प्रेषितांची कृत्ये 7:20-60
प्रेषितांची कृत्ये 7:20-60 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या काळात मोशेचा जन्म झाला, तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता; त्याचे पालनपोषण तीन महिने पर्यंत त्याच्या पित्याच्या घरी झाले. मग त्यास बाहेर टाकून देण्यात आले असता, फारोच्या कन्येने त्यास घेउन आपला मुलगा म्हणून त्यास वाढवले. मोशेला मिसरी लोकांचे सर्व ज्ञान शिकला; आणि तो भाषणात व कामात पराक्रमी होता. मग तो जवळ जवळ चाळीस वर्षाचा झाला, तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्राएलाचे संतान ह्यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले. तेव्हा मोशेने इस्राएलातील कोणाएकावर अन्याय होत आहे, असे पाहून या जाचलेल्या मनुष्याचा कैवार घेतला आणि मिसऱ्याला मारून त्याचा सूड घेतला: तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवाची सुटका करत आहे हे त्यांना समजले असेल असे त्यास वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही. मग दुसऱ्या दिवशी कोणी इस्राएली भांडत असता तो त्यांच्यापुढे आला व त्यांचा समेट करू लागला; तो म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही बांधव; आहात एकमेकांवर अन्याय का करता?’ तेव्हा जो आपल्या शेजाऱ्यावर अन्याय करत होता, तो त्यास ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले? काल तू मिसऱ्याला ठार मारले, तसे मलाही मारायला पाहतोस काय?’ हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान देशात परदेशी होऊन राहिला; तेथे त्यास दोन पुत्र झाले. मग चाळीस वर्षे भरल्यावर, सीनाय पर्वताच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला. मग मोशेने अग्निज्वालाचे दृष्य पाहिल्यावर, तो फार आश्चर्यचकित झाला; आणि हे दृष्य पाहण्यासाठी तो जवळ गेला, तेव्हा प्रभूची वाणी झाली की, ‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, व याकोबाचा देव आहे.’ तेव्हा मोशे थरथर कापला व त्यास तिकडे पाहण्याचे धैर्य झाले नाही. कारण प्रभूने त्यास म्हटले, ‘तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे. मिसर देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे; त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे; तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’ तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले, असे म्हणून, ‘ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते?’ त्यालाच झुडपात दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्ते, देवाने अधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठवले. मिसर देशात, तांबड्या समुद्रात, व रानात चाळीस वर्षे अद्भूत कृत्ये करून व चिन्हे दाखवून त्या लोकांस बाहेर नेले. तोच मोशे इस्राएल लोकांस म्हणाला, ‘देव तुमच्या बांधवामधून, माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील.’ रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली. त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती; तर त्यांनी त्यास धिक्कारले व आपले अंतःकरण मिसर देशाकडे फिरवून. ते अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील अशा देवता आम्हास करून दे. कारण ज्याने आम्हास मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले, हे आम्हास कळत नाही.’ मग त्या दिवसात त्यांनी वासराची मूर्ती बनवली, व तिच्यापुढे ‘यज्ञ करुन’ आपल्या हातच्या कृतीबद्दल आनंदोत्सव केला. तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील सेनागणाची पूजा करण्यास सोडून दिले; ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहीले आहे ‘हे इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केलेत काय? मोलखाचा मंडप व रेफान दैवतांचा तारा म्हणजे पुजण्याकरता: तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या; मीही तुम्हास बाबेलच्या पलिकडे नेऊन ठेवीन.’ तू जो नमुना पाहिलास त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर, असे ज्याने मोशेला सांगितले, त्याने नेमल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता. जी राष्ट्रे देवाने त्यांच्यासमोरून घालवली, त्यांचा देश आपल्या ताब्यात घेतला, तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशवाबरोबर त्या देशात आणिला. आणि दाविदाच्या काळापर्यंत परंपरेने तसाच ठेवला. दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली; आणि त्याने याकोबाच्या घराण्यासाठी वस्तीस्थान मिळविण्याची विनंती केली. आणि शलमोनाने त्याच्यासाठी घर बांधले. तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हणले आहे. प्रभू म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते? माझ्या हाताने या सर्व वस्तू केल्या नाहीत काय?’ अहो ताठ मानेच्या आणि हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या, लोकांनो तुम्ही तर पवित्र आत्म्याला; सर्वदा विरोध करता जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही. ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरूषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले; आणि आता त्यास धरून देणारे व जिवे मारणारे तुम्ही निघाला आहात. अशा तुम्हास देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही.” त्याचे भाषण ऐकणाऱ्या सभेतील सभासदांच्या अंतःकरणास इतके झोंबले, ते दातओठ खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.” तेव्हा ते मोठ्याने ओरडून, व कान बंद करीत, एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले; मग ते त्यास शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले: आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरूणाच्या पायाजवळ ठेवली. ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.” असे बोलून, तो मरण पावला.
प्रेषितांची कृत्ये 7:20-60 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“याच सुमारास मोशेचा जन्म झाला आणि तो असाधारण बालक होता. तीन महिने त्याच्या घरातील लोकांनी त्याची काळजी घेतली, त्याला बाहेर ठेवले असताना, फारोच्या कन्येने त्याला घेतले आणि स्वतःचा पुत्र म्हणून त्याचे पालनपोषण करून त्याला वाढवले. मोशेला इजिप्तमधील सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले व तो एक प्रभावी वक्ता आणि कृतीतही प्रभावी झाला. “जेव्हा मोशे चाळीस वर्षाचा झाला, त्यावेळी त्याने आपल्या इस्राएली बांधवांना भेटण्याचे मनात ठरविले. तेथे त्याने पाहिले की, एका इस्राएली मनुष्यास इजिप्तचा मनुष्य अन्यायाने वागवित आहे, म्हणून मोशेने त्याचे रक्षण करण्यास त्या इजिप्तच्या माणसाची हत्या करून त्याचा सूड घेतला. मोशेला वाटले की त्याच्या स्वतःच्या बांधवांस समजेल की परमेश्वर त्यांची सुटका करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेत आहे, परंतु ते त्यांना समजले नाही. दुसर्या दिवशी मोशेला दोन इस्राएली माणसे एकमेकांशी भांडताना दिसले. त्यांचा समेट करीत तो त्यांना म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात; तुम्ही एकमेकांबरोबर का भांडत आहात?’ “परंतु जो माणूस दुसर्यावर अन्याय करीत होता, त्याने मोशेला बाजूला होण्यास सांगितले. ‘तुला आमच्यावर शासक व न्यायाधीश कोणी नेमिले आहे? काल तू इजिप्तच्या मनुष्यास ठार केलेस, तसे मला ठार करणार आहेस काय?’ जेव्हा मोशेने हे ऐकले तेव्हा तो मिद्यानी लोकांच्या देशात पळून गेला व तेथे तो परकीय म्हणून राहिला आणि तेथे त्याला दोन पुत्र झाले. “चाळीस वर्षे झाल्यानंतर सीनाय पर्वताजवळ असलेल्या जंगलामध्ये एका देवदूताने मोशेला जळत्या ज्वालाच्या झुडूपामधून दर्शन दिले. मोशेने ते दृश्य पाहिले, तेव्हा त्याने आश्चर्य केले. ते नीट पाहण्याकरिता तो जवळ गेला, तेव्हा त्याने प्रभुची वाणी बोलताना ऐकली: ‘मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांचा परमेश्वर आहे.’ हे ऐकताच मोशे भीतीने कापू लागला आणि त्याला तेथे पाहण्याचे धैर्य झाले नाही. “मग प्रभुने त्याला म्हटले, ‘तुझी पादत्राणे काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र आहे. इजिप्तमध्ये असलेल्या माझ्या लोकांचे अत्याचार मी खरोखरच पाहिले आहेत. त्यांचे कळवळणे मी ऐकले आहे आणि त्यांना त्यांच्या त्रासातून सोडविण्यासाठी मी खाली आलो आहे. आता ये, मी तुला परत इजिप्तकडे पाठवितो.’ “त्याच मोशेला, ‘तुला आमच्यावर अधिपती व न्यायाधीश कोणी नेमले?’ असे विचारुन पूर्वी झिडकारीले होते, त्याला परमेश्वराने स्वतः शासक व मुक्त करणारा म्हणून झुडूपात प्रकट झालेल्या दूताच्या द्वारे त्यांच्याकडे परत पाठविले. आणि अनेक अद्भुत कृत्ये व चिन्हे करून त्याने त्यांना इजिप्त देशामधून, तांबड्या समुद्रातून आणि चाळीस वर्षे रानातून बाहेर काढले. “तोच मोशे ज्याने इस्राएल लोकांना सांगितले होते, ‘परमेश्वर, तुमच्या बांधवांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा उठवेल;’ तो अरण्यात लोकसमुदायाबरोबर होता आणि सीनाय पर्वतावर परमेश्वराचा दूत जो त्याच्याशी आणि आपल्या पूर्वजांशी बोलला आणि आपल्याला देण्याकरीता जिवंत वचने त्याला मिळाली. “परंतु आपले पूर्वज त्याचे ऐकावयास तयार नव्हते. या व्यतिरिक्त, त्यांनी त्यास स्वीकारले नाही कारण इजिप्तकडे परत जाण्याची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली. त्यांनी अहरोनाला सांगितले, ‘आमच्यासाठी तू देवांना तयार कर, म्हणजे ते आमच्यापुढे जातील. कारण ज्याने आम्हाला इजिप्तमधून काढून आणले त्या मोशेचे काय झाले ते आम्हाला माहीत नाही!’ त्याचवेळेस त्यांनी वासराच्या प्रतिरूपाची मूर्ती तयार केली. त्यांनी तिच्यासाठी बलिदान व अर्पणे आणली, स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या कृती समोर ते मौज करू लागले. म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे पाठ फिरवून त्यांस आकाशातील सूर्य, चंद्र व तारे यांची पूजा करू दिली. संदेष्ट्याच्या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे: “ ‘अहो, इस्राएली लोकांनो, चाळीस वर्षे रानात असताना तुम्ही माझ्यासाठी बलिदान व अर्पणे आणली काय? तुम्ही मोलेक देवता याचा मंडप आणि शक्कुथ व तार्यांचा परमेश्वर रेफान, या तुमच्या हातांनी घडविलेल्या मूर्तींची उपासना केली. म्हणून मी तुम्हाला बंदीवासासाठी बाबेलच्या पलीकडे पाठवीन.’ “आपले पूर्वज रानातून जाताना त्यांच्याबरोबर कराराच्या साक्षीचा निवासमंडप होता. परमेश्वराने मोशेला दिलेल्या निर्देशानुसार व नमुन्याप्रमाणे त्याची रचना करण्यात आली होती. जेव्हा परमेश्वराने इतर राष्ट्रांना त्यांच्या समोरुन हाकलून दिले तेव्हा त्यांनी त्यांची जमीन ताब्यात घेतली आणि आपल्या पूर्वजांनी यहोशवाच्या नेतृत्वाखाली जो निवासमंडप त्यांच्याबरोबर आणला तो त्या जमिनीवर दावीद राजाच्या काळापर्यंत तेथेच राहिला. दावीदाने परमेश्वराची कृपादृष्टी अनुभवली आणि त्याने याकोबाच्या परमेश्वरासाठी निवासस्थान बांधता येईल का अशी विचारपूस केली. परंतु तो शलमोन होता ज्याने परमेश्वरासाठी घर बांधले. “तरी, सर्वोच्च परमेश्वर मानवी हातांनी बांधलेल्या घरांमध्ये राहत नाही. ज्याप्रमाणे संदेष्टा असे म्हणतो: “ ‘स्वर्ग माझे सिंहासन आहे, आणि पृथ्वी माझे पादासन आहे. तर तुम्ही माझ्यासाठी कसल्या प्रकारचे घर बांधणार? असे प्रभू म्हणतो. माझे विश्रांतीचे स्थान कोठे आहे? हे सर्वकाही मी माझ्या हाताने निर्माण केले नाही का?’ “अहो ताठ मानेच्या लोकांनो! तुमची हृदये व कान यांची सुंता अजूनही झालेली नाही. तुम्ही अगदी तुमच्या वाडवडिलांसारखे आहात: तुम्ही नेहमी पवित्र आत्म्याला विरोध करता! तुमच्या पूर्वजांनी ज्याचा छळ केला नाही, असा एक तरी संदेष्टा आहे का? जो नीतिमान आहे, व त्यांच्या आगमनाचे भविष्य वर्तविणार्यांना देखील तुम्ही जिवे मारले आणि आता तुम्ही त्यांचा विश्वासघात करून त्यांनाच जिवे मारले आणि देवदूतांच्याद्वारे मिळालेल्या परमेश्वराच्या नियमांचाही तुम्ही जाणूनबुजून भंग केला.” सभागृहातील यहूदी पुढार्यांनी हे ऐकले तेव्हा ते भयंकर संतापले आणि त्याच्यावर दात खाऊ लागले. परंतु स्तेफन, पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला व त्याने वर स्वर्गाकडे पाहून परमेश्वराचे गौरव पहिले आणि येशू परमेश्वराच्या उजवीकडे उभे आहेत असे त्याला दिसले. तो म्हणाला, “पाहा, मी स्वर्ग उघडलेला आणि मानवपुत्र परमेश्वराच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.” मग त्यांनी त्यांचे हात त्यांच्या कानांवर ठेऊन मोठ्याने आरोळ्या मारल्या आणि त्याच्या अंगावर तुटून पडले, त्यांनी स्तेफनाला शहराबाहेर ओढीत नेले आणि त्याला धोंडमार करू लागले. त्याचवेळी, इकडे साक्षीदारांनी काढून ठेवलेले त्यांचे अंगरखे शौल म्हटलेल्या एका तरुण माणसाच्या पायाजवळ ठेवले होते. ते स्तेफनाला दगडमार करीत असताना, स्तेफनाने प्रार्थना केली, “प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” आणि मग गुडघ्यावर टेकून मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्या हिशेबी धरू नकोस.” असे बोलल्यानंतर तो मरण पावला.
प्रेषितांची कृत्ये 7:20-60 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याच काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता; त्याचे पालनपोषण ‘तीन महिनेपर्यंत’ त्याच्या पित्याच्या घरी झाले; मग त्याला बाहेर टाकून देण्यात आले असता फारोच्या कन्येने त्याला घेऊन आपला पुत्र म्हणून त्याचे संगोपन केले. मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता. मग तो जवळ जवळ चाळीस वर्षांचा झाला तेव्हा ‘आपले बांधव म्हणजे इस्राएलाचे संतान’ ह्यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले. तेव्हा मोशेने त्यांच्यातील कोणाएकावर अन्याय होत आहे असे पाहून ह्या जाचलेल्या माणसाचा कैवार घेतला आणि ‘मिसर्याला मारून’ त्याचा सूड उगवला. तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवांची सुटका करत आहे हे त्यांना समजले असेल असे त्याला वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही. मग दुसर्या दिवशी कोणी भांडत असता तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यांची समजूत घालण्याकरता त्यांना म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात; एकमेकांवर अन्याय का करता?’ तेव्हा ‘जो आपल्या शेजार्यावर अन्याय करत होता तो’ त्याला ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले? काल तू मिसर्याला ठार मारले तसे मलाही मारायला पाहतोस काय?’ हे शब्द ऐकताच मोशे परत गेला आणि मिद्यान देशात उपरा झाला; तेथे त्याला दोन मुलगे झाले. मग चाळीस वर्षे भरल्यावर सीनाय ‘पर्वताच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत प्रभूचा दूत त्याच्या दृष्टीस पडला.’ हे दृश्य पाहून मोशेला आश्चर्य वाटले आणि ते काय आहे हे पाहण्याकरता तो जवळ गेला; तेव्हा प्रभूची वाणी झाली की, ‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव आहे.’ तेव्हा मोशे थरथर कापला व त्याला तिकडे पाहण्याचे धैर्य झाले नाही. ‘कारण प्रभूने त्याला म्हटले, तू आपल्या पायांतले जोडे काढ; कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे. मिसर देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे; तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’ ‘तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले,’ असे म्हणून ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते, त्यालाच झुडपात दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्ते, देवाने अधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठवले. ‘त्याने मिसर देशात’, तांबड्या समुद्रात व ‘रानात चाळीस वर्षे अद्भुत कृत्ये करून व चिन्हे दाखवून’ त्या लोकांना बाहेर नेले. तोच मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, ‘तुमचा देव परमेश्वर तुमच्या बांधवांमधून माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील;’ [त्याचे तुम्ही ऐका]. रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणार्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय; त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली. त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती; तर त्यांनी त्याला धिक्कारले व आपले मन ‘मिसर देशाकडे फिरवून ते अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आम्हांला करून दे; कारण ज्याने आम्हांला मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले हे आम्हांला कळत नाही.’ मग त्या दिवसांत ‘त्यांनी वासराची मूर्ती बनवली’ व तिच्यापुढे ‘यज्ञ करून’ आपल्या हातच्या कृतींबद्दल आनंदोत्सव केला. तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना ‘आकाशातील सेनागणाची’ पूजा करण्यास सोडून दिले; ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहिले आहे : ‘हे इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केले काय? मोलखाचा मंडप व रेफान दैवताचा तारा’, म्हणजे पुजण्याकरता ‘तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या; मीही तुम्हांला’ बाबेलच्या ‘पलीकडे नेऊन ठेवीन.’ तू ‘जो नमुना पाहिलास त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर,’ असे ‘ज्याने मोशेला सांगितले’ त्याने नेमल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता. जी राष्ट्रे देवाने त्यांच्यासमोरून घालवली त्यांचा देश आपल्या पूर्वजांनी आपल्या ‘ताब्यात घेतला’, तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशवाबरोबर त्या देशात आणला आणि दाविदाच्या काळापर्यंत परंपरेने तसाच ठेवला. दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली आणि त्याने ‘याकोबाच्या घराण्यासाठी1 वसतिस्थान मिळवण्याची’ विनंती केली, आणि ‘शलमोनाने त्याच्यासाठी घर बांधले’. तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हटले आहे : परमेश्वर म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे. पृथ्वी माझे पदासन आहे; तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते? माझ्या हाताने ह्या सर्व वस्तू केल्या नाहीत काय?’ अहो ‘ताठ मानेच्या’ आणि ‘हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या लोकांनो,’ तुम्ही तर ‘पवित्र आत्म्याला’ सर्वदा ‘विरोध करता;’ जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही. ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरुषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले; आणि आता त्याला धरून देणारे व जिवे मारणारे तुम्ही निघाला आहात. अशा तुम्हांला देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते; पण तुम्ही ते पाळले नाही.” त्याचे हे भाषण ऐकणार्यांच्या अंतःकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दातओठ खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला; आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.” तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले; आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवली. ते दगडमार करत असता स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस.” असे बोलून तो झोपी गेला.
प्रेषितांची कृत्ये 7:20-60 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्याच राजाच्या काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता. तीन महिनेपर्यंत त्याचे पालनपोषण त्याच्या वडिलांच्या घरी झाले. मग त्याला बाहेर टाकून देण्यात आले असता फारोच्या कन्येने त्याला घेऊन आपला मुलगा म्हणून त्याचे संगोपन केले. मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी झाला. तो चाळीस वर्षांचा झाला, तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्राएली लोक ह्यांची भेट घ्यावी, असे त्याच्या मनात आले. मोशेने त्यांतील कोणा एकावर एका मिसरी माणसाच्या हातून अन्याय होत असलेला पाहून त्या माणसाचा कैवार घेतला आणि मिसरी माणसाला ठार करून त्याचा सूड उगवला. देव त्याच्या हाताने त्याच्या बांधवांची सुटका करणार आहे, हे त्यांना समजेल असे त्याला वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही. दुसऱ्या दिवशी दोन इस्राएली माणसे आपसात भांडत असता तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यांची समजूत घालण्याकरता त्यांना म्हणाला, “तुम्ही भाऊबंद आहात. एकमेकांवर अन्याय का करता?’ तेव्हा जो आपल्या सहकाऱ्यावर अन्याय करत होता, तो त्याला ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश म्हणून कोणी नेमले? काल तू मिसरी माणसाला ठार मारले, तसे मलाही मारावयाला पाहतोस काय?’ हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान लोकांच्या देशात उपरी झाला. तेथे त्याला दोन मुलगे झाले. त्यानंतर चाळीस वर्षांनी सीनाय पर्वताजवळच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला. हे दृश्य पाहून मोशेला आश्चर्य वाटले आणि ते काय आहे, हे पाहण्याकरता तो जवळ गेला. त्यावेळी प्रभूची वाणी झाली, ‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामचा, इसहाकचा व याकोबचा देव आहे.’ मोशे घाबरला व त्याला तिकडे पाहायचे धैर्य झाले नाही. प्रभूने त्याला म्हटले, ‘तू आपल्या पायांतले जोडे काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. मिसर देशातल्या माझ्या लोकांचे हाल मी खरोखर पाहिले आहते, त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे. तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’ ‘तुला सत्ताधिकारी व न्यायाधीश कोणी केले’, असे म्हणून ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते, त्यालाच, झुडपांत दर्शन झालेल्या देवदूताच्या साहाय्याने, देवाने सत्ताधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठवले. त्याने मिसर देशात, तांबड्या समुद्रात व रानात चाळीस वर्षे अद्भूत कृत्ये करून व चिन्हे दाखवून त्या लोकांना बाहेर नेले. तोच मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, ‘मला पाठविले त्याप्रमाणे परमेश्वर तुमच्या बांधवांमधून एक संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील.’ रानातील मंडळींबरोबर, सीनाय पर्वतावर मोशेशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. तो आपल्यासाठी जीवनदायक संदेश घेऊन आला. परंतु त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी त्याला धिक्कारले व आपले मन मिसर देशाकडे फिरवून ते अहरोनला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आम्हांला करून दे कारण ज्याने आम्हांला मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले, ते आम्हांला माहीत नाही.’ त्या दिवसांत त्यांनी वासराची मूर्ती बनवली व तिच्यापुढे यज्ञ करून आपल्या हातून घडलेल्या कृतीबद्दल आनंदोत्सव केला. म्हणून देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील ताऱ्यांची पूजा करावयास सोडून दिले, ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहिले आहे: हे इस्राएलच्या घराण्या, तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात पशू कापून मला यज्ञात अर्पण केले काय? मोलख दैवताचा मंडप व तुमचे मुख्य दैवत रेफान ह्याचा तारा ह्यांच्या प्रतिमा तुम्ही पुजण्याकरिता तयार केल्या म्हणून मी तुम्हांला बाबेलच्या पलीकडे नेऊन ठेवीन. परमेश्वर बोलला तेव्हा त्याने मोशेला आदेश दिला होता की, त्याने पाहिलेल्या नमुन्याप्रमाणे परमेश्वराच्या वसतीचा मंडप तयार करण्यात यावा. हा परमेश्वराच्या वसतीचा मंडप आपल्या पूर्वजांकडे होता. नंतर जी राष्ट्रे देवाने आपल्या पूर्वजांच्या समोरून घालविली त्यांचा प्रदेश आपल्या पूर्वजांनी त्यांच्या ताब्यात घेतला, तेव्हा त्यांनी तो मंडप यहोशवाबरोबर त्या प्रदेशात आणला आणि दावीदच्या काळापर्यंत परंपरेने तसाच त्यांच्याकडे ठेवला. दावीदवर देवाची कृपादृष्टी झाली आणि त्याने याकोबच्या घराण्याच्या परमेश्वरासाठी वसतिस्थान तयार करता यावे म्हणून परमेश्वराकडे याचना केली. परंतु शलमोनने परमेश्वरासाठी घर बांधले. तथापि परमेश्वर हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हटले आहे त्यानुसार: परमेश्वर म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे, तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या निवासाचे स्थान कोणते? मीच माझ्या हातांनी ह्या सर्व वस्तू केल्या नाहीत काय?’” स्तेफन पुढे म्हणाला, “अहो ताठ मानेच्या आणि हृदयाची व कानांची सुंता न झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला नेहमी विरोध करता. जसे तुमचे पूर्वज, तसेच तुम्हीही. ज्याचा छळ तुमच्या पूर्वजांनी केला नाही, असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान सेवकाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले, त्यांना तुमच्या पूर्वजांनी ठार मारले आणि आता तुम्ही प्रत्यक्ष त्याला धरून देणारे व ठार मारणारे निघाला आहात. तुम्हांला देवदूतांच्याद्वारे नियमशास्त्र देण्यात आले होते, पण तुम्ही ते पाळले नाही.” त्याचे हे भाषण न्यायसभेच्या सदस्यांच्या अंतःकरणाला इतके झोंबले की, ते त्याच्यावर दातओठ खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन स्तेफनने आकाशाकडे पाहिले, तेव्हा देवाचे वैभव व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. स्तेफन म्हणाला, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे!” ते मोठ्याने ओरडून व कान झाकून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. ते त्याला शहराबाहेर घालवून दगड मारू लागले, साक्षीदारांनी त्यांचे कपडे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवले होते. ते दगड मारत असताना स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभो येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” त्यानंतर गुडघे टेकून त्याने आर्त विनवणी केली, “हे प्रभो, हे पाप त्यांच्या लेखी मोजू नकोस!” ह्या प्रार्थनेनंतर त्याने प्राण सोडला.