होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूराच्या राजाने शोमरोन सर केले व इस्राएल लोकांना अश्शूर देशात नेऊन हलह व हाबोर येथे व गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरांतून वसवले. ह्याचे कारण असे की इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने त्यांना मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या हातातून सोडवून मिसर देशातून बाहेर आणले होते तरी त्याच्याविरुद्ध त्यांनी पाप केले व अन्य देवांची पूजा केली, आणि ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएल लोकांपुढून घालवले होते त्यांचे नियम व इस्राएलाच्या राजांनी आचरणात आणलेले नियम ह्यांचे त्यांनी अवलंबन केले होते. तसेच इस्राएल लोकांनी आपला देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध अनुचित गोष्टी गुप्तपणे केल्या; पहारेकर्यांचे बुरूज असोत की तटबंदीची नगरे असोत, अशा आपल्या सर्व नगरांत त्यांनी उच्च स्थाने स्थापन केली. त्यांनी सर्व उंच पहाडांवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली मूर्तिस्तंभ व अशेरामूर्ती स्थापन केल्या; आणि परमेश्वराने जी राष्ट्रे त्यांच्यापुढून घालवली होती त्यांच्याप्रमाणे त्यांनी सगळ्या उच्च स्थानी धूप जाळला आणि परमेश्वराला संताप येईल अशा प्रकारची वाईट कर्मे केली. परमेश्वराने त्यांना “मूर्तीची उपासना करू नका” असे सांगितले असूनही त्यांनी त्यांची उपासना केली. तरी परमेश्वराने सर्व संदेष्टे व द्रष्टे ह्यांच्या द्वारे इस्राएल व यहूदा ह्यांना बजावून सांगितले होते की, “तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून तुमच्या पूर्वजांना जे सगळे नियमशास्त्र मी विहित करून माझे सेवक संदेष्टे ह्यांच्या द्वारे तुमच्याकडे पाठवले होते त्याला अनुसरून माझ्या आज्ञा व नियम पाळावेत.” इतके असूनही ते ऐकेनात; तर त्यांच्या पूर्वजांनी आपला देव परमेश्वर ह्याच्यावर विश्वास न ठेवता मान ताठ केली त्याप्रमाणे त्यांनी केले. आणि त्यांनी त्याचे नियम, त्यांच्या वाडवडिलांशी केलेला त्याचा करार व त्यांना पढवलेले त्याचे निर्बंध ह्यांचा त्यांनी अव्हेर केला. ते भ्रामक गोष्टींच्या मागे लागून भ्रांत झाले आणि ज्या आसपासच्या परराष्ट्रांप्रमाणे करू नका असे परमेश्वराने त्यांना बजावले होते त्यांचे त्यांनी अनुकरण केले. त्यांनी आपला देव परमेश्वर ह्याच्या सर्व आज्ञा सोडून देऊन वासरांच्या दोन ओतीव मूर्ती तयार केल्या; त्यांनी अशेरामूर्ती केली, सर्व नक्षत्रगणांची पूजा केली, आणि बआलमूर्तीची उपासना केली. त्यांनी आपले पुत्र व कन्या ह्यांचे अग्नीत होम करून त्यांचे अर्पण केले; ते शकुनमुहूर्त पाहू लागले व जादूटोणा करू लागले आणि जे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट व ज्यामुळे त्याला संताप येतो ते करण्यासाठी त्यांनी आपल्याला वाहून घेतले. त्यामुळे परमेश्वर इस्राएलावर अति कोपायमान झाला; त्याने त्यांना आपल्या दृष्टिआड केले; यहूदाच्या वंशाखेरीज कोणी उरला नाही. यहूदानेही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत; इस्राएलाने जे नियम केले होते त्यांचे त्याने अवलंबन केले. म्हणून परमेश्वराने इस्राएलाच्या सर्व वंशजांचा त्याग करून त्यांना पिडले, त्यांना लुटणार्यांच्या हाती दिले व शेवटी त्यांना आपल्या दृष्टीसमोरून घालवून दिले. त्याने इस्राएलास दाविदाच्या घराण्यापासून निराळे केले; तेव्हा लोकांनी नबाटपुत्र यराबाम ह्याला आपला राजा केले; त्या यराबामाने इस्राएलास परमेश्वराच्या मार्गापासून परावृत्त करून त्यांच्याकडून महापातक करवले. यराबामाने जी पातके केली त्यांचे अनुकरण इस्राएल लोकांनी केले; त्यांनी ती पातके सोडून दिली नाहीत. शेवटी परमेश्वराने आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांच्या द्वारे सांगितल्याप्रमाणे इस्राएलास आपल्या दृष्टिआड केले. त्यांना स्वदेशातून काढून अश्शूरास नेण्यात आले; तेथेच ते आजवर राहत आहेत.
२ राजे 17 वाचा
ऐका २ राजे 17
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 17:6-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ