YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 12:1-25

प्रेषितांची कृत्ये 12:1-25 MARVBSI

त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला. आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले. ते यहूदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरता त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहार्‍यात होता; परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता त्या रात्री दोन बेड्या घातलेला असा पेत्र दोन शिपायांच्या मध्ये निजला होता, आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते. तेव्हा पाहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला; त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, “लवकर ऊठ.” तेव्हा त्याच्या हातांतील साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, “कंबर बांध व पायांत वहाणा घाल;” त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, “तू आपले वस्त्र पांघरून माझ्यामागे ये.” तो निघून त्याच्यामागे गेला; तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे हे त्याला कळेना; आपण दृष्टान्त पाहत आहोत असेच त्याला वाटले. नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर, तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला; आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले, तेव्हा लगेच देवदूत त्याला सोडून गेला. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला खरोखर कळले की, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.” हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरीया हिच्या घरी गेला; तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते. तो दरवाजाची दिंडी ठोकत असता रुदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली. तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण आनंद झाल्यामुळे दरवाजा न उघडता आत धावत जाऊन तिने सांगितले की, ‘पेत्र दाराशी उभा आहे.’ त्यांनी तिला म्हटले, “तू बावचळलीस.” तरी तिने खातरीपूर्वक सांगितले की, “मी म्हणते तसेच आहे.” ते म्हणाले, “तो त्याचा देवदूत आहे!” मग पेत्र तसाच ठोकत राहिला असता त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थक्क झाले. तेव्हा ‘उगे राहा,’ म्हणून त्याने हाताने त्यांना खुणावले, आणि आपल्याला प्रभूने कसे बाहेर काढले हे त्याने त्यांना सविस्तर सांगितले आणि म्हटले की, “हे याकोबाला व बंधुजनांना सांगा.” नंतर तो दुसर्‍या ठिकाणी निघून गेला. मग दिवस उगवल्यावर, पेत्राचे काय झाले ह्याविषयी शिपायांत मोठी खळबळ उडाली. हेरोदाने त्याचा शोध केला असताही शोध लागला नाही; म्हणून त्याने पहारेकर्‍यांची चौकशी करून त्यांना ठार मारण्याचा हुकूम सोडला. मग तो यहूदीयाहून कैसरीयात येऊन राहिला. हेरोद सोरकरांवर व सीदोनकरांवर रागावला होता; म्हणून ते एकमताने त्याच्याकडे आले; व राजाच्या रंगमहालावरील अधिकारी ब्लस्त ह्याला अनुकूल करून घेऊन, त्यांनी समेट करण्याची विनंती केली, कारण त्या राजाच्या देशावर त्यांच्या देशाचे पोषण होत असे. नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. तेव्हा लोक गजर करून बोलले, “ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे.” त्याने देवाचा गौरव केला नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. पण देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला. बर्णबा व शौल हे आपली सेवा पूर्ण करून, ज्याला मार्कही म्हणत त्या योहानाला बरोबर घेऊन यरुशलेमेहून माघारी आले.

प्रेषितांची कृत्ये 12:1-25 साठी चलचित्र