YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 12:1-10

२ शमुवेल 12:1-10 MARVBSI

मग परमेश्वराने नाथानाला दाविदाकडे पाठवले. तो त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “एका नगरात दोन माणसे राहत होती; त्यांतला एक श्रीमंत व दुसरा गरीब होता. त्या श्रीमंत माणसाची मेंढरे व गुरे विपुल होती; पण त्या गरिबाजवळ एका लहानशा मेंढीखेरीज काहीच नव्हते. त्याने ती विकत घेऊन तिचे संगोपन केले होते; ती त्याच्याबरोबर व त्याच्या मुलाबाळांबरोबर लहानाची मोठी झाली; ती त्याच्या घासातला घास खात असे, त्याच्या प्याल्यातून पाणी पीत असे व त्याच्या उराशी निजत असे; ती त्याची मुलगीच बनली होती. एकदा त्या श्रीमंताकडे एक पाहुणा आला, तेव्हा त्याच्याकडे आलेल्या त्या पाहुण्यासाठी भोजन तयार करावे म्हणून त्याने आपल्या शेरडामेंढरांतून अथवा गाईबैलांतून एखादे न घेता त्या गरीब माणसाची ती मेंढी घेऊन आपल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले.” हे ऐकून त्या माणसावर दाविदाचा कोप भडकला. तो नाथानाला म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, ज्या माणसाने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे; त्याने हे कृत्य केले व त्याला काही दयामाया वाटली नाही म्हणून त्याने त्या मेंढीच्या चौपट बदला दिला पाहिजे.” नाथान दाविदाला म्हणाला, “तो मनुष्य तूच आहेस. इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला अभिषेक करून इस्राएलाचा राजा केले व तुला शौलाच्या हातातून सोडवले; मग तुझ्या स्वामीचे मंदिर मी तुला दिले, त्याच्या स्त्रिया तुझ्या उराशी दिल्या, इस्राएल व यहूदा ह्यांचे घराणे तुला दिले, आणि एवढे जर थोडे झाले असते तर मी तुला आणखी हवे ते दिले असते. तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य का केलेस? उरीया हित्ती ह्याचा तू तलवारीने घात केला, त्याची बायको आपल्या घरात घातलीस आणि उरीयाचा अम्मोन्यांच्या तलवारीने वध करवलास? तर आता तलवार तुझे घर सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ मानून उरीया हित्ती ह्याची स्त्री आपल्या घरात घातली आहेस.