YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 7

7
1तेव्हा प्रियजनहो, आपल्याला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.2
तीताच्या येण्याने झालेले सांत्वन
2तुम्ही आमचा अंगिकार करा; आम्ही कोणावर अन्याय केला नाही; कोणाला बिघडवले नाही, कोणाचा गैरफायदा घेतला नाही.
3दोषी ठरवण्यासाठी मी हे म्हणत आहे असे नाही; कारण मी पूर्वीच सांगितले आहे की, तुम्हांला आमच्या अंत:करणात असे स्थान आहे की, आम्ही मरणार तुमच्याबरोबर व जगणारही तुमच्याबरोबर.
4मला तुमचा मोठा भरवसा आहे; मला तुमच्याविषयी फार अभिमान आहे; माझे पुरेपूर सांत्वन झाले आहे; आमच्यावर आलेल्या सर्व संकटांत मला आनंदाचे भरते आले आहे.
5आम्ही मासेदोनियात आल्यावरही आम्हांला शारीरिक स्वस्थता अशी नव्हतीच, तर आम्ही चहूकडून गांजलेले होतो; बाहेर भांडणतंटे, आत भीती.
6तथापि दीनांचे सांत्वन करणारा देव ह्याने तीताच्या येण्याकडून आमचे सांत्वन केले;
7आणि त्याच्या येण्याकडून केवळ नाही तर तुमची उत्कंठा, तुमचा शोक, तुमची माझ्याविषयीची आस्था ह्यांसंबंधाने आम्हांला सांगत असताना, तुमच्या बाबतीत त्याचे जे सांत्वन झाले त्याच्या योगाने आमचे सांत्वन होऊन मला विशेष आनंद झाला.
8मी आपल्या पत्राने तुम्हांला दु:ख दिले ह्याबद्दल मला वाईट वाटत नाही; मला वाईट वाटले होते; कारण त्या पत्रापासून तुम्हांला काही वेळ तरी दु:ख झाले असे मला दिसते.
9तरी आता मी आनंद करतो; तुम्हांला दु:ख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्‍चात्ताप होण्याजोगे दु:ख झाले ह्यामुळे; कारण देवानुसार तुमचे हे दु:ख दैवी होते; आमच्या हातून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले.
10कारण ईश्वरप्रेरित दुःख तारणदायी पश्‍चात्तापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते.
11कारण पाहा, तुमचे हे दुःख दैवी होते; ह्या एकाच गोष्टीने तुमच्यामध्ये केवढी कळकळ, केवढे दोषनिवारण, केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी उत्पन्न झाली! ह्या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात ह्याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले.
12तथापि मी तुम्हांला लिहिले ते ज्याने अन्याय केला त्याच्यामुळे नव्हे, आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्यामुळेही नव्हे, तर आमच्याविषयी तुम्ही दाखवत असलेल्या कळकळीची जाणीव तुम्हांला देवासमक्ष व्हावी म्हणून लिहिले.
13ह्यामुळे आमचे सांत्वन झाले आहे; आणि आमचे सांत्वन झाले इतकेच नव्हे, तर विशेषेकरून तीताला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो; कारण तुम्हा सर्वांकडून त्याच्या मनाला स्वस्थता मिळाली.
14मी त्याच्याजवळ तुमच्याविषयी कसलाही अभिमान बाळगला तरी मला खाली पाहण्याची पाळी आली नाही; तर आम्ही तुमच्याबरोबर सर्व गोष्टी खरेपणाने बोललो, त्याप्रमाणे तीताजवळ आम्ही अभिमानयुक्त केलेले भाषणही खरे ठरले.
15आणि तुम्ही सर्वांनी भीत भीत व कापत कापत त्याचा स्वीकार करून आज्ञांकितपणा दर्शवला ह्याची तो आठवण करतो; म्हणून त्याला तुमच्याविषयी आत्यंतिक ममता आहे.
16मला सर्व बाबतींत तुमचा भरवसा वाटतो म्हणून मी आनंद करतो.

सध्या निवडलेले:

२ करिंथ 7: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन