मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्णीका ही दोघे कैसरीयास येऊन फेस्ताला भेटली. तेथे ती पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, “फेलिक्साने बंदीत ठेवलेला एक माणूस येथे आहे. मी यरुशलेमेस गेलो होतो तेव्हा त्याच्यावर यहूद्यांच्या मुख्य याजकांनी व वडिलांनी फिर्याद करून त्याच्याविरुद्ध ठराव व्हावा म्हणून विनंती केली. त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरता सोपवून देण्याची रोमी लोकांची रीत नाही. म्हणून ते येथे आल्यावर काही उशीर न करता, दुसर्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या माणसाला आणण्याचा हुकूम केला. वादी उभे असता ज्या वाईट गोष्टींचा त्याच्याविषयी माझ्या मनात संशय आला होता, त्यांबाबत एकही आरोप त्यांनी त्याच्यावर ठेवला नाही; केवळ त्यांच्या धर्माविषयी व जो जिवंत आहे असे पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू, ह्याच्याविषयी ह्याचा व त्यांचा वाद होता. तेव्हा ह्याची चौकशी कशी करावी हे मला सुचेना म्हणून मी त्याला विचारले, ‘यरुशलेमेस जाऊन तेथे ह्या गोष्टींविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय?’ तेव्हा ‘बादशहाच्या निकालासाठी मला ठेवावे’ अशी पौलाने मागणी केल्यावरून मी हुकूम केला की, ‘ह्याला कैसराकडे पाठवीपर्यंत कैदेत ठेवावे.”’ अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, “त्या माणसाचे म्हणणे ऐकावे असे माझ्याही मनात आहे,” त्याने उत्तर दिले, “उद्या आपल्याला त्याचे म्हणणे ऐकायला मिळेल.” दुसर्या दिवशी अग्रिप्पा व बर्णीका ही मोठ्या थाटामाटाने येऊन सरदार व नगरातील मुख्य लोक ह्यांच्यासह दरबारात गेली आणि फेस्ताने हुकूम दिल्यावर पौलाला तेथे आणण्यात आले. तेव्हा फेस्त म्हणाला, “अग्रिप्पा राजे व आमच्याबरोबर उपस्थित असलेले सर्व जनहो, ह्या माणसाला तुम्ही पाहता ना? ‘ह्याला ह्यापुढे जिवंत ठेवू नये’ असे ओरडत यहूद्यांच्या सर्व समुदायाने यरुशलेमेस व येथेही मला अर्ज केला. परंतु त्याने मरणदंडास योग्य असे काही केले नाही असे मला कळून आले, आणि त्याने स्वतः बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला पाठवण्याचे मी ठरवले. ह्याविषयी मी आपल्या स्वामीला निश्चित असे लिहिण्यासारखे काही नाही, तुमच्यापुढे व विशेषेकरून अग्रिप्पा राजे, आपणापुढे ह्याला आणले आहे; अशा हेतूने की, चौकशी झाली म्हणजे मला काहीतरी लिहिण्यास सापडेल. कारण बंदिवानास पाठवताना त्याच्यावरील दोषारोप न कळवणे मला ठीक दिसत नाही.”
प्रेषितांची कृत्ये 25 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 25
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 25:13-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ