प्रेषितांची कृत्ये 26
26
अग्रिप्पापुढे पौलाने केलेले भाषण
1मग अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “तुला स्वतःच्या तर्फे बोलण्यास परवानगी आहे. तेव्हा पौलाने हात पुढे करून प्रत्युत्तर केले :
2,3“अग्रिप्पा राजे, यहूद्यांच्या चालीरीती व त्यांच्या वादविषयक बाबी ह्यांत आपण विशेष जाणते आहात, आणि यहूदी ज्यांविषयी माझ्यावर दोषारोप ठेवतात त्या सर्वांविषयी मला आज आपणापुढे प्रत्युत्तर करायचे आहे, ह्यावरून मी स्वतःला धन्य समजतो; आणि मी आपल्याला विनंती करतो की, शांतपणे माझे भाषण ऐकून घ्यावे.
4तरुणपणापासून म्हणजे अगदी पहिल्यापासून माझ्या लोकांत व यरुशलेमेत माझे वर्तन कसे होते हे सर्व यहूद्यांना माहीत आहे.
5ते पहिल्यापासून मला ओळखतात; म्हणून त्यांची मर्जी असल्यास ते साक्ष देतील की, आमच्या धर्माच्या अत्यंत कडकडीत पंथाप्रमाणे मी परूशी होतो.
6आता देवाने आमच्या पूर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरता मी उभा आहे;
7ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे बारा वंश देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करत आहेत. महाराज, तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर यहूद्यांनी आरोप ठेवला आहे.
8देव मेलेल्यांना उठवतो हे तुमच्यापैकी कित्येकांना अविश्वसनीय का वाटावे?
9मलाही खरोखर वाटत असे की, नासोरी येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्यात;
10आणि तसे मी यरुशलेमेत केलेही; मी मुख्य याजकांपासून अधिकार मिळवून पुष्कळ पवित्र जनांना तुरुंगात कोंडून टाकले; आणि त्यांचा घात होत असताना मी संमती दिली.
11प्रत्येक सभास्थानात त्यांना वारंवार शासन करून त्यांना दुर्भाषण करायला लावण्याचा प्रयत्न मी करत असे; त्यांच्यावर अतिशय पिसाळून जाऊन बाहेरच्या नगरांपर्यंतदेखील मी त्यांचा पाठलाग करत असे.
12हे चालू असता, मुख्य याजकांकडून अखत्यार व अधिकारपत्र मिळवून, मी दिमिष्काकडे चाललो होतो.
13तेव्हा अहो राजे, वाटेवर दोन प्रहरी सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश आकाशातून माझ्या व माझ्याबरोबर चालणार्या माणसांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला.
14तेव्हा आम्ही सर्व जमिनीवर पडलो. इतक्यात इब्री भाषेत माझ्याबरोबर बोलताना मी अशी वाणी ऐकली की, ‘शौला, शौला, माझा छळ का करतोस? पराणीवर लाथ मारणे तुला कठीण.’
15मी म्हटले, ‘प्रभो, तू कोण आहेस?’ प्रभू म्हणाला, ‘ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.
16तर ऊठ व आपल्या पायांवर उभा राहा; कारण मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की, तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे, त्याचा सेवक व साक्षी असे तुला नेमावे.
17ह्या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन.
18मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस, आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.’
19म्हणून, अहो राजे अग्रिप्पा, मी तो स्वर्गीय दृष्टान्त अवमानला नाही;
20तर पहिल्याने दिमिष्कातील लोकांना व यरुशलेमेत, अवघ्या यहूदीया देशात व परराष्ट्रीय लोकांत मी उपदेश करत आलो की, पश्चात्ताप करा आणि पश्चात्तापास शोभतील अशी कृत्ये करून देवाकडे वळा.
21ह्या कारणामुळे यहूदी मला मंदिरात धरून ठार मारायला पाहत होते.
22तथापि देवापासून साहाय्य प्राप्त झाल्यामुळे मी आजपर्यंत लहानमोठ्यांस साक्ष देत राहिलो आहे; आणि ज्या गोष्टी होणार आहेत म्हणून संदेष्ट्यांनी व मोशेने सांगितले, त्यांखेरीज मी दुसरे काही सांगत नाही.
23त्या अशा की, ख्रिस्ताने दुःख सोसणारे व्हावे आणि त्यानेच मेलेल्यांतून उठणार्यांपैकी पहिले होऊन आमच्या लोकांना व परराष्ट्रीयांनाही प्रकाश प्रकट करावा.”
24ह्याप्रमाणे तो प्रत्युत्तर करत असता, फेस्त मोठ्याने बोलला, “पौला, तू वेडा आहेस; विद्येचे अध्ययन फार झाल्यामुळे तुझे डोके फिरले आहे.”
25पौल म्हणाला, “फेस्त महाराज, मी वेडा नाही, तर मी खरेपणाच्या व सुज्ञपणाच्या गोष्टी बोलतो.
26ह्या गोष्टी राजे अग्रिप्पा ह्यांना ठाऊक आहेत; त्यांच्यासमोर मी मनमोकळेपणे बोलतो. ह्यांतले त्यांच्यापासून काही गुप्त नाही अशी माझी खातरी आहे; कारण हे कोनाकोपर्यात घडलेले नाही.
27अहो राजे अग्रिप्पा, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? विश्वास आहे, हे मला ठाऊक आहे.”
28तेव्हा अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवतोस!”
29पौल म्हणाला, “थोडके किंवा फार, कसेही असो; पण केवळ आपणच नव्हे, तर आज हे जे सर्व माझे भाषण ऐकत आहेत त्यांनी ह्या बंधनांशिवाय माझ्यासारखे व्हावे अशी देवाजवळ माझी प्रार्थना आहे.”
30त्याने असे म्हटल्यावर राजा, सुभेदार, बर्णीका व त्यांच्याबरोबर जे बसले होते ते उठले;
31आणि एकीकडे जाऊन आपापसांत म्हणाले, “ह्या माणसाने मरणास किंवा बंधनास पात्र व्हावे असे काही केले नाही.”
32तेव्हा अग्रिप्पाने फेस्ताला म्हटले, “ह्या माणसाने कैसराजवळ न्याय मागितला नसता तर त्याला मोकळे करता आले असते.”
सध्या निवडलेले:
प्रेषितांची कृत्ये 26: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.