२ राजे 21
21
मनश्शेची कारकीर्द
(२ इति. 33:1-20)
1मनश्शे राज्य करू लागला तेव्हा तो बारा वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत पंचावन्न वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव हेफ्सीबा असे होते.
2इस्राएल लोकांपुढून परमेश्वराने ज्या राष्ट्रांना घालवून दिले होते त्यांच्या अमंगळ आचारांप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते मनश्शेने केले.
3त्याचा बाप हिज्कीया ह्याने उच्च स्थाने उद्ध्वस्त केली होती ती त्याने पुन्हा बांधली; इस्राएलाचा राजा आहाब ह्याच्याप्रमाणे बआलमूर्तीसाठी वेदी बांधून त्याने एक अशेरामूर्ती केली; त्याप्रमाणेच तो नक्षत्रगणांची पूजा करत असे.
4परमेश्वराने ज्या आपल्या मंदिराविषयी म्हटले होते की, “यरुशलेमेत मी आपले नाव ठेवीन” त्यात त्याने वेद्या बांधल्या.
5परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत त्याने नक्षत्रगणांसाठी वेद्या बांधल्या.
6त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून तो अर्पण केला; तो शकुनमुहूर्त पाळत असे, जादूटोणा करत असे आणि भूतवैद्य व चेटकी ह्यांच्याशी संबंध ठेवत असे; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्याला संताप आणला.
7आपण केलेली अशेरामूर्ती त्याने परमेश्वराच्या मंदिरात ठेवली; ह्या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शलमोन ह्यांना परमेश्वर म्हणाला होता की, “हे मंदिर आणि इस्राएलाच्या सर्व वंशांतून निवडून घेतलेले यरुशलेम ह्यात मी आपले नाम निरंतर ठेवीन;
8मी त्यांना ज्या आज्ञा दिल्या होत्या आणि माझा सेवक मोशे ह्याने त्यांना जे नियमशास्त्र दिले होते ते सर्व मान्य करून ते पाळतील तर जो देश इस्राएल लोकांच्या पूर्वजांना दिला आहे तेथून ते निघून चोहोकडे भटकतील असे मी करणार नाही.”
9पण त्यांनी ऐकले नाही. मनश्शेने त्यांना एवढे बहकवले की इस्राएलांदेखत परमेश्वराने ज्या राष्ट्रांचा संहार केला होता त्यांच्यापेक्षाही ते अधिकच दुष्कर्म करू लागले.
10ह्यासाठी परमेश्वर आपले सेवक जे संदेष्टे त्यांच्या द्वारे बोलला, तो म्हणाला,
11“यहूदाचा राजा मनश्शे ह्याने ही अमंगळ कृत्ये केली आहेत; पूर्वीच्या अमोरी लोकांपेक्षाही अधिक दुष्कर्म केले आहे आणि आपण मूर्तींच्या नादी लागून यहूदालाही पाप करायला लावले आहे;
12म्हणून इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो,“पाहा, मी यरुशलेम व यहूदा ह्यांवर एवढे अरिष्ट आणणार आहे की ज्याच्या कानावर ते जाईल त्याचे दोन्ही कान भणभणतील.
13मी शोमरोनावर लावलेले मापनसूत्र व अहाबाच्या घराण्याला लावलेला ओळंबा यरुशलेमेला लावीन; थाळी जशी घासूनपुसून व उलथीपालथी करून ठेवतात तसेच मी यरुशलेमेचे करीन.
14शेष राहिलेल्या माझ्या वतनरूप लोकांचा मी त्याग करीन; त्यांना शत्रूंच्या हाती देईन; ते आपल्या सर्व शत्रूंचे भक्ष्य व लूट होतील;
15कारण त्यांचे पूर्वज मिसर देशातून बाहेर निघाले तेव्हापासून आजपर्यंत माझ्या दृष्टीने जे वाईट ते करून त्यांनी मला संताप आणला आहे.”
16मनश्शेने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करून यहूदाला पाप करायला लावले, एवढेच नव्हे तर त्याने निर्दोषी जनांचा मनस्वी संहार केला, एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत यरुशलेम रक्तमय केले.
17मनश्शेची बाकीची कृत्ये, त्याने जे काही केले ते सर्व आणि त्याने केलेले पापकर्म ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
18मनश्शे आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याच्या वाड्याच्या बागेत म्हणजे अर्थात उज्जाच्या बागेत त्याला मूठमाती देण्यात आली आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र आमोन हा राजा झाला.
आमोनाची कारकीर्द
(२ इति. 33:21-25)
19आमोन राज्य करू लागला तेव्हा तो बावीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत दोन वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव मशुल्लेमेथ असे होते; ती यटबा येथला हारूस ह्याची कन्या.
20त्याने आपला बाप मनश्शे ह्याच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
21त्याचा बाप ज्या मार्गांनी चालला त्याने तो चालला; ज्या मूर्तींची त्याच्या बापाने पूजा केली त्यांची पूजा त्यानेही केली.
22आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर ह्याला त्याने सोडले; तो परमेश्वराच्या मार्गाने चालला नाही.
23आमोनाच्या चाकरांनी त्याच्याशी फितुरी केली; त्यांनी राजाला त्याच्याच वाड्यात जिवे मारले;
24पण ज्यांनी आमोन राजाशी फितुरी केली त्या सर्वांना देशातल्या लोकांनी जिवे मारले, आणि त्यांनी त्याच्या जागी त्याचा पुत्र योशीया ह्याला राजा केले.
25आमोनाची बाकीची कृत्ये यहूदाच्या राजांच्या बखरीत वर्णन केली आहेत, नाहीत काय?
26आमोनाला उज्जाच्या बागेत त्यानेच बांधलेल्या थडग्यात मूठमाती देण्यात आली; त्याच्या जागी त्याचा पुत्र योशीया हा राजा झाला.
सध्या निवडलेले:
२ राजे 21: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.