YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 18

18
हिज्कीयाची कारकीर्द
(२ इति. 29:1-2)
1इस्राएलाचा राजा होशे बिन एला ह्याच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी यहूदाचा राजा हिज्कीया बिन आहाज राज्य करू लागला.
2तो राज्य करू लागला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत एकोणतीस वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव अबी असे होते; ती जखर्‍याची कन्या.
3त्याचा पूर्वज दावीद ह्याच्या सर्व करणीप्रमाणे तो परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते करी.
4त्याने उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तिस्तंभ फोडले, अशेरा मूर्तींचा उच्छेद केला व मोशेने केलेल्या पितळी सर्पाचे चूर्ण केले; कारण, हा काळपावेतो इस्राएल लोक त्यापुढे धूप जाळत असत; त्याला नहुश्तान (पितळेचा तुकडा) हे नाव दिले होते.
5इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यावर त्याचा भाव असे; त्याच्यामागून यहूदाच्या सर्व राजांमध्ये त्याच्या तोडीचा कोणी होऊन गेला नाही व त्याच्यापूर्वीही झाला नाही.
6तो परमेश्वराला धरून राहिला; त्याला अनुसरण्याचे त्याने सोडले नाही; परमेश्वराने मोशेला ज्या आज्ञा विहित केल्या होत्या त्या त्याने पाळल्या.
7ह्यास्तव परमेश्वर त्याच्याबरोबर होता; जिकडेजिकडे तो जाई तिकडेतिकडे त्याला यशःप्राप्ती होई; त्याने अश्शूराच्या राजाविरुद्ध बंड केले; त्याचा तो अंकित राहिला नाही.
8गज्जा व त्याची शिवारे येथपर्यंत पहारेकर्‍यांच्या बुरुजा-पासून तटबंदीच्या नगरांपर्यंतच्या पलिष्ट्यांना त्याने मार दिला.
शोमरोनाचा पाडाव
9हिज्कीया राजाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी म्हणजे इस्राएलाचा राजा होशे बिन एला ह्याच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी अश्शूरचा राजा शल्मनेसर ह्याने शोमरोनावर स्वारी करून त्याला वेढा दिला.
10तीन वर्षांच्या अखेरीस त्याने ते सर केले; हिज्कीयाच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी म्हणजे इस्राएलाचा राजा होशे ह्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी शोमरोन सर करण्यात आले.
11मग अश्शूराच्या राजाने इस्राएलास पाडाव करून अश्शूर देशात नेले आणि हलह व हाबोर येथे आणि गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरांत त्यांना वसवले;
12ह्याचे कारण हेच की त्यांनी आपला देव परमेश्वर ह्याची वाणी मानली नाही व त्याचा करार मोडला; परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने विहित केलेले सर्वकाही त्यांनी जुमानले नाही; ते, ते ऐकेनात व त्याप्रमाणे वागेनात.
सन्हेरीबाची स्वारी
(२ इति. 32:1-19; यश. 36:1-22)
13हिज्कीया राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांवर चढाई करून ती घेतली.
14यहूदाचा राजा हिज्कीया ह्याने अश्शूराच्या राजाला लाखीश येथे सांगून पाठवले की, “माझ्या हातून अपराध झाला आहे, आता माझ्याकडून परत जा; आपण माझ्यावर जो बोजा लादाल तो मी सहन करीन.” यहूदाचा राजा हिज्कीया ह्याने तीनशे किक्कार1 चांदी व तीस किक्कार सोने खंडणी द्यावी असे अश्शूराच्या राजाने ठरवले.
15परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्याच्या भांडारात जेवढी चांदी मिळाली तेवढी हिज्कीयाने त्याला दिली.
16त्या वेळी हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे व दारबाह्या ह्यांवर जी सोन्याची मढणी केली होती ती काढून अश्शूराच्या राजाला दिली.
17एवढ्यावरही अश्शूराच्या राजाने तर्तान, रब-सारीस व रब-शाके (उच्चाधिकारी) ह्यांना मोठ्या सैन्यानिशी लाखीशाहून यरुशलेमेस हिज्कीयाकडे पाठवले. ते यरुशलेमेला जाऊन परटाच्या शेताजवळच्या वरच्या तळ्याच्या नळानजीक येऊन ठेपले.
18त्यांनी राजाला बोलावणे पाठवले तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम बिन हिल्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे त्याच्याकडे गेले.
19तेव्हा रब-शाके त्यांना म्हणाला, “हिज्कीयाला सांगा की, राजाधिराज, अश्शूरचा राजा म्हणतो, हा तुझा भरवसा कसला!
20तू बोलून दाखवलेला तुझा युद्धसंकल्प व युद्धबल ह्या केवळ वायफळ गोष्टी आहेत. तू माझ्याशी फितूर झालास तो कोणाच्या बळावर?
21पाहा, तो मिसर म्हणजे चेचलेला बोरू, त्यावर तू टेकतोस; त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल; जे कोणी मिसरी राजा फारो ह्याच्यावर टेकतात त्यांना तो असाच आहे.
22तू मला म्हणशील, आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवतो, तर ज्याची उच्च स्थाने व वेदी काढून टाकून यहूदा व यरुशलेम ह्यांना हिज्कीया म्हणाला की, ‘ह्या एका वेदीपुढे यरुशलेमेत भजन करा, तोच नव्हे का तो देव?’
23आता माझा स्वामी अश्शूरचा राजा ह्याच्याशी सामना करण्यासाठी उभा राहा; तुला स्वार बसवण्याची ताकद असली तर तुला दोन हजार घोडे देतो.
24माझ्या धन्याच्या अगदी कनिष्ठ दर्जाच्या एका तरी सरदाराला तू कसा पिटाळशील? म्हणूनच तू रथ आणि स्वार मिळवण्यासाठी मिसरावर भिस्त ठेवतोस ना?
25मी ह्या देशावर चाल करून ह्याचा नाश करण्यास आलो तो का परमेश्वराच्या सांगण्यावाचून? परमेश्वरानेच मला सांगितले की ह्या देशावर चढाई करून जा व ह्याचा विध्वंस कर.”
26मग एल्याकीम बिन हिल्कीया, शेबना व यवाह ह्यांनी रब-शाके ह्याला विनंती केली की, “आपल्या दासांशी अरामी भाषेत बोला, ती आम्हांला समजते; कोटावरील लोकांच्या कानी पडेल म्हणून यहूदी भाषेत आमच्याशी बोलू नका.”
27रब-शाके ह्याने उत्तर केले की, “माझ्या धन्याने केवळ तुझ्या धन्याशी व तुझ्याशी हे बोलण्यासाठी मला पाठवले काय? जे तुमच्याबरोबर कोटावर बसले आहेत त्यांनी आपले मलमूत्र भक्षण करावे म्हणून त्यांच्याकडेही पाठवले नाही काय?”
28मग रब-शाके पुढे होऊन यहूदी भाषेत मोठ्याने म्हणाला, “राजाधिराज, अश्शूरचा राजा ह्याचे म्हणणे ऐका!
29राजा म्हणतो, ‘हिज्कीयाला तुम्हांला भुरळ घालू देऊ नका, त्याच्याने तुमचा माझ्या हातून बचाव होणार नाही.
30परमेश्वर आमचा बचाव करीलच करील, हे शहर अश्शूराच्या राजाच्या हाती जाणार नाही असे बोलून हिज्कीया तुम्हांला परमेश्वरावर भिस्त ठेवायला न लावो.’
31हिज्कीयाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा म्हणतो, माझ्याशी सल्ला करा व माझ्याकडे निघून या; आणि तूर्त तुम्ही प्रत्येक जण आपापल्या द्राक्षवेलाचे फळ खा, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या अंजिराचे फळ खा, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या हौदांचे पाणी प्या;
32पुढे मी येऊन तुमच्या देशासारखा देश, धान्याचा व द्राक्षारसाचा देश, अन्नाचा व द्राक्षाच्या मळ्यांचा देश, जैतून तेलाचा व मधाचा देश ह्यात तुम्हांला नेईन; म्हणजे तुम्ही जिवंत राहाल, मरणार नाही; परमेश्वर आमचा बचाव करील असे बोलून हिज्कीया तुमचे मन वळवू पाहील तेव्हा त्याचे ऐकू नका.
33राष्ट्रांच्या देवांपैकी कोणी आपला देश अश्शूराच्या राजाच्या हातून सोडवला आहे?
34हमाथ व अर्पाद ह्यांचे देव कोठे आहेत? सफरवाईम, हेना व इव्वा ह्यांचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोन माझ्या हातून सोडवले आहे काय?
35ह्या सर्व देशांच्या देवांपैकी कोणी आपला देश माझ्या हातून सोडवला? तर परमेश्वर माझ्या हातून यरुशलेम कसे सोडवणार?”
36लोक गप्प राहिले, त्याच्याशी एकही शब्द बोलले नाहीत; कारण “तुम्ही त्याला उत्तर देऊ नका” अशी राजाची त्यांना ताकीद होती.
37मग खानगी कारभारी एल्याकीम बिन हिल्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे आपली वस्त्रे फाडून हिज्कीयाकडे आले व त्याला त्यांनी रब-शाके ह्याचे बोलणे कळवले.

सध्या निवडलेले:

२ राजे 18: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन