YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 7:20-60

प्रेषितांची कृत्ये 7:20-60 MARVBSI

त्याच काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता; त्याचे पालनपोषण ‘तीन महिनेपर्यंत’ त्याच्या पित्याच्या घरी झाले; मग त्याला बाहेर टाकून देण्यात आले असता फारोच्या कन्येने त्याला घेऊन आपला पुत्र म्हणून त्याचे संगोपन केले. मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता. मग तो जवळ जवळ चाळीस वर्षांचा झाला तेव्हा ‘आपले बांधव म्हणजे इस्राएलाचे संतान’ ह्यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले. तेव्हा मोशेने त्यांच्यातील कोणाएकावर अन्याय होत आहे असे पाहून ह्या जाचलेल्या माणसाचा कैवार घेतला आणि ‘मिसर्‍याला मारून’ त्याचा सूड उगवला. तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवांची सुटका करत आहे हे त्यांना समजले असेल असे त्याला वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही. मग दुसर्‍या दिवशी कोणी भांडत असता तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यांची समजूत घालण्याकरता त्यांना म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात; एकमेकांवर अन्याय का करता?’ तेव्हा ‘जो आपल्या शेजार्‍यावर अन्याय करत होता तो’ त्याला ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले? काल तू मिसर्‍याला ठार मारले तसे मलाही मारायला पाहतोस काय?’ हे शब्द ऐकताच मोशे परत गेला आणि मिद्यान देशात उपरा झाला; तेथे त्याला दोन मुलगे झाले. मग चाळीस वर्षे भरल्यावर सीनाय ‘पर्वताच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत प्रभूचा दूत त्याच्या दृष्टीस पडला.’ हे दृश्य पाहून मोशेला आश्‍चर्य वाटले आणि ते काय आहे हे पाहण्याकरता तो जवळ गेला; तेव्हा प्रभूची वाणी झाली की, ‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव आहे.’ तेव्हा मोशे थरथर कापला व त्याला तिकडे पाहण्याचे धैर्य झाले नाही. ‘कारण प्रभूने त्याला म्हटले, तू आपल्या पायांतले जोडे काढ; कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे. मिसर देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे; तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’ ‘तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले,’ असे म्हणून ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते, त्यालाच झुडपात दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्ते, देवाने अधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठवले. ‘त्याने मिसर देशात’, तांबड्या समुद्रात व ‘रानात चाळीस वर्षे अद्भुत कृत्ये करून व चिन्हे दाखवून’ त्या लोकांना बाहेर नेले. तोच मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, ‘तुमचा देव परमेश्वर तुमच्या बांधवांमधून माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील;’ [त्याचे तुम्ही ऐका]. रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणार्‍या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय; त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली. त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती; तर त्यांनी त्याला धिक्कारले व आपले मन ‘मिसर देशाकडे फिरवून ते अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आम्हांला करून दे; कारण ज्याने आम्हांला मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले हे आम्हांला कळत नाही.’ मग त्या दिवसांत ‘त्यांनी वासराची मूर्ती बनवली’ व तिच्यापुढे ‘यज्ञ करून’ आपल्या हातच्या कृतींबद्दल आनंदोत्सव केला. तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना ‘आकाशातील सेनागणाची’ पूजा करण्यास सोडून दिले; ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहिले आहे : ‘हे इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केले काय? मोलखाचा मंडप व रेफान दैवताचा तारा’, म्हणजे पुजण्याकरता ‘तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या; मीही तुम्हांला’ बाबेलच्या ‘पलीकडे नेऊन ठेवीन.’ तू ‘जो नमुना पाहिलास त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर,’ असे ‘ज्याने मोशेला सांगितले’ त्याने नेमल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता. जी राष्ट्रे देवाने त्यांच्यासमोरून घालवली त्यांचा देश आपल्या पूर्वजांनी आपल्या ‘ताब्यात घेतला’, तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशवाबरोबर त्या देशात आणला आणि दाविदाच्या काळापर्यंत परंपरेने तसाच ठेवला. दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली आणि त्याने ‘याकोबाच्या घराण्यासाठी1 वसतिस्थान मिळवण्याची’ विनंती केली, आणि ‘शलमोनाने त्याच्यासाठी घर बांधले’. तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हटले आहे : परमेश्वर म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे. पृथ्वी माझे पदासन आहे; तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते? माझ्या हाताने ह्या सर्व वस्तू केल्या नाहीत काय?’ अहो ‘ताठ मानेच्या’ आणि ‘हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या लोकांनो,’ तुम्ही तर ‘पवित्र आत्म्याला’ सर्वदा ‘विरोध करता;’ जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही. ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरुषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले; आणि आता त्याला धरून देणारे व जिवे मारणारे तुम्ही निघाला आहात. अशा तुम्हांला देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते; पण तुम्ही ते पाळले नाही.” त्याचे हे भाषण ऐकणार्‍यांच्या अंतःकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दातओठ खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला; आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.” तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले; आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवली. ते दगडमार करत असता स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस.” असे बोलून तो झोपी गेला.

प्रेषितांची कृत्ये 7:20-60 साठी चलचित्र