YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 25:8-21

२ राजे 25:8-21 MARVBSI

बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी पाचव्या महिन्याच्या सप्तमीस नबुजरदान यरुशलेमेला आला; हा बाबेलच्या राजाचा सेवक असून गारद्यांचा नायक होता. त्याने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा जाळून टाकला, तशीच यरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली. गारद्यांच्या सरदारांबरोबर असलेल्या खास्द्यांच्या सर्व सैन्याने यरुशलेमेभोवतालचे सर्व तट पाडून टाकले. शहरात राहिलेले अवशिष्ट लोक, बाबेलच्या राजाकडे फितून गेलेले लोक आणि उरलेले साधारण लोक ह्यांना गारद्यांचा नायक नबुजरदान ह्याने कैद करून नेले. देशातले जे लोक अतिशय कंगाल होते त्यांना गारद्यांच्या सरदाराने द्राक्षांच्या मळ्यांची व शेतांची मशागत करण्यास मागे ठेवले. परमेश्वराच्या मंदिरात असलेले पितळेचे खांब, मंदिरातला पितळी गंगाळसागर व त्याच्या बैठकी ही खास्दी लोकांनी फोडूनतोडून त्यांचे पितळ बाबेलास नेले. पात्रे, फावडी, चिमटे, धूपदाने आणि सेवेची सर्व पितळेची उपकरणे त्यांनी नेली. अग्निपात्रे, कटोरे वगैरे जेवढी सोन्याची होती त्यांचे सोने व जी चांदीची होती त्यांची चांदी गारद्यांच्या सरदाराने नेली. दोन खांब, गंगाळसागर व त्याच्या बैठकी हे सर्व शलमोनाने परमेश्वराच्या मंदिरासाठी केले होते, ह्या सर्व उपकरणांचे पितळ अपरिमित होते. एका खांबाची उंची अठरा हात असून त्यावर पितळेचा कळस होता; त्या कळसाची उंची तीन हात होती; त्या कळसाच्या सभोवार पितळेची जाळी व डाळिंबे केली होती; दुसर्‍या खांबालाही असेच जाळीचे काम होते. गारद्यांच्या सरदाराने मुख्य याजक सराया, दुय्यम याजक सफन्या व तीन द्वारपाळ ह्यांना पकडून नेले. योद्ध्यांवर नेमलेल्या एका खोजाला त्याने नगरातून पकडून नेले; राजाच्या हुजुरास असणारे पाच पुरुष त्याला शहरात आढळले त्यांनाही त्याने नेले; त्याप्रमाणेच लोकांची सैन्यात भरती करणारा सेनापतीचा चिटणीस आणि नगरात सापडलेल्या लोकांपैकी साठ माणसे ह्यांना त्याने नेले. गारद्यांचा सरदार नबुजरदान ह्याने त्यांना पकडून रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले. बाबेलच्या राजाने त्यांना हमाथ देशातील रिब्ला येथे मार देऊन ठार केले. ह्या प्रकारे यहूदी लोकांना त्यांच्या देशातून कैद करून नेले.