, हिंमत धर, नेट धर.” तो माझ्याबरोबर बोलला तेव्हा मला शक्ती आली व मी म्हणालो, “माझ्या स्वामी, तू आता बोलावे, कारण तू माझ्यात हिंमत आणली आहेस.” मग तो म्हणाला, “मी तुझ्याकडे का आलो हे तुला माहीत आहे काय? आता मी पारसाच्या अधिपतीबरोबर लढायला जातो; मी गेलो म्हणजे ग्रीसचा1 अधिपती येईल. सत्यलेखात जे लिहिले आहे ते तुला प्रकट करतो; त्यांच्याबरोबर सामना करण्यात तुमचा अधिपती मीखाएल ह्याशिवाय दुसर्‍या कोणाचे मला साहाय्य नाही.