२ शमुवेल 8
8
दावीद आपल्या राज्याचा विस्तार करतो
(१ इति. 18:1-13)
1ह्यानंतर दाविदाने पलिष्ट्यांना मार देऊन अंकित केले आणि त्यांच्या मेगेथ-अम्माची (मातृनगराची) सत्ता त्यांच्या हातून काढून घेतली.
2मग त्याने मवाबास मार दिला; त्यांना जमिनीवर निजवून दोरीने मापले आणि जे दोन दोर्या भरले त्यांना ठार मारले, व जे एक दोरी भरले त्यांना सोडून दिले. मवाबी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले.
3सोबाचा राजा रहोबपुत्र हददेजर हा महानदाजवळ आपली सत्ता पुन्हा स्थापित करू पाहत होता त्याचा दाविदाने मोड केला.
4दाविदाने एक हजार सातशे स्वार आणि वीस हजार पायदळ त्याच्यापासून हस्तगत केले; रथांच्या सर्व घोड्यांच्या शिरा दाविदाने तोडल्या, मात्र त्यांतून शंभर घोडे राखून ठेवले.
5आणि दिमिष्क येथील अरामी लोक सोबाचा राजा हददेजर ह्याची कुमक करायला आले तेव्हा दाविदाने त्यांतल्या बावीस हजार लोकांचा संहार केला.
6मग दाविदाने दिमिष्काच्या आसमंतातील अराम प्रांतात ठाणी बसवली; अरामी दाविदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. जिकडे-जिकडे दावीद जाई तिकडे-तिकडे परमेश्वर त्याला यश देई.
7हददेजर राजाच्या सेवकांजवळ सोन्याच्या ढाली होत्या त्या दाविदाने घेऊन यरुशलेमेस आणल्या.
8हददेजर ह्याची बेटा व बेरोथा ही नगरे होती, तेथून दावीद राजाने पुष्कळ पितळ आणले.
9दाविदाने हददेजराची सारी सेना मारली हे हमाथाचा राजा तोई ह्याच्या कानावर गेले.
10दाविदाने हददेजराशी युद्ध करून त्याचा मोड केला होता म्हणून तोई राजाने दावीद राजाचे क्षेमकुशल विचारायला व त्याचे अभिनंदन करायला आपला पुत्र योराम ह्याला त्याच्याकडे पाठवले; कारण हददेजर व तोई ह्यांच्या लढाया होत असत. योरामाने आपल्याबरोबर चांदीची, सोन्याची व पितळेची पात्रे आणली;
11सर्व जिंकलेल्या राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदीसोन्याबरोबर हीही पात्रे दावीद राजाने परमेश्वराला अर्पण केली;
12अरामी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी, अमालेकी आणि सोबाचा राजा रहोबपुत्र हददेजर ह्या सर्वांपासून मिळवलेली ही लूट होती.
13दावीद क्षार खोर्यात अठरा हजार अराम्यांना मारून परत आला तेव्हा त्याचे नाव झाले.
14त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसवली; अदोमाच्या सर्व प्रांतांत त्याने ठाणी बसवली व सर्व अदोमी लोक दाविदाचे अंकित झाले. दावीद जेथे जेथे गेला तेथे तेथे परमेश्वराने त्याला यश दिले.
दाविदाचे अंमलदार
(२ शमु. 20:23-26; १ इति. 18:14-17)
15दाविदाने सर्व इस्राएलावर राज्य केले; तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व निष्पक्षपातीपणे वागे.
16त्याचा मुख्य सेनापती सरूवेचा पुत्र यवाब हा होता व त्याचा अखबारनवीस (इतिहासलेखक) अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा होता;
17अहीटुबाचा पुत्र सादोक आणि अब्याथाराचा पुत्र अहीमलेख हे याजक होते, आणि सराया हा चिटणीस होता;
18करेथी व पलेथी (व्यक्तिगत सुरक्षाधिकारी) ह्यांच्यावर यहोयादाचा पुत्र बनाया हा होता; दाविदाचे पुत्र मंत्री होते.
सध्या निवडलेले:
२ शमुवेल 8: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.