YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 23

23
योशीयाने केलेल्या सुधारणा
(२ इति. 34:3-7)
1मग राजाने यहूदातील व यरुशलेमेतील सर्व वडील जनांना बोलावणे पाठवून जमा केले.
2यहूदा येथील सर्व लोक, सर्व यरुशलेमेतले रहिवासी, याजक, संदेष्टे, सर्व आबालवृद्ध ह्यांना बरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिराकडे गेला; परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकांना ऐकू येतील अशी वाचून दाखवली.
3मग राजाने पीठावर उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की, “मी परमेश्वराचे अनुसरण करीन व त्याच्या आज्ञा, निर्बंध व नियम जिवेभावे पाळीन, ह्या ग्रंथात लिहिलेली सर्व वचने पाळीन.” तेव्हा सर्व लोकांनी तो करार मान्य केला.
4मग राजाने हिल्कीया मुख्य याजक, दुसर्‍या प्रतीचे याजक आणि द्वारपाळ ह्यांना आज्ञा केली की बआल मूर्ती, अशेरामूर्ती व नक्षत्रगण ह्यांच्यासाठी जी पात्रे केली आहेत ती सर्व परमेश्वराच्या मंदिरातून बाहेर काढा. त्याने ती सर्व पात्रे यरुशलेमेच्या बाहेर किद्रोनच्या मैदानात जाळून त्यांची राख बेथेल येथे पाठवली.
5जितके पुजारी यहूदाच्या राजांनी यहूदी नगरांच्या उच्च स्थानी व यरुशलेमेच्या आसपासच्या उच्च स्थानी धूप जाळण्यासाठी नेमले होते ते आणि जे कोणी बआल, सूर्य, चंद्र, राशिचक्र व नक्षत्रगण ह्यांना धूप जाळत होते ते सर्व राजाने काढून टाकले.
6त्याने परमेश्वराच्या मंदिरातून अशेरामूर्ती बाहेर काढली व यरुशलेमेबाहेर किद्रोन ओहोळाजवळ नेऊन जाळून टाकली, पायांनी तुडवून तिचे चूर्ण केले व ते साधारण लोकांच्या कबरांवर फेकून दिले.
7त्याप्रमाणेच परमेश्वराच्या मंदिराला लागून पुरुषगमन करणार्‍यांची घरे होती ती त्याने मोडून टाकली; त्यांत स्त्रिया अशेरामूर्तींसाठी पडदे विणत असत.
8त्याने यहूदाच्या सर्व नगरांतील याजकांना बोलावणे पाठवले; गेबापासून बैर-शेबापर्यंत असलेल्या ज्या उच्च स्थानीं ते याजक धूप जाळत असत ती त्याने भ्रष्ट केली; आणि नगराधिकारी यहोशवा ह्याच्या नगराच्या वेशीत डाव्या हाताला उच्च स्थाने होती ती सर्व मोडून टाकली.
9तरीपण उच्च स्थानांचे याजक यरुशलेमेतील परमेश्वराच्या वेदीजवळ आले नाहीत; ते आपल्या भाऊबंदांमध्ये राहून बेखमीर भाकरी खात असत.
10नंतर, कोणी आपला पुत्र अथवा कन्या ह्यांचा अग्नीत होम करून त्याला मोलखास अर्पू नये म्हणून हिन्नोमपुत्रांच्या खोर्‍यातील तोफेत त्याने भ्रष्ट करून टाकले.
11जे घोडे यहूदाच्या राजांनी सूर्याला वाहून परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारी नथनमेलेक नावाच्या खोजाच्या बाहेरल्या बाजूच्या कोठडीजवळ ठेवले होते, ते त्याने काढून टाकले आणि सूर्याचे रथ अग्नीने जाळून टाकले.
12आहाजाच्या माडीच्या धाब्यावर ज्या वेद्या यहूदाच्या राजांनी केल्या होत्या आणि मनश्शेने परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत ज्या वेद्या केल्या होत्या, त्या राजाने मोडूनतोडून टाकल्या आणि त्यांची धूळमाती त्याने किद्रोन ओहोळात फेकून दिली.
13आणि इस्राएलाचा राजा शलमोन ह्याने यरुशलेमेच्या पूर्वेस आणि विध्वंसगिरी नावाच्या पहाडाच्या दक्षिणेस सीदोन्यांची अमंगळ देवी अष्टोरेथ, मवाबाचे अमंगळ दैवत कमोश व अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम ह्यांच्याप्रीत्यर्थ जी उच्च स्थाने बांधली होती ती राजाने भ्रष्ट केली.
14त्याने तेथील मूर्तिस्तंभ मोडून त्यांचे तुकडे केले, तेथील अशेरामूर्ती फोडून टाकल्या व त्यांच्या ठिकाणी माणसांची हाडे भरून ठेवली.
15मग बेथेल येथे जी वेदी होती आणि जे उच्च स्थान इस्राएलाकडून पाप करवणारा नबाटपुत्र यराबाम ह्याने बांधले होते, ती वेदी व ते उच्च स्थान त्याने पाडून टाकले; ते उच्च स्थान जाळून टाकले, त्याचा भुगा केला व अशेरामूर्ती जाळून टाकल्या.
16योशीयाने वळून पाहिले तर डोंगरावरील कबरा त्याच्या दृष्टीस पडल्या; त्याने माणसे पाठवून कबरांतून हाडे बाहेर काढून आणवली आणि ती त्या वेदीवर जाळून ती भ्रष्ट केली. ह्या गोष्टी विदित करणार्‍या देवाच्या माणसाने देवाचे जे वचन कळवले होते त्याप्रमाणे हे घडले.
17मग त्याने विचारले, “माझ्यासमोर हे जे स्मारक दिसत आहे ते कोणाचे?” नगरातील लोकांनी त्याला सांगितले की, “तू ह्या बेथेलच्या वेदीचे जे काही केले त्याविषयी ज्या देवाच्या माणसाने यहूदातून येऊन विदित केले होते त्याचे हे थडगे.”
18तो म्हणाला, “त्याच्या वाटेला कोणी जाऊ नका, त्याच्या अस्थी कोणी काढू नका.” त्यांनी त्याच्या अस्थी शोमरोनाहून आलेल्या संदेष्ट्याच्या अस्थींबरोबर तशाच राहू दिल्या.
19जेवढी उच्च स्थाने शोमरोनातील नगरांत बांधून इस्राएलाच्या राजांनी परमेश्वरास संताप आणला होता ती सर्व योशीयाने काढून टाकली; त्याने बेथेल येथे केले होते त्याप्रमाणेच त्यांचे केले.
20तेथल्या उच्च स्थानांचे याजक होते तितक्यांना त्याने त्या वेद्यांवर बली दिले व त्यांच्यावर माणसांची हाडे जाळली. मग तो यरुशलेमेस परत गेला.
वल्हांडण सण पाळण्यात येतो
(२ इति. 35:1-19)
21नंतर राजाने सर्व लोकांना आज्ञा दिली की, “ह्या कराराच्या ग्रंथात लिहिले आहे त्याप्रमाणे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळा.”
22असा वल्हांडण सण इस्राएलाचे शास्ते शासन करत होते त्यांच्या काळापासून व इस्राएलाचे राजे व यहूदाचे राजे ह्यांच्या कारकिर्दीत कधी पाळण्यात आला नव्हता;
23योशीया राजाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी परमेश्वराप्रीत्यर्थ यरुशलेमेत वल्हांडण सण पाळण्यात आला.
यहूदावर परमेश्वराचा सतत क्रोध
24ह्याखेरीज हिल्कीया याजक ह्याला परमेश्वराच्या मंदिरात जो ग्रंथ सापडला होता त्यातील नियमशास्त्राची वचने स्थापित करावीत म्हणून यहूदा देशात व यरुशलेमेत दैवज्ञ व चेटकी आणि कुलदेवता, मूर्ती आदिकरून ज्या अमंगळ वस्तू योशीयाच्या नजरेस पडल्या त्या त्याने काढून टाकल्या.
25मोशेच्या नियमशास्त्रानुसार आपल्या सर्व मनाने, आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व बलाने परमेश्वरभजनी लागणारा योशीयासारखा राजा पूर्वी होऊन गेला नाही व पुढेही झाला नाही.
26एवढे त्याने केले तरीदेखील मनश्शेने जी संतापजनक कृत्ये करून परमेश्वराला संतप्त केले होते त्यामुळे परमेश्वराचा जो महाक्रोध यहूदावर भडकला होता तो शमला नाही.
27परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलास जसे आपल्या नजरेपुढून दूर केले तसेच यहूदासही दूर करीन; हे यरुशलेम नगर मी निवडले होते व ह्या मंदिरात माझ्या नावाचा निवास होईल असे मी म्हणालो होतो, त्याचाही मी त्याग करीन.”
योशीयाचा मृत्यू
(२ इति. 35:20-27)
28योशीयाची बाकीची कृत्ये व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
29त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीस मिसर देशाचा राजा फारो-नखो हा अश्शूराच्या राजावर चढाई करून फरात महानदापर्यंत गेला असताना योशीया राजा त्याच्यावर चालून गेला; योशीया मगिद्दो येथे त्याच्यासमोर आला तेव्हा त्याला त्याने ठार केले.
30त्याच्या चाकरांनी त्याचे प्रेत रथावर घालून मगिद्दो येथून यरुशलेमेस पोहचवले; त्याने स्वतः केलेल्या थडग्यात त्यांनी त्याला मूठमाती दिली. मग देशातील लोकांनी योशीयाचा पुत्र यहोआहाज ह्याला अभिषेक करून त्याच्या बापाच्या जागी राजा केले.
यहोआहाजाची कारकीर्द व पदच्युती
(२ इति. 36:1-4)
31यहोआहाज राज्य करू लागला तेव्हा तो तेवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत तीन महिने राज्य केले; त्याच्या आईचे नाव हमूटल; ही लिब्नाकर यिर्मया ह्याची कन्या.
32त्याच्या वाडवडिलांनी केले होते त्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.
33यरुशलेमेत त्याला राज्य करता येऊ नये म्हणून फारो-नखो ह्याने हमाथ देशातले रिब्ला येथे त्याला बेड्या घालून ठेवले आणि त्याच्या देशावर शंभर किक्कार1 चांदी व एक किक्कार सोने एवढी खंडणी बसवली.
34मग फारो-नखो ह्याने योशीयाचा पुत्र एल्याकीम ह्याला त्याच्या बापाच्या जागी राजा केले, त्याने त्याचे नाव बदलून यहोयाकीम असे ठेवले; यहोआहाज मिसर देशाला गेल्यावर मरण पावला.
35यहोयाकीम ह्याने फारोला सोने व रुपे दिले; पण हा पैसा फारोच्या हुकमाप्रमाणे देण्यासाठी त्याला देशावर कर बसवावा लागला; देशातल्या सर्व लोकांवर कर बसवून फारो-नखो ह्याला देण्यासाठी त्याने प्रत्येकाकडून सोने व रुपे वसूल केले.
यहोयाकीमाची कारकीर्द
(२ इति. 36:5-8)
36यहोयाकीम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत अकरा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव जबूदा; ती रुमा येथला पदाया ह्याची कन्या.
37त्याने आपल्या पूर्वजांच्या सर्व करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

सध्या निवडलेले:

२ राजे 23: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन