YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 15

15
अजर्‍याची कारकीर्द
(२ इति. 26:3-5,16-23)
1इस्राएलाचा राजा यराबाम ह्याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदाचा राजा अजर्‍या2 बिन अमस्या राज्य करू लागला.
2तो राज्य करू लागला तेव्हा सोळा वर्षांचा होता, त्याने यरुशलेमेत बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखिल्या, ती यरुशलेमकरीण होती.
3त्याचा बाप अमस्या ह्याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी.
4तरी उच्च स्थाने काढून टाकण्यात आली नव्हती; लोक अद्यापि उच्च स्थानी यज्ञ करत व धूप जाळत होते.
5परमेश्वराने राजाला अशी शिक्षा केली की तेणेकरून तो आमरण कोडी झाला; तो निराळ्या घरात राहत असे. राजपुत्र योथाम हा त्याचा खानगी कारभारी होऊन देशातील लोकांचा न्यायनिवाडा करत असे.
6अजर्‍याच्या बाकीच्या कृत्यांचे व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
7अजर्‍या3 आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्यांनी त्याला दावीदपुरात त्याच्या पितरांमध्ये मूठमाती दिली. त्याचा पुत्र योथाम हा त्याच्या जागी राजा झाला.
जखर्‍याची कारकीर्द
8यहूदाचा राजा अजर्‍या ह्याच्या कारकिर्दीच्या अडतिसाव्या वर्षी जखर्‍या बिन यराबाम इस्राएलावर शोमरोनात राज्य करू लागला; त्याने सहा महिने राज्य केले.
9त्याने आपल्या वाडवडिलांप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले; नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली ती त्याने सोडून दिली नाहीत.
10याबेशाचा पुत्र शल्लूम ह्याने त्याच्याशी फितुरी करून व त्याला लोकांदेखत मार देऊन वधले, आणि त्याच्या जागी तो राजा झाला.
11जखर्‍याची बाकीची कृत्ये इस्राएलाच्या राजांच्या बखरीत वर्णन केली आहेत ती पाहा.
12परमेश्वराने येहूस सांगितले होते की, “चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलाच्या गादीवर बसतील.” त्याप्रमाणे घडून आले.
शल्लूमची कारकीर्द
13यहूदाचा राजा उज्जीया1 ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणचाळिसाव्या वर्षी शल्लूम बिन याबेश हा राज्य करू लागला; त्याने शोमरोनात एक महिना राज्य केले.
14मनहेम बिन गादी हा तिरसा येथून शोमरोनास गेला आणि तेथे त्याने शल्लूम बिन याबेश ह्याला मार देऊन वधले आणि त्याच्या जागी तो राजा झाला.
15शल्लूमाची बाकीची कृत्ये व त्याने केलेले बंड ह्या सर्वांचे इस्राएलाच्या राजांच्या बखरीत वर्णन केले आहे ते पाहा.
16मग मनहेमाने तिरसा येथून निघून तिफसाहात व त्याच्या शिवारात राहणार्‍या लोकांना मार दिला; त्यांनी त्याला आपल्या वेशी उघडल्या नाहीत म्हणून त्याने त्यांना हा मार दिला; त्याने तेथल्या गर्भवती स्त्रिया चिरून काढल्या.
मनहेमची कारकीर्द
17यहूदाचा राजा अजर्‍या ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणचाळिसाव्या वर्षी मनहेम बिन गादी इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने दहा वर्षे शोमरोनात राज्य केले.
18परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली ती त्याने आमरण सोडली नाहीत.
19अश्शूरचा राजा पूल ह्याने देशावर स्वारी केली तेव्हा आपणास त्याने मदत करून गादीवर आपली स्थापना स्थिर करावी म्हणून मनहेमाने त्याला एक हजार किक्कार2 चांदी दिली.
20अश्शूराच्या राजाला देण्यासाठी मनहेमाने इस्राएलातल्या मोठमोठ्या धनवान लोकांकडून प्रत्येकी पन्नास शेकेल चांदी काढली. मग अश्शूरचा राजा परत गेला, देशात थांबला नाही.
21मनहेमाची बाकीची कृत्ये व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
22मनहेम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; आणि त्याचा पुत्र पकह्या हा त्याच्या जागी राजा झाला.
पकह्याची कारकीर्द
23यहूदाचा राजा अजर्‍या ह्याच्या कारकिर्दीच्या पन्नासाव्या वर्षी पकह्या बिन मनहेम शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने दोन वर्षे राज्य केले.
24परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली ती त्याने सोडून दिली नाहीत.
25त्याचा सरदार रमाल्याचा पुत्र पेकह ह्याने त्याच्याशी फितुरी करून शोमरोनाच्या राजवाड्याच्या मनोर्‍यात त्याला व त्याच्याबरोबर अर्गोब व अरये ह्यांना वधले; पेकहाबरोबर पन्नास गिलादी लोक होते; त्यांना वधून त्याच्या जागी तो राजा झाला.
26पकह्याची बाकीची कृत्ये व जे काही त्याने केले त्या सर्वांचे वर्णन इस्राएलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, ते पाहा.
पेकहाची कारकीर्द
27यहूदाचा राजा अजर्‍या ह्याच्या बावन्नाव्या वर्षी पेकह बिन रमाल्या शोमरोन येथे इस्राएलावर राज्य करू लागला, त्याने वीस वर्षे राज्य केले.
28परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली ती त्याने सोडून दिली नाहीत.
29इस्राएलाचा राजा पेकह ह्याच्या वेळी अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याने येऊन ईयोन, आबेल-बेथ-माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद व गालील तसेच सबंध नफताली प्रांत घेतला; तेथील लोक त्याने पाडाव करून अश्शूरास नेले.
30उज्जीयाचा3 पुत्र योथाम ह्याच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी होशे बिन एला ह्याने पेकह बिन रमाल्या ह्याच्याशी फितुरी करून त्याला मार देऊन त्याचा वध केला आणि तो त्याच्या गादीवर बसला.
31पेकह ह्याची बाकीची कृत्ये व जे काही त्याने केले त्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, ते पाहा.
योथामाची कारकीर्द
(२ इति. 27:1-9)
32इस्राएलाचा राजा पेकह बिन रमाल्या ह्याच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी यहूदाचा राजा योथाम बिन उज्जीया राज्य करू लागला.
33तो राज्य करू लागला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरुशा असे होते; ती सादोकाची कन्या.
34परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते त्याने केले; त्याचा बाप उज्जीया ह्याच्या एकंदर वागणुकीप्रमाणे तो वागला.
35तरी उच्च स्थाने काढून टाकण्यात आली नव्हती; लोक अद्यापि उच्च स्थानी यज्ञ करत व धूप जाळत होते. परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा त्याने बांधला.
36योथामाची बाकीची कृत्ये व जे काही त्याने केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
37त्या काळी अरामाचा राजा रसीन व रमाल्याचा पुत्र पेकह ह्यांना परमेश्वर यहूदावर चढाई करण्यास पाठवू लागला.
38योथाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याचा पूर्वज दावीद ह्याच्या नगरात त्याच्या पितरांमध्ये त्याला मूठमाती दिली; त्याचा पुत्र आहाज हा त्याच्या जागी राजा झाला.

सध्या निवडलेले:

२ राजे 15: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन