YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 6:1-23

२ शमुवेल 6:1-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

दावीदाने पुन्हा इस्राएलातून निवडक तीस हजार माणसे निवडून सैन्य तयार केले. आणि दावीद आपल्याजवळ असलेल्या सर्व लोकांसोबत यहूदातील बाला येथे गेला, आणि तेथून देवाचा कोश, ज्यावर ते नाव, म्हणजे करुबांच्या वरती राजासनी बसणारा जो सैन्यांचा परमेश्वर त्याचे नाव लिहिले आहे तो देवाचा कोश वर आणायला चालला. अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून दावीदाच्या लोकांनी हा देवाचा कोश आणला. मग तो एका नव्या गाडीवर ठेवला. अबीनादाबचे पुत्र उज्जा आणि अह्यो हे ती गाडी हाकीत होते. अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून हा देवाचा कोश त्यांनी वाहून आणला. अह्यो देवाच्या कोशापुढे चालू लागला. तेव्हा देवदारूच्या लाकडापासून केलेली नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरु, झांजा वाजवत दावीद आणि त्याच्या बरोबरचे सर्व इस्राएल लोक नाचत परमेश्वरापुढे चालू लागले. ते सर्व नाखोनच्या खळ्यापाशी आले तेव्हा बैल अडखळल्याने देवाचा कोश गाडीतून पडायला लागला. तेव्हा उज्जाने तो सावरला. पण परमेश्वराचा कोप त्याच्यावर होऊन उज्जाला मरण आले. देवाच्या कोशाला स्पर्श करून त्याने देवाविषयी अनादर दाखवला. तेव्हा कराराच्या कोशा शेजारीच उज्जा गतप्राण झाला. परमेश्वरने उज्जाला ताडना दिली यामुळे दावीद फार दु:खी झाला आणि त्याने या जागेचे नाव पेरेस-उज्जा म्हणजे, उज्जाला शासन, असे ठेवले. आजही ते नाव प्रचलित आहे. मात्र दावीदाला त्या दिवशी परमेश्वराचा धाक वाटू लागला तो मनात म्हणाला, “आता मी हा पवित्र कोश माझ्याकडे कसा आणू?” परमेश्वराचा पवित्र कोश (पवित्र कोशाची पेटी) आपल्याबरोबर दावीद नगरात आणण्याची दावीदाची इच्छा नव्हती, त्या ऐवजी, त्याने तो कोश (दावीदानगरात न हलवता) एका बाजूस नेऊन ओबेद-अदोम गित्ती याच्या घरी ठेवला. तिथे परमेश्वराचा कोश तीन महिने होता. ओबेद-अदोमाच्या कुटुंबाला देवाने आशीर्वाद दिला. पुढे लोक दावीदाला म्हणाले, “ओबेद-अदोमाच्या कुटुंबाला आणि त्याच्या सर्व मालमत्तेला परमेश्वराचा आशीर्वाद आहे.” कारण देवाचा कोश तेथेच आहे. तेव्हा दावीदाने तो पवित्र कोश त्याच्या घरातून आपल्याकडे आणला. यावेळी दावीदाचा आनंद गगनात मावत नव्हता. परमेश्वराचा कोश वाहून नेणारे लोक सहा पावले चालून गेल्यावर दावीदाने एक बैल आणि एक धष्टपुष्ट गोऱ्हा यांचे अर्पण केले. सुती एफोद घालून दावीद परमेश्वरापुढे नृत्य करत होता. दावीद आणि सर्व इस्राएल लोक आनंदाने बेभान झाले होते. नगरात परमेश्वराचा कोश आणताना ते जयजयकार करत होते. शिंग वाजवत होते. शौलाची कन्या मीखल हे सर्व खिडकीतून पाहत होती. परमेश्वराचा कोश नगरात आणत असताना दावीद त्याच्यापुढे नाचत उड्या मारत होता. मीखलने हे पाहिले तेव्हा तिला त्याचा विट वाटला. दावीद स्वतःचे हसे करून घेत आहे असे तिला वाटले. या कराराच्या कोशासाठी दावीदाने राहुटी उभारली होती. त्यामध्ये योग्य जागी इस्राएली लोकांनी तो ठेवला. मग दावीदाने परमेश्वरा पुढे होमार्पणे आणि शांत्यर्पणे वाहिली. होमार्पणे व शांत्यर्पणे केल्यावर दावीदाने सर्वांना सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने आशीर्वाद दिले. शिवाय इस्राएलाच्या प्रत्येक स्त्री पुरूषास त्याने भाकरीचा तुकडा, खिसमिसाच्या ढेपेचा तुकडा आणि खजूर मिश्रित भाकरीचा तुकडा दिला. मग सर्वजण आपापल्या घरी गेले. मग दावीद घरातील सर्वांना आशीर्वाद द्यायला घरात आला. तेव्हा शौलकन्या मीखल हिने त्यास गाठले आणि ती म्हणाली, “इस्राएलाच्या राजाने आज आपला सन्मान राखला नाही. नोकरा-चाकरांसमोर, दासीसमोर त्या मूर्खांपैकीच एक असल्याप्रमाणे तुम्ही आपले वस्त्र काढलेत!” तेव्हा दावीद तिला म्हणाला, “तुझे वडील किंवा तुझ्या घराण्यातील दुसरे कोणी या सर्वांना सोडून परमेश्वराने मला निवडले आहे. सर्व इस्राएलांचा मी नेता आहे. तेव्हा मी परमेश्वरापुढे असाच नाचतगात जाणार. मी याच्याही पुढची पायरी गाठीन. तुला आदर नसेल कदाचित् पण ज्या दासींचा तू उल्लेख केलास त्यांना माझ्याबद्दल आभिमान वाटतो.” शौलाची कन्या मीखल हिला मूलबाळ झाले नाही. ती तशीच विनापत्य वारली.

सामायिक करा
२ शमुवेल 6 वाचा

२ शमुवेल 6:1-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

दावीदाने पुन्हा इस्राएलातील सर्व सक्षम तरुण माणसांना एकत्र आणले, ते तीस हजार होते. दावीद व त्याची सर्व माणसे, यहूदीयातील बालाह येथून परमेश्वराचा कोश जो सर्वसमर्थ याहवेह, जे करुबांमध्ये आरूढ आहेत त्यांच्या नावाने ओळखला जात असे, तो कोश आणण्यासाठी निघाले. त्यांनी परमेश्वराचा कोश एका नवीन गाडीत ठेवला व तो डोंगरावर असलेल्या अबीनादाबाच्या घरातून बाहेर आणला. अबीनादाबाचे पुत्र उज्जा आणि अहियो नवीन गाडी चालवित होते अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून परमेश्वराचा कोश त्या गाडीवर ठेवून, अहियो त्यापुढे चालत होता. दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक त्यांच्या सर्व शक्तीने याहवेहसमोर चिपळ्या, सनोवर लाकडापासून बनविलेले वीणा, सारंगी, डफ, डमरू, झांजा वाजवित आनंद करीत होते. जेव्हा ते नाकोनच्या खळ्याजवळ आले तेव्हा बैल अडखळले आणि परमेश्वराचा कोश धरण्यासाठी उज्जाहने आपला हात पुढे केला. त्याच्या या आदरहीन कृत्यामुळे याहवेहचा कोप उज्जाहविरुद्ध पेटला; म्हणून परमेश्वराने त्याला मारून टाकले आणि तो तिथे परमेश्वराच्या कोशाच्या बाजूला मरण पावला. तेव्हा दावीदाला राग आला कारण याहवेहचा क्रोध उज्जाहवर भडकला होता आणि आजपर्यंत त्या ठिकाणाला पेरेस-उज्जाह असे म्हणतात. त्या दिवशी दावीदाला याहवेहचे भय वाटले आणि तो म्हणाला, “आता याहवेहचा कोश माझ्याकडे कसा येणार?” याहवेहचा कोश त्याच्याबरोबर दावीदाच्या नगरात घेऊन जाण्यास त्याची इच्छा नव्हती. त्याऐवजी, त्याने तो गित्ती ओबेद-एदोम याच्या घरी नेला. याहवेहचा कोश गित्ती ओबेद-एदोम याच्या घरात तीन महिने राहिला आणि याहवेहने त्याला आणि त्याच्या संपूर्ण घराण्यास आशीर्वाद दिला. दावीद राजाला असे सांगण्यात आले की, “याहवेहने ओबेद-एदोमच्या घराण्यास व त्याचे जे काही आहे त्यास, परमेश्वराच्या कोशामुळे आशीर्वादित केले आहे,” तेव्हा परमेश्वराचा कोश ओबेद-एदोमच्या घरापासून दावीदाच्या नगरात आणावा म्हणून दावीद आनंद करीत गेला. याहवेहचा कोश वाहून नेणारे जेव्हा सहा पावले पुढे गेले, तेव्हा त्याने एक बैल आणि एक पुष्ट वासरू यांचा यज्ञ केला. तागाचे एफोद परिधान करून दावीद त्याच्या सर्व शक्तीने याहवेहसमोर नाचत होता, दावीद आणि सर्व इस्राएली लोक आनंदाचा जयघोष करीत आणि रणशिंगांचा नाद करीत याहवेहचा कोश आणत होते. याहवेहचा कोश दावीदाच्या नगरात प्रवेश करीत असताना, शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून पाहिले. आणि जेव्हा तिने दावीद राजाला याहवेहसमोर उड्या मारत आणि नाचत असता पाहिले, तेव्हा तिने तिच्या अंतःकरणात त्याचा तिरस्कार केला. त्यांनी याहवेहचा कोश आणला आणि दावीदाने त्यासाठी जो तंबू तयार केला होता त्या ठिकाणी तो ठेवला, आणि दावीदाने याहवेहसमोर होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केली. होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केल्यानंतर, दावीदाने लोकांना सर्वसमर्थ याहवेहच्या नावाने आशीर्वाद दिला. नंतर त्याने तिथे जमलेल्या इस्राएली लोकांच्या समुदायातील प्रत्येक स्त्री व पुरुषास एक भाकर, खजुराची एक ढेप, मनुक्याची एक वडी दिली, मग सर्व लोक आपआपल्या घरी गेले. दावीद जेव्हा आपल्या घराण्याला आशीर्वाद देण्यासाठी घरी परतला, तेव्हा शौलाची मुलगी मीखल त्याला भेटण्यास बाहेर आली आणि म्हणाली, “आज इस्राएलाच्या राजाने एखाद्या असभ्य माणसाप्रमाणे आपल्या चाकरांच्या कन्यांसमोर अर्धनग्न अवस्थेत फिरून स्वतःस किती प्रतिष्ठित केले आहे!” दावीद मीखलला म्हणाला, “ते याहवेहच्या समोर झाले, ज्यांनी तुझ्या पित्याच्या किंवा त्याच्या घराण्यातील इतर कोणाच्या ऐवजी माझी निवड करून याहवेहच्या इस्राएली लोकांवर मला राज्यकर्ता म्हणून नेमले; तर मी याहवेहसमोर आनंद साजरा करेन. मी यापेक्षाही अधिक अप्रतिष्ठित होईन आणि मी माझ्या स्वतःच्या दृष्टीने अपमानित होईन. परंतु या गुलाम मुलींद्वारे ज्यांच्याबद्दल तू बोललीस, त्या माझा सन्मान करतील.” आणि शौलाची मुलगी मीखल हिला तिच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत संतती झाली नाही.

सामायिक करा
२ शमुवेल 6 वाचा

२ शमुवेल 6:1-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर दाविदाने पुन्हा एकदा इस्राएलातले तीस हजार निवडक पुरुष जमा केले. यहूदातील बाला येथून देवाचा कोश आणावा म्हणून दावीद आपल्याजवळच्या सगळ्या लोकांना घेऊन गेला; करूबारूढ असलेला सेनाधीश परमेश्वर ह्याच्या नामाचा हा कोश. त्यांनी देवाचा कोश एका नव्या गाडीत ठेवून टेकडीवरील अबीनादाबाच्या घरातून बाहेर काढला, अबीनादाबाचे पुत्र उज्जा व अह्यो हे दोघे ती नवी गाडी हाकत होते. त्यांनी देवाच्या कोशासहित ती गाडी टेकडीवरील अबीनादाबाच्या घरातून बाहेर काढली; अह्यो हा कोशापुढे चालत होता. दावीद व इस्राएल घराण्याचे सर्व लोक देवदारूच्या लाकडाची नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरू व झांजा परमेश्वरापुढे वाजवीत चालले. नाखोनाच्या खळ्याजवळ ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने देवाचा कोश हात लांब करून धरला. तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला; त्याच्या ह्या चुकीमुळे परमेश्वराने त्याला ताडन केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशाजवळ गतप्राण झाला. परमेश्वराने उज्जाला तडाका दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला. त्याने त्या ठिकाणाचे नाव पेरेस-उज्जा (उज्जा-हनन) ठेवले; ते नाव आजवर चालत आहे. त्या दिवशी दाविदाला परमेश्वराचा धाक वाटून तो म्हणाला, “देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा?” दावीद परमेश्वराचा कोश दावीदपुरात घेऊन जाण्यास कबूल होईना; त्याने तो ओबेद-अदोम गित्ती ह्याच्या घरी एका बाजूस नेऊन ठेवला. परमेश्वराचा कोश ओबेद-अदोम गित्ती ह्याच्या घरी तीन महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेद-अदोम व त्याचे सर्व घराणे ह्यांना बरकत दिली. परमेश्वराने ओबेद-अदोम ह्याच्या घराण्याला व त्याच्या सर्वस्वाला बरकत दिली असे दावीद राजाला कोणी सांगितले; तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोश ओबेद-अदोमाच्या घरून दावीदपुरास मोठ्या आनंदाने आणला. परमेश्वराचा कोश उचलणारे सहा पावले चालून गेले तेव्हा दाविदाने एक बैल व एक पुष्ट गोर्‍हा ह्यांचा यज्ञ केला. दावीद सणाचे एफोद कंबरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करत चालला. दाविदाने व सर्व इस्राएल घराण्याने परमेश्वराचा कोश जयजयकार करीत व शिंगे फुंकत वर आणला. परमेश्वराचा कोश दावीदपुरात येत असताना शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून डोकावून दावीद राजा परमेश्वरापुढे नाचतबागडत आहे हे पाहिले, तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला. लोक परमेश्वराचा कोश नगरात घेऊन आले व त्याच्या स्थानी म्हणजे जो तंबू दाविदाने त्याच्यासाठी उभा केला होता त्यात त्यांनी तो ठेवला; तेव्हा दाविदाने परमेश्वराला होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली. होमबली व शांत्यर्पणे अर्पण केल्यावर दाविदाने सेनाधीश परमेश्वर ह्याच्या नामाने लोकांना आशीर्वाद दिला. मग त्याने सर्व प्रजेला म्हणजे इस्राएलाच्या समुदायातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला एकेक भाकर, मांसाचा एकेक तुकडा, खिसमिसांची एकेक ढेप अशी वाटून दिली. मग सर्व लोक घरोघर गेले. आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला. तेव्हा शौलाची कन्या मीखल दाविदाला भेटायला बाहेर आली व त्याला म्हणू लागली, “एखादा हलकट मनुष्य उघडाबोडका होतो तसे आज इस्राएलाच्या महाराजांनी आपले दास व दासी ह्यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्राएलाचे महाराज किती वैभवशाली दिसले!” दावीद मीखलेस म्हणाला, “ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे ह्यांच्याऐवजी मला निवडून आपल्या इस्राएली प्रजेवर अधिपती नेमले त्या परमेश्वरासमोर मी नाचलो; आणि परमेश्वरासमोर मी नाचणारच. मी ह्याहूनही तुच्छ बनेन; मी स्वतःच्या दृष्टीने हीन होईन; पण ज्यांना तू दासी म्हणतेस त्या माझा आदरगौरव करतील.” शौलाची कन्या मीखल हिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही.

सामायिक करा
२ शमुवेल 6 वाचा