2 पेत्र 1
1
नमस्कार
1आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांना, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून :
2देव व आपला प्रभू येशू ह्यांच्या ओळखीने तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो.
ख्रिस्ती मनुष्याचे हक्क व शील
3ज्याने तुम्हाआम्हांला आपल्या गौरवासाठी व सात्त्विकते-साठी पाचारण केले त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत;
4त्यांच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, ह्यासाठी की, त्यांच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे.
5ह्याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्त्विकतेची, सात्त्विकतेत ज्ञानाची,
6ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची,
7सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला;
8कारण हे गुण तुमच्यामध्ये असून ते वाढते असले तर, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हांला करतील.
9ज्याच्या अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, अदूरदृष्टीचा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे.
10म्हणून बंधूंनो, तुम्हांला झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही;
11आणि अशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल.
जागृत राहण्याबाबत इशारा
12ह्या कारणास्तव जरी तुम्हांला ह्या गोष्टी माहीत आहेत आणि तुम्हांला प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झालेले आहात तरी तुम्हांला त्यांची नेहमी आठवण देण्याची मी काळजी घेईन.
13मी ह्या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हांला आठवण देऊन जागृत ठेवणे हे मला उचित वाटते;
14कारण मला ठाऊक आहे की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला कळवल्याप्रमाणे मला आपला मंडप लवकरच काढावा लागणार आहे;
15आणि माझे निर्गमन झाल्यावरही त्या गोष्टींची आठवण सर्वदा तुम्हांला करता यावी म्हणून मी शक्य तितके करीन.
पेत्राची स्वत:ची साक्ष व संदेष्ट्यांची साक्ष
16कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथांना अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन ह्यांसंबंधाने तुम्हांला कळवले असे नाही; तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो.
17कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाला; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की, “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”
18त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली.
19शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे1 वचन आमच्याजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.
20प्रथम हे ध्यानात ठेवा की, शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही;
21कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.
सध्या निवडलेले:
2 पेत्र 1: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.