YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 2:15-25

२ राजे 2:15-25 MARVBSI

यरीहो येथल्या संदेष्ट्यांचे शिष्य त्याला लांबून पाहून म्हणाले, “एलीयाचा आत्मा अलीशाच्या ठायी उतरला आहे.” त्यांनी सामोरे येऊन त्याला जमिनीपर्यंत लवून नमन केले. ते त्याला म्हणाले, “ऐका, आपल्या सेवकांजवळ पन्नास बळकट पुरुष आहेत; त्यांना आपल्या स्वामीचा शोध करण्यास जाऊ द्या; परमेश्वराच्या आत्म्याने त्याला उचलून एखाद्या पर्वतावर अथवा एखाद्या खोर्‍यात टाकले असेल.” तो म्हणाला, “कोणालाही पाठवू नका.” त्यांनी त्याला एवढा आग्रह केला की त्यांची त्याला भीड पडून तो म्हणाला, “पाठवा.” त्यांनी पन्नास पुरुष पाठवले. त्यांनी त्याचा तीन दिवस शोध केला, पण त्यांना तो सापडला नाही. ते परत आले तेव्हा तो यरीहो येथे होता; तो त्यांना म्हणाला, “जाऊ नका असे मी तुम्हांला सांगितले नव्हते काय?” त्या नगराचे रहिवासी अलीशाला म्हणाले, “पाहा, हे नगर मनोहर स्थळी वसले आहे, हे आमच्या स्वामीला दिसतच आहे; पण येथले पाणी फार वाईट असल्यामुळे जमिनीत काही पिकत नाही.” त्याने म्हटले, “एक नवे पात्र माझ्याकडे आणा व त्यात मीठ घाला.” त्यांनी ते पात्र त्याच्याकडे आणले. मग तो पाण्याच्या झर्‍यानजीक गेला व त्यात ते मीठ टाकून म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मी हे पाणी चांगले करतो, ह्यापुढे ह्याने मृत्यू येणार नाही व पीक बुडणार नाही.” अलीशाच्या ह्या वचनानुसार ते पाणी चांगले झाले, ते आजवर तसेच आहे. तो तेथून वरती बेथेलकडे चालला; तो वाट चढून जात असता नगरातून काही पोरे बाहेर येऊन त्याची थट्टा करून म्हणाली, “अरे टकल्या, वर जा.” त्याने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले व परमेश्वराचे नाव घेऊन त्यांना शाप दिला. तेव्हा वनातून दोन अस्वली बाहेर पडल्या व त्यांनी त्यांच्यातल्या बेचाळीस पोरांना फाडून टाकले. तो तेथून निघून कर्मेल पर्वताकडे आला आणि तेथून शोमरोनाला माघारी गेला.