YouVersion लोगो
सर्च आयकॉन

आमोस 5

5
पश्‍चात्तापासाठी आवाहन
1हे इस्राएलाच्या घराण्या, हे जे विलापवचन मी तुमच्याविरुद्ध उच्चारतो ते ऐका :
2“इस्राएल-कुमारी पडली आहे; ती पुन्हा उठायची नाही; तिला आपल्या भूमीवर टाकून दिले आहे; तिला उठवणारा कोणी नाही.”
3कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, “ज्या नगरातून हजार निघत तेथे शंभर व ज्यातून शंभर निघत तेथे दहा, असे इस्राएल घराण्यात उरतील.”
4कारण परमेश्वर इस्राएलाच्या घराण्यास म्हणतो, “मला शरण या म्हणजे वाचाल.”
5परंतु बेथेलास शरण जाऊ नका, गिल्गालात प्रवेश करू नका. पलीकडे बैर-शेब्यास जाऊ नका; कारण गिल्गाल खातरीने बंदिवासात जाईल, व बेथेल शून्यवत होईल.”
6परमेश्वरास शरण जा, म्हणजे वाचाल; नाहीतर तो योसेफाच्या घराण्यावर अग्नीसारखा पडून त्याला खाऊन टाकील; त्याला विझवणारा बेथेलात कोणी असणार नाही.
7न्यायाचा कडूदवणा करणारे व नीतिमत्ता धुळीस मिळवणारे लोकहो,
8ज्याने कृत्तिका व मृगशीर्ष ही नक्षत्रे केली, तो निबिड अंधकाराची प्रभात करतो व दिवसाची काळोखी रात्र करतो, जो समुद्राच्या जलांना बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, त्याचे नाम परमेश्वर हे आहे.
9तोच बलवानांवर एकाएकी नाश आणतो, म्हणजे मग दुर्गाचा विध्वंस होतो.
10वेशीत हितबोध करणार्‍यांचा ते द्वेष करतात, सात्त्विकपणे बोलणार्‍याचा वीट मानतात.
11तुम्ही गरिबाला तुडवता व भेट म्हणून त्याच्यापासून धान्य उपटता, त्यामुळे जी चिर्‍यांची घरे तुम्ही बांधली आहेत त्यांत तुम्ही राहणार नाही; तुम्ही जे द्राक्षाचे रमणीय मळे लावले आहेत त्यांचा द्राक्षारस पिणार नाही.
12कारण तुमचे अपराध किती आहेत व तुमची पातके किती घोर आहेत हे मला ठाऊक आहे; तुम्ही नीतिमानाला जाचता, तुम्ही लाच घेता व वेशीत दरिद्र्यांचा न्याय बुडवता.
13ह्यास्तव जो शहाणा असेल तो अशा वेळी मौन धरील; कारण दिवस वाईट आहेत.
14तुम्ही वाचावे म्हणून बर्‍याच्या मागे लागा; वाइटाच्या मागे लागू नका, म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर, सेनाधीश देव, तुमच्याबरोबर असेल.
15वाइटाचा द्वेष करा, बर्‍याची आवड धरा, वेशीत न्याय स्थापित करा; परमेश्वर, सेनाधीश देव योसेफाच्या अवशेषावर कदाचित दया करील.
16ह्यास्तव परमेश्वर, सेनाधीश देव, प्रभू म्हणतो, “प्रत्येक चव्हाठ्यावर शोक होईल, गल्ल्यागल्ल्यांतून लोक हायहाय म्हणतील, ते शोक करण्यास शेतकर्‍यांना बोलावतील व विलापगीत म्हणण्यात जे चतुर त्यांना आक्रंदन करण्यास बोलावतील.
17द्राक्षीच्या प्रत्येक मळ्यात आक्रंदन होईल, कारण मी तुमच्या मधून जाईन,” असे परमेश्वर म्हणतो.
18परमेश्वराचा दिवस यावा अशी जे इच्छा बाळगतात, त्यांना धिक्कार असो! परमेश्वराचा दिवस येण्याची तुम्ही का इच्छा करता? तो अंधकारमय आहे, प्रकाशमय नव्हे.
19एखादा मनुष्य सिंहापासून पळतो तर त्याला अस्वल गाठते, तो घरात येऊन भिंतीला हात टेकतो तर त्याला सर्प दंश करतो, तसा हा प्रकार आहे.
20परमेश्वराचा दिवस अंधकारमय असणार, प्रकाशमय नसणार, तो अगदी काळोखाचा असणार; त्यात मुळीच चमक नसणार असे नव्हे का?
21“तुमच्या उत्सवांचा मला तिटकारा आहे, मी ते तुच्छ मानतो; तुमच्या पवित्र मेळ्यांचा वासही मला खपत नाही.
22तुम्ही मला होम व अन्नार्पणे अर्पण केली तरी त्यांत मला काही संतोष नाही; तुमच्या पुष्ट पशूंच्या शांत्यर्पणाकडे मी ढुंकून पाहणार नाही.
23तुमच्या गाण्याचा गोंगाट माझ्यापासून दूर न्या, तुमच्या वीणांचे वादन मी ऐकणार नाही.
24न्याय पाण्याप्रमाणे व नीतिमत्ता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहो.
25हे इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही रानात चाळीस वर्षे मला पशुयज्ञ व अन्नार्पणे करत होता काय?
26तुम्ही आपल्या राजाचा मंडप, आपल्या मूर्तीचा देव्हारा व तुम्ही केलेल्या आपल्या देवाचा तारा ही तुम्ही वाहून न्याल.1
27आणि मी तुम्हांला दिमिष्काच्या पलीकडे बंदिवान करून नेईन,” असे परमेश्वर म्हणतो; सेनाधीश देव हे त्याचे नाम आहे.

सध्या निवडलेले:

आमोस 5: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन