प्रेषितांची कृत्ये 10:23-44
प्रेषितांची कृत्ये 10:23-44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पेत्राने त्यांना आत बोलावून घेतले व रात्रभर मुक्काम करण्यास सांगितले, दुसऱ्या दिवशी पेत्र तयार झाला व त्या तीन मनुष्याबरोबर गेला, यापो येथील काही बंधूही पेत्राबरोबर गेले. दुसऱ्या दिवशी पेत्र कैसरीया शहरात आला, कर्नेल्य त्याची वाट पाहत होता, त्याने आपले जवळचे मित्र व नातेवाईक यांनाही आपल्या घरी जमा केले होते. जेव्हा पेत्र आत गेला, तेव्हा कर्नेल्य त्यास भेटला, कर्नेल्याने पेत्राच्या पाया पडून आदराने त्यास नमन केले. पण पेत्र म्हणाला, “उभा राहा, मी तुझ्यासारखाच मनुष्य आहे.” पेत्र त्याच्याशी बोलत घरात गेला आणि आतमध्ये बरेच लोक जमलेले त्याने पाहिले. पेत्र त्या लोकांस म्हणाला, “तुम्ही हे जाणता की, यहूदी मनुष्याने इतर विदेशी लोकांच्या घरी जाणे किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहूदी नियमाला धरुन नाही, पण देवाने मला दाखविले आहे की, मी इतर मनुष्यमात्राला अशुद्ध किंवा अपवित्र मानू नये. याच कारणासाठी जेव्हा हे लोक मला बोलावण्यास आले, तेव्हा मी त्यांच्याशी वाद घातला नाही, आता, कृपाकरून मला सांगा, तुम्ही मला येथे का बोलावले?” कर्नेल्य म्हणाला, “चार दिवसांपूर्वी, माझ्या घरांमध्ये मी प्रार्थना करीत होतो, बरोबर याच वेळेला म्हणजे दुपारचे तीन वाजता मी प्रार्थना करीत होतो, अचानक एक मनुष्य माझ्यासमोर उभा राहिला, त्याने लखलखीत, चमकदार कपडे घातले होते.” तो मनुष्य म्हणाला, “कर्नेल्या देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, गरीब लोकांस ज्या वस्तू तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे, देव तुझी आठवण करतो. म्हणून यापो या शहरी काही माणसे पाठव व शिमोन पेत्राला बोलावून घे, पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे. तेव्हा मी लागलीच तुम्हास निरोप पाठविला, तुम्ही येथे आलात ही तुमची मोठी कृपा आहे, तेव्हा आम्हास जे काही सांगण्याची आज्ञा प्रभूने तुम्हास दिली आहे, ते ऐकण्यासाठी आम्ही सर्व आता येथे देवासमोर जमलेले आहोत.” पेत्राने बोलायला सुरुवात केली मला आता हे खरोखर समजले आहे की, “देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे. प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भक्ती करतो आणि योग्य ते करतो, त्यास देव स्वीकारतो, व्यक्ती कोणत्या देशाची आहे, हे महत्त्वाचे नाही. देव इस्राएली लोकांशी बोलला, देवाने त्यांना सुवार्ता पाठविली की, येशू ख्रिस्ताद्वारे शांती जगात आली आहे, येशू सर्वांचा प्रभू आहे. सगळ्या यहूदीया प्रांतात काय घडले हे तुम्हा सर्वांना माहीत आहे, त्याची सुरुवात योहानाने लोकांस बाप्तिस्म्याविषयी गालील प्रांतात जो संदेश दिला, त्याने झाली. नासरेथच्या येशूविषयी तुम्हास माहिती आहे, देवाने त्यास पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला, येशू सगळीकडे लोकांसाठी चांगल्या गोष्टी करीत गेला, जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले, कारण देव त्याच्याबरोबर होता. येशूने संपूर्ण यहूदीया प्रांतात आणि यरूशलेम शहरात जे जे केले त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, पण येशूला मारण्यात आले, लाकडाच्या वधस्तंभावर त्यांनी त्यास टांगून मारले. परंतु देवाने तिसऱ्या दिवशी त्यास जिवंत केले देवाने येशूला लोकांस स्पष्ट पाहू दिले. परंतु सर्वच माणासांनी येशूला पाहिले नाही, देवाने त्यांना अगोदरच साक्षीदार म्हणून निवडले होते, त्यांनीच त्यास पाहिले, ते साक्षीदार आम्ही आहोत येशू मरणातून उठविला गेल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर अन्नपाणी सेवन केले. येशूने आम्हास ‘लोकांस उपदेश करायला सांगितले, जिवंतांचा आणि मरण पावलेल्यांचा न्याय करण्यासाठी देवाने त्यास आपल्याला आहे’ हे सांगण्यासाठी त्याने आम्हास आज्ञा केली. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, त्यास क्षमा केली जाईल, येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तीच्या पापांची क्षमा करील, सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात.” पेत्र हे बोलत असतानाच त्याचे बोलणे ऐकत बसलेल्या सर्व लोकांवर पवित्र आत्मा उतरला.
प्रेषितांची कृत्ये 10:23-44 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा पेत्राने त्या माणसांना पाहुणे म्हणून घरात बोलाविले. दुसर्या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला, योप्पातील काही विश्वासी बंधूही त्याच्याबरोबर गेले. दुसर्या दिवशी ते कैसरीयास पोहोचले. कर्नेल्य त्यांची वाटच पाहत होता, त्याने आपले नातेवाईक व जवळचे मित्र यांना एकत्रित बोलाविले होते. पेत्राने घरात प्रवेश करताच, कर्नेल्याने त्याची भेट घेतली आणि आदराने त्याच्या पाया पडला. परंतु पेत्राने त्याला उभे केले व म्हणाला, “उभे राहा, मी स्वतः तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे.” त्याच्याशी बोलत असताना, पेत्र आत गेला आणि तिथे त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळले. तेव्हा पेत्र त्यांना म्हणाला: “माझ्यासारख्या यहूदी व्यक्तीने गैरयहूदीयाला भेटणे व त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहूदी नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे हे तुम्हाला माहीतच आहे. परंतु परमेश्वराने मला दाखवून दिले आहे की, मी कोणालाही अपवित्र किंवा अशुद्ध लेखू नये. म्हणूनच मला बोलाविणे आल्याबरोबर, काहीही हरकत न घेता मी लगेच आलो. आता तुम्ही मला कशासाठी बोलाविले ते सांगा?” कर्नेल्याने उत्तर दिले: “तीन दिवसांपूर्वी माझ्या घरी याच वेळेस दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, मी प्रार्थना करीत होतो. तेव्हा तेजस्वी झगा घातलेला एक पुरुष एकाएकी माझ्यासमोर उभा राहिला. आणि मला म्हणाला, ‘कर्नेल्या, परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तू गरिबांना केलेल्या दानधर्माची त्यांनी आठवण केली आहे. आता योप्पा येथे शिमोन ज्याला पेत्र म्हणतात त्याला बोलावून घे. ज्याचे घर समुद्राकाठी आहे त्या शिमोन चांभाराच्या घरी तो पाहुणा आहे.’ म्हणून मी ताबडतोब तुम्हाला बोलावून घेतले आहे, तुम्ही आला हे बरे झाले. आपण सर्व येथे परमेश्वराच्या समक्षतेत आहोत आणि प्रभूने जे सर्वकाही सांगण्याची आज्ञा देऊन तुम्हाला पाठविले आहे ते सांगा.” मग पेत्र बोलू लागला: “मला अगदी स्पष्टपणे कळून आले आहे की परमेश्वर पक्षपात करीत नाहीत, परंतु प्रत्येक राष्ट्रांमध्ये जे त्यांचे भय धरतात व योग्य तेच करतात त्या सर्वांना ते स्वीकारतात. तुम्हाला माहीत आहे की, परमेश्वराने इस्राएलच्या लोकांसाठी येशू ख्रिस्ताद्वारे जे सर्वांचे प्रभू आहेत, शांतीच्या शुभवार्तेची घोषणा करीत त्यांचा संदेश पाठविला. योहानाने बाप्तिस्म्याबद्दल संदेश दिल्यानंतर गालीलापासून सुरुवात होऊन संपूर्ण यहूदीयामध्ये काय घडून आले हे तुम्हाला चांगले माहीत आहे, कशाप्रकारे परमेश्वराने नासरेथकर येशूंना पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला आणि ते सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बरे करीत फिरत होते, कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर होते. “त्या यहूदीयांच्या देशामध्ये व यरुशलेममध्ये त्यांनी ज्या सर्वगोष्टी केल्या त्यांचे आम्ही साक्षी आहोत. त्यांनी त्यांना क्रूसावर खिळून मारले, परंतु परमेश्वराने तीन दिवसानंतर त्यांना मरणातून पुन्हा जिवंत केले व लोकांसमोर प्रकट केले. जरी ते सर्व लोकांसमोर प्रकट झाले नाहीत, परंतु जे ज्यांना परमेश्वराने पूर्वीच निवडून ठेवले होते त्या साक्षीदारांसमक्ष म्हणजे आम्हाला, मरणातून उठल्यानंतर ते प्रकट झाले व त्यांनी आमच्याबरोबर खाणेपिणे केले. त्यांनी आम्हाला अशी आज्ञा केली आहे की, लोकांस उपदेश करा व साक्ष द्या, परमेश्वराने नेमलेले जिवंतांचे व मेलेल्यांचे न्यायाधीश हेच आहेत. सर्व संदेष्ट्यांनी येशूंबद्दल अशी साक्ष दिली आहे की जो प्रत्येकजण त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्यांच्या नावाने पापक्षमा मिळते.” पेत्र हे वचन बोलत असतानाच, सर्व संदेश ऐकणार्यांवर पवित्र आत्मा उतरला.
प्रेषितांची कृत्ये 10:23-44 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग त्याने त्यांना आत बोलावून त्यांचा पाहुणचार केला. दुसर्या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला आणि यापोतील बंधुजनांपैकी कित्येक त्याच्याबरोबर गेले. तिसर्या दिवशी तो कैसरीयास पोहचला तेव्हा कर्नेल्य आपल्या नातलगांना व इष्टमित्रांना जमवून त्यांची वाट पाहत होता. पेत्र आत जात असता कर्नेल्य त्याला सामोरा गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले. पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, “उभे राहा; मीही मनुष्यच आहे.” मग तो त्याच्याबरोबर बोलत बोलत आत गेला, तेव्हा त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळून आले. त्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला ठाऊकच आहे की, यहूदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणेयेणे ठेवणे हे त्याच्या रीतीरिवाजाविरुद्ध आहे; तथापि कोणाही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखवले आहे. म्हणून मला बोलावल्याबरोबर मी काकू न करता आलो आहे. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलावले?” तेव्हा कर्नेल्य म्हणाला, “आज चार दिवस झाले, मी आपल्या घरी तिसर्या प्रहरी प्रार्थना [व उपास] करत होतो; तेव्हा पाहा, तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष माझ्यापुढे उभा राहून म्हणाला, ‘कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि देवासमोर तुझ्या दानधर्माचे स्मरण करण्यात आले आहे. तर यापोस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन ह्याला बोलावून आण; तो समुद्राच्या काठी कातडे कमावणार्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे.’ [तो आल्यावर तुझ्याशी बोलेल]. म्हणून मी आपणाकडे माणसांना तत्काळ पाठवले. आपण आलात हे बरे केले. तर आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञापिले आहे ते ऐकावे म्हणून आम्ही सर्व जण येथे देवासमोर हजर आहोत.” तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला : “‘देव पक्षपाती नाही’, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे. येशू ख्रिस्त (तोच सर्वांचा प्रभू आहे) ह्याच्या द्वारे देवाने ‘शांतीच्या सुवार्तेची घोषणा करताना आपले जे वचन इस्राएलाच्या’ संततीस पाठवले ते हे. योहानाने बाप्तिस्म्याची घोषणा केल्यानंतर गालीलापासून प्रारंभ होऊन सर्व यहूदीयामध्ये घडलेली गोष्ट तुम्हांला तर माहीतच आहे. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला; कारण देव त्याच्याबरोबर होता. आणि त्याने यहूद्यांच्या देशात व यरुशलेमेत जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत. त्यांनी त्याला खांबावर टांगून मारले; पण त्याला देवाने तिसर्या दिवशी उठवले व त्याने प्रकट व्हावे असे केले. तरी हे प्रकटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण जे साक्षी देवाने पूर्वी निवडले त्या आम्हांला केले; त्या आम्ही तो मेलेल्यांतून उठल्यानंतर त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. त्याने आम्हांला अशी आज्ञा केली की, ‘लोकांना उपदेश करा व अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जिवंताचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे.’ त्याच्यावर विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात.” पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणार्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला.
प्रेषितांची कृत्ये 10:23-44 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पेत्राने त्यांना आत बोलावून त्यांना रात्रभर तेथे ठेवून घेतले. दुसऱ्या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला आणि यापो येथील बंधुजनांपैकी काही जण त्याच्याबरोबर गेले. दुसऱ्या दिवशी तो कैसरिया येथे पोहचला तेव्हा कर्नेल्य आपल्या नातलगांस व इष्टमित्रांस जमवून त्याची वाट पाहत होता. पेत्र आत जात असता कर्नेल्य त्याला सामोरा गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले. पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, “उभा राहा, मीही मनुष्यच आहे.” मग तो त्याच्याबरोबर बोलत बोलत आत गेला, तेव्हा त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळून आले. त्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला ठाऊकच आहे की, यहुदी मनुष्याने अन्य लोकांबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्यांच्याकडे येAजा करणे हे त्याच्या रीतिरिवाजांविरुद्ध आहे. तथापि कोणाही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये, असे देवाने मला सांगितले आहे. म्हणून मला बोलाविल्याबरोबर मी आढेवेढे न घेता आलो आहे. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलावले?” कर्नेल्य म्हणाला, “आज चार दिवस झाले, मी दुपारी तीनच्या सुमारास आपल्या घरी प्रार्थना करत होतो. ही प्रार्थना करीत असताना तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष माझ्यासमोर उभा राहून मला म्हणाला, ‘कर्नेल्य, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझ्या दानधर्माचे स्मरण देवासमोर करण्यात आले आहे. तर यापो येथे कोणाला पाठवून पेत्र या नावाने राहणाऱ्या शिमोनाला बोलावून आण, तो समुद्रकिनारी शिमोन चर्मकाराच्या घरी पाहुणा आहे.’ म्हणून मी माणसांना आपल्याकडे तत्काळ पाठवले. आपण आलात हे बरे केले. तर आता प्रभूने जे काही आपल्याला निर्देश देऊन सांगितले आहे, ते ऐकावे म्हणून आम्ही सर्व जण येथे देवासमोर हजर आहोत.” पेत्राने बोलण्यास आरंभ केला: ‘देव पक्षपाती नाही, हे आता माझ्या पक्के ध्यानात आले आहे. प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे. येशू सर्वांचा प्रभू आहे व त्याच्याद्वारे देवाने शांतीच्या शुभवर्तमानाची घोषणा करताना आपला जो संदेश इस्राएलच्या संततीस पाठवला तो तुम्हांला ठाऊक आहे. योहानने बाप्तिस्मा घोषित केल्यानंतर गालीलपासून प्रारंभ होऊन तो संदेश सर्व यहुदियामध्ये पसरला. नासरेथकर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला कारण देव त्याच्याबरोबर होता. त्याने यहुदी लोकांच्या देशात व यरुशलेम नगरात जे काही केले त्या सर्वांचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यांनी त्याला क्रुसावर चढवून मारले. परंतु त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले व त्याला प्रकट केले. पण ते प्रकटीकरण सर्व लोकांसमोर न करता जे साक्षीदार देवाने पूर्वी निवडले होते त्या आम्हांसमोर केले; तो मेलेल्यांतून उठल्यानंतर त्याच्याबरोबर आम्ही खाणेपिणे केले. त्याने आम्हांला अशी आज्ञा केली की, लोकांना घोषणा करुन सांगा व अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल, अशी साक्ष सर्व संदेष्ट्ये त्याच्याविषयी देतात.” पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांमध्ये पवित्र आत्मा उतरला.