मग दावीद राजा आत जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला, “हे प्रभू देवा, मी कोण व माझे घराणे ते काय की तू मला येथवर आणावेस?” हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे; तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बर्याच काळाचे सांगून ठेवले आहेस; प्रभू परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे केले आहेस. दावीद तुझ्यापुढे आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू आपल्या सेवकाला ओळखतोस. तू आपल्या वचनास्तव व आपल्या मनास आले म्हणून हे थोर कृत्य करून ते आपल्या सेवकाच्या निदर्शनास आणून दिले आहेस. ह्यास्तव हे प्रभू परमेश्वरा, तू थोर आहेस; जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही; तुझ्याशिवाय अन्य देव नाही. तुझ्या इस्राएल प्रजेसमान भूतलावर दुसरे कोणते तरी राष्ट्र आहे काय? आपली प्रजा करून घेण्यासाठी इस्राएलास सोडवण्यास तू गेलास, आपले नाव केलेस, त्यांच्यासाठी महत्कृत्ये केलीस, आपल्या लोकांना मिसर देशातून इतर राष्ट्रांच्या व देवांच्या हातांतून सोडवून घेतले आणि त्यांच्यादेखत आपल्या देशासाठी भयानक कृत्ये केलीस; असे करायला कोणत्या राष्ट्राचा देव गेला होता? इस्राएल लोकांनी तुझी निरंतरची प्रजा व्हावे म्हणून तू त्यांची स्थापना केलीस; हे परमेश्वरा, तू त्यांचा देव झालास. तर आता, हे प्रभू परमेश्वरा, आपला सेवक व त्याचे घराणे ह्यांविषयी जे वचन तू दिलेस ते कायमचे सिद्धीस ने आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे कर. सेनाधीश परमेश्वर इस्राएलावर सत्ताधीश आहे असे म्हणून लोकांनी तुझ्या नामाचा निरंतर महिमा वाढवावा आणि तुझा सेवक दावीद ह्यांचे घराणे तुझ्यासमोर स्थापित व्हावे. कारण, हे सेनाधीश परमेश्वरा, हे इस्राएलाच्या देवा, तू माझे कान उघडून सांगितलेस की, मी तुझे घराणे स्थापीन; म्हणून ही विनंती तुला करायचे धैर्य तुझ्या सेवकाला झाले. आता हे प्रभू परमेश्वरा, तूच देव आहेस व तुझी वचने सत्य आहेत; आणि तू आपल्या सेवकाला अशा प्रकारे बरे करण्याचे वचन दिले आहेस; तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्याला अशी बरकत दे की ते तुझ्या दृष्टीसमोर निरंतर कायम राहील; कारण, हे प्रभू परमेश्वरा, तूच हे म्हटले आहेस; तुझ्या सेवकाच्या घराण्याचे तुझ्या आशीर्वादाने सदा अभीष्ट होवो.”
२ शमुवेल 7 वाचा
ऐका २ शमुवेल 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ शमुवेल 7:18-29
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ