मग त्याने त्यांना आत बोलावून त्यांचा पाहुणचार केला. दुसर्या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला आणि यापोतील बंधुजनांपैकी कित्येक त्याच्याबरोबर गेले. तिसर्या दिवशी तो कैसरीयास पोहचला तेव्हा कर्नेल्य आपल्या नातलगांना व इष्टमित्रांना जमवून त्यांची वाट पाहत होता. पेत्र आत जात असता कर्नेल्य त्याला सामोरा गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले. पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, “उभे राहा; मीही मनुष्यच आहे.” मग तो त्याच्याबरोबर बोलत बोलत आत गेला, तेव्हा त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळून आले. त्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला ठाऊकच आहे की, यहूदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणेयेणे ठेवणे हे त्याच्या रीतीरिवाजाविरुद्ध आहे; तथापि कोणाही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखवले आहे. म्हणून मला बोलावल्याबरोबर मी काकू न करता आलो आहे. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलावले?” तेव्हा कर्नेल्य म्हणाला, “आज चार दिवस झाले, मी आपल्या घरी तिसर्या प्रहरी प्रार्थना [व उपास] करत होतो; तेव्हा पाहा, तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष माझ्यापुढे उभा राहून म्हणाला, ‘कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि देवासमोर तुझ्या दानधर्माचे स्मरण करण्यात आले आहे. तर यापोस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन ह्याला बोलावून आण; तो समुद्राच्या काठी कातडे कमावणार्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे.’ [तो आल्यावर तुझ्याशी बोलेल]. म्हणून मी आपणाकडे माणसांना तत्काळ पाठवले. आपण आलात हे बरे केले. तर आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञापिले आहे ते ऐकावे म्हणून आम्ही सर्व जण येथे देवासमोर हजर आहोत.” तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला : “‘देव पक्षपाती नाही’, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे. येशू ख्रिस्त (तोच सर्वांचा प्रभू आहे) ह्याच्या द्वारे देवाने ‘शांतीच्या सुवार्तेची घोषणा करताना आपले जे वचन इस्राएलाच्या’ संततीस पाठवले ते हे. योहानाने बाप्तिस्म्याची घोषणा केल्यानंतर गालीलापासून प्रारंभ होऊन सर्व यहूदीयामध्ये घडलेली गोष्ट तुम्हांला तर माहीतच आहे. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला; कारण देव त्याच्याबरोबर होता. आणि त्याने यहूद्यांच्या देशात व यरुशलेमेत जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत. त्यांनी त्याला खांबावर टांगून मारले; पण त्याला देवाने तिसर्या दिवशी उठवले व त्याने प्रकट व्हावे असे केले. तरी हे प्रकटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण जे साक्षी देवाने पूर्वी निवडले त्या आम्हांला केले; त्या आम्ही तो मेलेल्यांतून उठल्यानंतर त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. त्याने आम्हांला अशी आज्ञा केली की, ‘लोकांना उपदेश करा व अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जिवंताचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे.’ त्याच्यावर विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात.” पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणार्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला.
प्रेषितांची कृत्ये 10 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 10:23-44
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ