कलस्सै 4
4
1धन्यांनो, तुम्हांलाही स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा.
प्रार्थना व रोजची वागणूक
2प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकारस्तुती करत जागृत राहा;
3आणखी आमच्यासाठीही प्रार्थना करा, अशी की, ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगण्यास देवाने आमच्यासाठी वचनाकरता दार उघडावे;
4ह्यासाठी की, जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते रहस्य प्रकट करावे.
5बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; संधी साधून घ्या.
6तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यायचे हे तुम्ही समजावे.
नमस्कार व समाप्ती
7प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास, हा माझ्याविषयीच्या सर्व गोष्टी तुम्हांला कळवील.
8त्याला मी तुमच्याकडे ह्यासाठीच पाठवले आहे की, आमचे वर्तमान तुम्हांला कळावे व त्याने तुमच्या मनाचे समाधान करावे.
9त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम, जो तुमच्यातलाच आहे, त्यालाही पाठवले आहे; ते येथील सर्व वर्तमान तुम्हांला कळवतील.
10माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हांला सलाम सांगतो, आणि बर्णबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हांला सलाम सांगतो, (त्याच्याविषयी तुम्हांला आज्ञा मिळाल्या आहेत, तो तुमच्याकडे आला तर त्याचा स्वीकार करा);
11युस्त म्हटलेला येशू तुम्हांला सलाम सांगतो; सुंता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्याकरता माझे सहकारी आहेत व त्यांच्या द्वारे माझे सांत्वन झाले आहे.
12ख्रिस्त येशूचा दास एफफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हांला सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुमच्यासाठी जीव तोडून विनंती करत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर राहावे.
13तुमच्यासाठी व जे लावदिकीयात व हेरापलीत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करत आहे, त्याच्याविषयी मी साक्षी आहे.
14प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हांला सलाम सांगतात.
15लावदिकीयातील बंधू, आणि नुंफा व तिच्या घरी जमणारी मंडळी ह्यांना सलाम सांगा.
16हे पत्र तुमच्यात वाचून झाल्यावर लावदिकीयातील मंडळीतही वाचायला मिळावे; व लावदिकीयांकडील पत्र तुम्हीही वाचावे.
17अर्खिप्पाला सांगा की, “जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष दे.”
18मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम. मी बंधनांत आहे ह्याची आठवण ठेवा. तुमच्याबरोबर कृपा असो.
सध्या निवडलेले:
कलस्सै 4: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.