नंतर दाविदाने पुन्हा एकदा इस्राएलातले तीस हजार निवडक पुरुष जमा केले. यहूदातील बाला येथून देवाचा कोश आणावा म्हणून दावीद आपल्याजवळच्या सगळ्या लोकांना घेऊन गेला; करूबारूढ असलेला सेनाधीश परमेश्वर ह्याच्या नामाचा हा कोश. त्यांनी देवाचा कोश एका नव्या गाडीत ठेवून टेकडीवरील अबीनादाबाच्या घरातून बाहेर काढला, अबीनादाबाचे पुत्र उज्जा व अह्यो हे दोघे ती नवी गाडी हाकत होते. त्यांनी देवाच्या कोशासहित ती गाडी टेकडीवरील अबीनादाबाच्या घरातून बाहेर काढली; अह्यो हा कोशापुढे चालत होता. दावीद व इस्राएल घराण्याचे सर्व लोक देवदारूच्या लाकडाची नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरू व झांजा परमेश्वरापुढे वाजवीत चालले. नाखोनाच्या खळ्याजवळ ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने देवाचा कोश हात लांब करून धरला. तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला; त्याच्या ह्या चुकीमुळे परमेश्वराने त्याला ताडन केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशाजवळ गतप्राण झाला. परमेश्वराने उज्जाला तडाका दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला. त्याने त्या ठिकाणाचे नाव पेरेस-उज्जा (उज्जा-हनन) ठेवले; ते नाव आजवर चालत आहे. त्या दिवशी दाविदाला परमेश्वराचा धाक वाटून तो म्हणाला, “देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा?” दावीद परमेश्वराचा कोश दावीदपुरात घेऊन जाण्यास कबूल होईना; त्याने तो ओबेद-अदोम गित्ती ह्याच्या घरी एका बाजूस नेऊन ठेवला. परमेश्वराचा कोश ओबेद-अदोम गित्ती ह्याच्या घरी तीन महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेद-अदोम व त्याचे सर्व घराणे ह्यांना बरकत दिली. परमेश्वराने ओबेद-अदोम ह्याच्या घराण्याला व त्याच्या सर्वस्वाला बरकत दिली असे दावीद राजाला कोणी सांगितले; तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोश ओबेद-अदोमाच्या घरून दावीदपुरास मोठ्या आनंदाने आणला. परमेश्वराचा कोश उचलणारे सहा पावले चालून गेले तेव्हा दाविदाने एक बैल व एक पुष्ट गोर्हा ह्यांचा यज्ञ केला. दावीद सणाचे एफोद कंबरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करत चालला. दाविदाने व सर्व इस्राएल घराण्याने परमेश्वराचा कोश जयजयकार करीत व शिंगे फुंकत वर आणला. परमेश्वराचा कोश दावीदपुरात येत असताना शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून डोकावून दावीद राजा परमेश्वरापुढे नाचतबागडत आहे हे पाहिले, तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला. लोक परमेश्वराचा कोश नगरात घेऊन आले व त्याच्या स्थानी म्हणजे जो तंबू दाविदाने त्याच्यासाठी उभा केला होता त्यात त्यांनी तो ठेवला; तेव्हा दाविदाने परमेश्वराला होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली. होमबली व शांत्यर्पणे अर्पण केल्यावर दाविदाने सेनाधीश परमेश्वर ह्याच्या नामाने लोकांना आशीर्वाद दिला. मग त्याने सर्व प्रजेला म्हणजे इस्राएलाच्या समुदायातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला एकेक भाकर, मांसाचा एकेक तुकडा, खिसमिसांची एकेक ढेप अशी वाटून दिली. मग सर्व लोक घरोघर गेले. आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला. तेव्हा शौलाची कन्या मीखल दाविदाला भेटायला बाहेर आली व त्याला म्हणू लागली, “एखादा हलकट मनुष्य उघडाबोडका होतो तसे आज इस्राएलाच्या महाराजांनी आपले दास व दासी ह्यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्राएलाचे महाराज किती वैभवशाली दिसले!” दावीद मीखलेस म्हणाला, “ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे ह्यांच्याऐवजी मला निवडून आपल्या इस्राएली प्रजेवर अधिपती नेमले त्या परमेश्वरासमोर मी नाचलो; आणि परमेश्वरासमोर मी नाचणारच. मी ह्याहूनही तुच्छ बनेन; मी स्वतःच्या दृष्टीने हीन होईन; पण ज्यांना तू दासी म्हणतेस त्या माझा आदरगौरव करतील.” शौलाची कन्या मीखल हिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही.
२ शमुवेल 6 वाचा
ऐका २ शमुवेल 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ शमुवेल 6:1-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ