YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 5:17-25

२ शमुवेल 5:17-25 MARVBSI

दाविदाला अभिषेक करून इस्राएलाचा राजा केले आहे हे ऐकून सर्व पलिष्टी दाविदाच्या शोधासाठी निघाले; हे कानी येताच दावीद खाली आपल्या गढीत गेला. पलिष्टी येऊन रेफाईम खोर्‍यात पसरले. दाविदाने परमेश्वराला प्रश्‍न केला, “मी पलिष्ट्यांवर चढाई करू काय? तू त्यांना माझ्या हाती देशील काय?” परमेश्वराने दाविदाला म्हटले, “चढाई कर; मी खात्रीने पलिष्ट्यांना तुझ्या हाती देतो.” मग दावीद बाल-परासीम येथे आला; तेथे दाविदाने त्यांचा संहार केला; तो म्हणाला, “परमेश्वर माझ्यापुढे चालून पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूंवर तुटून पडला.” ह्यावरून त्या ठिकाणाचे नाव बाल-परासीम (तुटून पडण्याचे ठिकाण) असे पडले. पलिष्टी तेथे आपल्या मूर्ती टाकून गेले; त्या दाविदाने व त्याच्या लोकांनी नेल्या. मग पुन्हा पलिष्टी चढाई करून येऊन रेफाईम खोर्‍यात पसरले. मग दाविदाने परमेश्वराला प्रश्‍न केला असता त्याने सांगितले, “त्यांच्याशी सामना करू नकोस, तर वळसा घेऊन त्यांच्या पिछाडीस जा आणि तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर छापा घाल. तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सेना कूच करीत आहे असा आवाज तुझ्या कानी पडताच उठावणी कर, कारण परमेश्वर पलिष्ट्यांच्या सेनेचा संहार करण्यासाठी तुझ्या पुढे गेला आहे असे समज.” परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले आणि गेबापासून गेजेरापर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला.