मग हूशयाने सादोक व अब्याथार याजक ह्यांना सांगितले की, “अहीथोफेलाने अबशालोमाला व इस्राएलाच्या वडील जनांना अशी मसलत दिली होती, पण मी अशी मसलत दिली.
तर लवकर जासूद पाठवून दाविदाला सांग की, आज रात्री रानातील नदीच्या उताराजवळ राहू नका; कसेही करून पार उतरून जा, नाहीतर राजा व त्याच्याबरोबरचे सर्व लोक नष्ट होतील.”
योनाथान व अहीमास हे एन-रोगेल येथे राहत होते; ते शहरात आहेत हे कोणास कळू नये म्हणून एक दासी जाऊन त्यांना खबर देत असे; त्यांनी जाऊन दावीद राजाला हे वर्तमान सांगितले.
पण एका पोराने त्यांना पाहून अबशालोमाला जाऊन सांगितले; तेव्हा ते त्वरेने निघून बहूरीमातील एका मनुष्याच्या घरी गेले; त्याच्या चौकात एक विहीर होती तिच्यात ते उतरले.
तेव्हा एका स्त्रीने एक चादर घेऊन विहिरीच्या तोंडावर पसरली व तिच्यावर काही भरडलेले धान्य पसरले, त्यामुळे कोणाच्या काही लक्षात आले नाही.
अबशालोमाचे चाकर त्या घरी त्या बाईकडे आले; ते तिला म्हणाले, “अहीमास व योनाथान कोठे आहेत?” तेव्हा त्या स्त्रीने त्यांना म्हटले, “ते ओहळाच्या पलीकडे गेले आहेत.” त्यांनी पुष्कळ शोध केला, पण ते सापडले नाहीत, म्हणून ते परत यरुशलेमेला गेले.
ते निघून गेल्यावर ते पुरुष विहिरीतून बाहेर निघाले; त्यांनी जाऊन दावीद राजाला खबर दिली, आणि ते दाविदाला म्हणाले, “उठा, नदीचा पार उतरून लवकर पलीकडे जा; अहीथोफेलाची तुमच्याविरुद्ध अमुक अमुक मसलत आहे.”
तेव्हा दावीद व त्याच्याबरोबरचे सर्व लोक यार्देनेपार गेले. सकाळी उजाडले तेव्हा यार्देनेच्या पलीकडे गेला नाही असा कोणीच मागे राहिला नाही.
आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहीथोफेलाने पाहिले तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या नगरास आपल्या घरी गेला, आणि आपल्या घराची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला; तो मृत्यू पावला, व त्याला त्याच्या बापाच्या थडग्यात पुरले.
मग दावीद महनाइमाला गेला. इकडे अबशालोम इस्राएल लोकांसह यार्देनेपार गेला.
अबशालोमाने यवाबाच्या जागी अमासा ह्याला सेनापती नेमले. यवाबाची आई सरूवा हिची नाहाश म्हणून एक बहीण होती; हिच्या अबीगल नावाच्या कन्येपाशी इथ्रा नावाचा एक इस्राएली पुरुष गेला होता, त्याचा पुत्र हा अमासा होय.
इस्राएल लोकांनी व अबशालोमाने गिलाद देशात तळ दिला.
दावीद महनाईम येथे आला तेव्हा अम्मोन्यांच्या राब्बातला नाहाशाचा पुत्र शोबी व लो-दबारातील अम्मीएलाचा पुत्र माखीर आणि रोगलीम येथील बर्जिल्लय गिलादी ह्यांनी
दाविदासाठी व त्याच्याबरोबरच्या माणसांसाठी खाटा, भांडीकुंडी, गहू, जव, हुरडा, शेंगा, वाटाणे, फुटाणे,
मध, लोणी, मेंढरे व गाईच्या दुधाचा खवा आणला; हे लोक रानात असून भुकेले, तान्हेले व थकलेले असतील असे त्यांना वाटले.