२ शमुवेल 14
14
अबशालोमाने परत यावे ह्यासाठी यवाबाने केलेली योजना
1राजाचे मन अबशालोमाकडे लागले आहे, हे सरूवेचा पुत्र यवाब ह्याच्या लक्षात आले.
2तेव्हा यवाबाने तकोवा येथे जासूद पाठवून एका चतुर स्त्रीला बोलावून आणले; तो तिला म्हणाला, “तू सुतक्याचे मिष करून सुतकाचा पेहराव घाल, अंगास तेल लावू नकोस आणि मृतासाठी बहुत दिवस शोक करणारी अशी स्त्री बन;
3मग राजाकडे जाऊन असे असे बोल.” यवाबाने तिला काय बोलायचे ते शिकवले.
4तकोवा येथील त्या स्त्रीने राजाकडे जाऊन त्याला साष्टांग दंडवत घातले आणि म्हटले, “महाराज, माझी दाद लावा.”
5राजाने तिला विचारले, “तुला काय झाले?” ती म्हणाली, “मी खरोखर विधवा स्त्री आहे. माझा नवरा मरून गेला आहे.
6आपल्या दासीचे दोन पुत्र होते, ते दोघे मैदानात झगडत असताना त्यांना सोडवायला कोणी नव्हता; तेव्हा एकाने दुसर्याला असा मार दिला की तो ठार झाला.
7आता पाहा, माझ्या कुळातले सर्व लोक आपल्या ह्या दासीवर उठले आहेत; ते म्हणतात की, ज्याने आपल्या भावाचा प्राणघात केला त्याला आमच्या स्वाधीन कर. आपल्या भावाचा त्याने वध केला आहे, म्हणून त्याचा प्राण त्याच्या भावाच्या प्राणाबद्दल घेऊ, आणि तुझ्या त्या वारसाचाही नाश करू; ह्या प्रकारे माझा उरलेला निखारा विझवून टाकून माझ्या पतीचे नाव व संतती भूतलावरून नष्ट करायला ते पाहत आहेत.”
8राजा त्या स्त्रीला म्हणाला, “तू आपल्या घरी जा, मी तुझ्यासंबंधाने ताकीद देईन.”
9तेव्हा ती तकोवा येथील स्त्री राजाला म्हणाली, “अहो माझे स्वामीराज, हा दोष मला व माझ्या पितृकुळास लागो आणि राजा व त्याची गादी निष्कलंक राहो.”
10राजा म्हणाला, “तुला कोणी काही बोलले तर त्याला माझ्याकडे घेऊन ये, म्हणजे तो पुन्हा तुला हातही लावणार नाही.”
11ती म्हणाली, “महाराजांनी आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण करावे म्हणजे रक्तपाताचा सूड घेणार्याला आणखी नासधूस करता येणार नाही आणि माझ्या पुत्राचा नाश होणार नाही.” तो म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझ्या पुत्राचा एक केसही भूमीवर पडणार नाही.”
12ती म्हणाली, “आपल्या दासीला स्वामीराजांशी एक गोष्ट बोलण्याची परवानगी असावी.” तो म्हणाला, “बोल.”
13ती स्त्री म्हणाली, “देवाच्या प्रजेचे नुकसान करण्याचे आपण हे काय योजले? महाराज आता जे शब्द बोलले त्यांमुळे ते स्वतःच दोषी ठरतात; कारण महाराज स्वत:च्या हाकून दिलेल्यास माघारी आणत नाहीत.
14आपल्या सर्वांना मरणे प्राप्त आहे; आपण भूमीवर सांडलेल्या पाण्यासारखे आहोत, ते पुन्हा भरून घेता येत नाही; देव प्राणहरण करत नसतो तर घालवून दिलेला इसम आपल्यापासून कायमचा घालवून दिला जाऊ नये अशी योजना करत असतो.
15मी आता आपल्या स्वामीराजांना विनंती करायला आले आहे ह्याचे कारण हेच की लोकांनी मला घाबरवून सोडले आहे, म्हणून आपल्या दासीने विचार केला की, महाराजांना जाऊन सांगावे म्हणजे ते आपल्या दासीच्या विनंतीप्रमाणे करतील.”
16हे ऐकून, जो मनुष्य मला व माझ्या पुत्राला देवाच्या वतनातून नाहीसा करायला पाहत आहे, त्याच्या हातातून महाराज आपल्या दासीचा बचाव करतील.
17आपल्या दासीने विचार केला की, माझ्या स्वामीराजांच्या शब्दाने मला शांती मिळेल; कारण माझे स्वामीराजे ह्यांना देवदूताप्रमाणे बर्यावाइटाचा निर्णय करता येतो; तर आपला देव परमेश्वर आपल्याबरोबर असो.”
18राजाने तिला उत्तर दिले, “जे काही मी तुला विचारत आहे ते माझ्यापासून लपवू नकोस.” ती स्त्री म्हणाली, “स्वामीराजांनी बोलावे.”
19राजाने विचारले, “ह्या प्रकरणात यवाबाचा हात आहे की नाही?” त्या स्त्रीने उत्तर केले, “माझे स्वामीराज, आपल्या जीविताची शपथ, जे काही माझे स्वामीराजे बोलले आहेत त्यापासून कोणाला उजवीडावीकडे जाता येत नाही; आपला सेवक यवाब ह्यानेच मला आज्ञा केली व ह्या सर्व गोष्टी त्यानेच आपल्या दासीच्या तोंडी घातल्या.
20ह्या गोष्टीचे स्वरूप बदलावे म्हणून आपला सेवक यवाब ह्याने हे केले आहे; धनीमहाराज देवदूतासारखे चतुर आहेत, आणि पृथ्वीवर जे काही होते ते सर्व त्यांना कळते.”
21मग राजाने यवाबाला म्हटले, “मला हे कबूल आहे; तर जाऊन त्या तरुण अबशालोमास माघारी घेऊन ये.”
22तेव्हा यवाबाने साष्टांग दंडवत घालून राजाला आशीर्वाद दिला आणि म्हटले, “माझे स्वामीराज, आपली कृपादृष्टी माझ्यावर आहे हे आज आपल्या दासाला कळले आहे, कारण महाराजांनी आपल्या दासाच्या विनंतीप्रमाणे केले आहे.”
23मग यवाब उठून गशूराला गेला व तेथून अबशालोमाला यरुशलेमेस घेऊन आला.
24तेव्हा राजा म्हणाला, “त्याने आपल्या घरी जाऊन राहावे, माझ्या दर्शनास येऊ नये.” त्यावरून अबशालोम आपल्या घरी जाऊन राहिला; राजाचे त्याला दर्शन झाले नाही.
25सर्व इस्राएलात सौंदर्याविषयी प्रशंसनीय असा अबशालोमासारखा कोणी नव्हता; त्याच्या ठायी नखशिखांत काही दोष नव्हता.
26तो वर्षातून एकदा आपले मस्तक मुंडवत असे; त्याच्या केसांचा भार त्याला होत असे म्हणून तो ते कातरत असे; आपले केस कातरल्यावर तो ते तोलून पाही, तेव्हा ते सरकारी वजनाप्रमाणे दोनशे शेकेल भरत असत.
27अबशालोमाला तीन पुत्र आणि एक कन्या झाली, तिचे नाव तामार, ही मुलगी अति रूपवान होती.
28ह्या प्रकारे राजाचे दर्शन घेतल्यावाचून अबशालोम दोन वर्षे यरुशलेमेत राहिला.
29राजाकडे यवाबाला पाठवण्यासाठी अबशालोमाने त्याला बोलावणे पाठवले; पण तो त्याच्याकडे येईना; त्याने दुसर्यांदा बोलावणे पाठवले तरी तो येईना.
30मग तो आपल्या चाकरांना म्हणाला, “पाहा, यवाबाचे एक शेत माझ्या जमिनीला लागून आहे. त्यात जव आले आहेत; जा, त्याला आग लावा.” तेव्हा अबशालोमाच्या चाकरांनी त्या शेताला आग लावली.
31मग यवाब उठून अबशालोमाच्या घरी गेला व त्याला विचारू लागला की, “तुझ्या चाकरांनी माझ्या शेतास का आग लावली?”
32अबशालोम यवाबाला म्हणाला, “मला गशूराहून का आणले? तेथेच मी आजवर राहिलो असतो तर बरे झाले असते, असा निरोप तुझ्या हाती राजाला पाठवावा म्हणून मी तुला येथे ये, असे सांगून पाठवले होते. तर आता मला राजाचे दर्शन करवून दे; मी दोषी असलो तर त्याने मला मारून टाकावे.”
33यवाबाने राजाकडे जाऊन त्याला ही गोष्ट सांगितली; तेव्हा राजाने अबशालोमाला बोलावणे पाठवले; त्याने त्याच्याकडे येऊन त्याला साष्टांग दंडवत घातले आणि राजाने अबशालोमाचे चुंबन घेतले.
सध्या निवडलेले:
२ शमुवेल 14: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.