YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 3:22-39

२ शमुवेल 3:22-39 MARVBSI

इकडे दाविदाचे लोक यवाबाबरोबर लुटीच्या स्वारीवरून परत आले; त्यांनी मोठी लूट आणली; पण अबनेर दाविदाजवळ हेब्रोन येथे नव्हता; कारण त्याने त्याला निरोप दिला असून तो सुखरूप निघून गेला होता. यवाब व त्याच्याबरोबरचे सगळे सैन्य परत आले तेव्हा यवाबाला लोकांनी सांगितले, “नेराचा पुत्र अबनेर राजाकडे आला होता; त्याची त्याने रवानगी केली व तो सुखरूप निघून गेला आहे.” यवाब राजाजवळ जाऊन म्हणाला, “आपण हे काय केले? अबनेर आपणाजवळ आला होता. त्याची आपण का रवानगी केली? तो हातचा पार निघून गेला. नेराचा पुत्र अबनेर ह्याला आपण ओळखत असालच. तो आपणांस फसवायला आणि आपली हालचाल व आपले एकंदर करणेसवरणे ह्यांचा भेद घेण्यासाठी आला होता.” यवाब दाविदापासून निघून गेल्यावर त्याला नकळत यवाबाने अबनेराकडे जासूद पाठवले; आणि त्यांनी त्याला सिरा नावाच्या विहिरीपासून परत आणले. अबनेर हेब्रोनास परत आला तेव्हा त्याच्याशी एकान्ती बोलण्यासाठी म्हणून यवाब त्याला वेशीच्या आत घेऊन गेला; तेथे आपला भाऊ असाएल ह्याच्या रक्तपाताचा सूड उगवण्यासाठी त्याने अबनेराच्या पोटावर असा वार केला की तो प्राणास मुकला. पुढे दाविदाच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा तो म्हणाला, “नेराचा पुत्र अबनेर ह्याच्या खुनासंबंधाने मी व माझे राज्य परमेश्वराच्या दृष्टीने सदा निर्दोषच असणार. तो दोष यवाबाच्या व त्याच्या सगळ्या पितृकुळाच्या माथी येवो; आणि यवाबाच्या वंशात स्रावी, महारोगी, काठी टेकत चालणारा, तलवारीने पडणारा किंवा अन्नान्न करणारा असा कोणी ना कोणी असल्यावाचून राहणार नाही.” यवाब व त्याचा भाऊ अबीशय ह्यांनी अबनेराचा वध केला; कारण त्याने त्यांचा भाऊ असाएल ह्याला गिबोनाच्या लढाईत मारले होते. मग दावीद यवाबाला व आपल्याबरोबरच्या सर्व लोकांना म्हणाला, “आपली वस्त्रे फाडा आणि गोणपाट नेसून अबनेरापुढे शोक करत चाला.” दावीद राजा स्वतः त्याच्या तिरडीमागे चालला. त्याने हेब्रोन येथे अबनेराला मूठमाती दिली; अबनेराच्या कबरेजवळ राजा गळा काढून रडला; सर्व लोकही रडले. दाविदाने अबनेरासाठी विलाप करून हे गीत म्हटले : “मूढाप्रमाणे अबनेरास मृत्यू प्राप्त व्हावा काय? तुझे हस्त बद्ध केले नव्हते; तुझ्या पायांत बेड्या घातल्या नव्हत्या; अधर्म्यांपुढे जसा कोणी पतन पावतो तसा तू पतन पावलास.” हे ऐकून लोक त्याच्यासाठी पुन्हा रडू लागले. दिवस अजून थोडा उरला होता, तेव्हा सर्व लोक दाविदाने अन्न खावे म्हणून त्याला आग्रह करण्यासाठी आले; पण दावीद शपथ घेऊन म्हणाला, “सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा काही खाल्ले तर देव मला तसेच किंबहुना त्याहूनही अधिक शासन करो.” सर्व लोकांच्या हे लक्षात आले व त्यांना ते बरे वाटले; राजा जे जे करी ते ते सर्व लोकांच्या मनास येई. ह्यावरून सर्व लोकांच्या व सर्व इस्राएल लोकांच्या लक्षात आले की नेराचा पुत्र अबनेर ह्याचा वध राजाकडून झाला नाही. राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आज इस्राएलातला एक सरदार, एक मोठा पुरुष पडला, हे तुम्हांला कळत नाही काय? मी एवढा अभिषिक्त राजा आहे तरी आज निर्बल आहे व हे सरूवेचे पुत्र मला फार भारी आहेत; पण परमेश्वर दुष्कर्म करणार्‍यांचे त्यांच्या दुष्कर्मानुसार पारिपत्य करो.”