YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 पेत्र 2

2
खोटे संदेष्टे व पापी जीवनक्रम
1तर (आपल्या) लोकांतही खोटे संदेष्टे होते तसे तुमच्यातही खोटे शिक्षक होतील; ते विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील; ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील, आणि आपणांवर आकस्मिक नाश ओढवून घेतील.
2त्यांच्या कामातुर आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील; त्यांच्यामुळे सत्य मार्गाची निंदा होईल.
3ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील; त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.
4कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही; तर त्यांना नरकात2 टाकले आणि न्यायनिवाड्याकरता अंधकारमय खाड्यात3 राखून ठेवले;
5त्याने प्राचीन जगाचीही गय केली नाही, तर अभक्तांच्या जगावर जलप्रलय आणला, आणि नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्याचे सात जणांसह रक्षण केले;
6पुढे होणार्‍या अभक्तांना उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्याने त्यांना विध्वंसाची शिक्षा केली;
7आणि अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट ह्याची सुटका केली;
8(तो नीतिमान माणूस त्यांच्यामध्ये राहत होता; तेव्हा त्यांची स्वैराचाराची कृत्ये पाहून व त्यांविषयी ऐकून त्याचा नीतिमान जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता);
9भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.
10विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. ते उद्धट, स्वच्छंदी, थोरांची निंदा करण्यास न भिणारे, असे आहेत.
11बळाने व सामर्थ्याने अधिक मोठे असलेले देवदूतही प्रभूसमोर त्यांची निंदा करून त्यांना दोषी ठरवत नाहीत.
12पण हे लोक स्वतःला न कळणार्‍या गोष्टींविषयी निंदा करत असतात; नैसर्गिक नियमानुसार पकडले जाऊन त्यांचा नाश व्हावा एवढ्यासाठी जन्मलेल्या निर्बुद्ध पशूंसारखे ते आहेत; त्यांचा स्वत:च्या भ्रष्टतेतच नाश होईल.
13अनीतीचे वेतन म्हणजे अपकार हा त्यांच्या पदरी पडतो; दिवसाढवळ्या चैनबाजी करण्यात ते सुख मानतात, ते डाग व कलंक आहेत; तुमच्याबरोबर मेजवान्या झोडताना ते कपटाने वागतात व त्यांत त्यांना मौज वाटते.
14त्यांचे डोळे व्यभिचारी वृत्तीने भरलेले आहेत; आणि पाप केल्यावाचून त्यांना राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात; त्यांचे हृदय लोभाला सवकलेले आहे; ते शापग्रस्त (लोक) आहेत;
15ते सरळ मार्ग सोडून बहकले, आणि अनीतीचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गाने ते गेले.
16त्याला त्याच्या उल्लंघनाबद्दल वाग्दंड झाला; मुक्या गाढवाने मनुष्यवाणीने बोलून संदेष्ट्याच्या वेडेपणाला आळा घातला.
17ते निर्जल झरे, वादळाने उडवलेले धुके, असे आहेत; त्यांच्यासाठी घनांधकाराची काळोखी सर्वकाल राखलेली आहे.
18भ्रमात असणार्‍या लोकांतून कोणी बाहेर पडले न पडले तोच ते लोक त्यांना व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगतात व दैहिक वासनाधीन करून त्यांना कामातुरपणाचे मोह घालतात.
19ते त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत; कारण मनुष्य ज्याच्या कह्यात जातो त्याचा तो दासही बनतो.
20प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या घाणीतून सुटल्यावर ते पुन्हा जर तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले, तर त्यांची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली आहे.
21कारण नीतिमत्त्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणांस दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे ह्यापेक्षा तो न समजणे ते त्यांच्यासाठी बरे होते.
22‘आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे’ व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली ‘डुकरीण’, अशी जी खरी म्हण आहे तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे.

सध्या निवडलेले:

2 पेत्र 2: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन