YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 12:18-24

२ शमुवेल 12:18-24 MARVBSI

सातव्या दिवशी ते मूल मेले; पण मूल मेले आहे हे दाविदाला सांगायला त्याच्या चाकरांना भय वाटले; ते म्हणाले, “पाहा, मूल जिवंत असताना आम्ही त्याला समजावले पण त्याने ऐकले नाही; तर मूल मरण पावले आहे असे त्याला कळवले तर तो स्वतःला अपाय करून घ्यायचा.” आपले चाकर आपसांत कुजबुजत आहेत हे पाहून आपले मूल मेले आहे असे दाविदाने ताडले; त्याने त्यांना विचारले, “मूल मेले काय?” ते म्हणाले, “मेले.” मग दावीद जमिनीवरून उठला; त्याने स्नान करून तैलाभ्यंग केला, आपला पोशाख बदलला आणि परमेश्वराच्या मंदिरात जाऊन दंडवत घालून आराधना केली; मग तो आपल्या मंदिरात आला, त्याने सांगितल्यावरून त्याच्या सेवकांनी त्याच्यापुढे अन्न वाढले, ते त्याने सेवन केले. त्याच्या चाकरांनी त्याला विचारले, “आपण हे असे काय केले? मूल जिवंत होते तोवर आपण त्याच्यासाठी उपास व शोक केला, पण ते मरण पावताच आपण उठून भोजन केले?” त्याने उत्तर दिले, “मूल जिवंत होते तोवर मी उपास केला व रुदन केले. मला वाटले, न जाणो, कदाचित परमेश्वर माझ्यावर कृपा करील व मूल जिवंत राहील; पण आता ते मरण पावले तर मी आता का उपास करावा? माझ्याने थोडेच त्याला परत आणवेल? मी त्याच्याकडे जाईन, पण ते माझ्याकडे परत येणार नाही.” मग दाविदाने आपली स्त्री बथशेबा हिचे सांत्वन केले, तो तिच्यापाशी जाऊन निजला. त्यानंतर तिला पुत्र झाला, त्याने त्याचे नाव शलमोन ठेवले; परमेश्वराला तो प्रिय झाला.