आमोस 3
3
संदेष्ट्याचे काम
1इस्राएलवंशजहो, तुमच्याविरुद्ध म्हणजे जे सर्व कूळ मी मिसर देशातून बाहेर आणले त्याच्याविरुद्ध परमेश्वराने सांगितलेले वचन ऐका, ते असे :
2“भूतलावरील सर्व कुळांत केवळ तुमच्याबरोबरच मी परिचय केला; म्हणून तुमच्या सर्व दुष्कृत्यांबद्दल मी तुमची झडती घेईन.
3पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय?
4पारध नसल्यास वनात सिंह गर्जना करतो काय? काही धरले नसल्यास तरुण सिंह आपल्या गुहेत गुरगुरतो काय?
5पाशच मांडला नाही तर पक्षी जमिनीवरल्या जाळ्यात अडकेल काय? जाळ्यात काही अडकले नसल्यास ते जाळे जमिनीवरून वर उडेल काय?
6नगरात रणशिंग वाजवल्यास लोक घाबरायचे नाहीत काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय?
7प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे ह्यांना कळवल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही.
8सिंहाने गर्जना केली आहे; त्याला भिणार नाही असा कोण? प्रभू परमेश्वर बोलला आहे; संदेश दिल्यावाचून कोणाच्याने राहवेल?”
शोमरोनाचा विनाश
9अश्दोदातील महालातून व मिसर देशातील महालातून असे जाहीर करून सांगा : “शोमरोनाच्या डोंगरावर जमा व्हा; त्यामध्ये केवढी दंगल चालली आहे ती पाहा, त्यांच्यात काय जुलूम होत आहे तो पाहा.”
10परमेश्वराचे असे म्हणणे आहे की, “हे जे आपल्या महालात बलात्कार व विध्वंस ह्यांच्या योगे धनसंचय करतात त्यांना सरळ आचरण करण्याचे ठाऊक नाही.”
11ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, “तो पाहा शत्रू! तो देश घेणार! तो तुझे बल हरण करणार व तुझे महाल लुटणार!”
12परमेश्वर म्हणतो, “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून दोन तंगड्या अथवा कानाचा एखादा तुकडा वाचवतो तसे पलंगाच्या कोपर्यात रेशमी गादीवर बसणारे इस्राएलाचे वंशज आपला जीव वाचवतील.”
13“हे ऐका, व याकोबाच्या घराण्याविरुद्ध प्रतिज्ञापूर्वक सांगा,” असे प्रभू, परमेश्वर सेनाधीश देव म्हणतो,
14“ज्या दिवशी इस्राएल घराण्याचा त्यांच्या अपराधांबद्दल मी समाचार घेईन तेव्हा बेथेलच्या वेद्यांचा समाचार घेईन; वेदीची शिंगे तोडली जाऊन ती भूमीवर पडतील.
15हिवाळ्याचा महाल उन्हाळ्याच्या महालावर आदळून पाडीन; हस्तिदंताने मढवलेली घरे नष्ट होतील, बहुत घरे नाहीतशी होतील,”
सध्या निवडलेले:
आमोस 3: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.