YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 12

12
उदात्त आध्यात्मिक साक्षात्कार व दैहिक अशक्तता
1प्रौढी मिरवणे मला भाग पडते; तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मी प्रभूचे दृष्टान्त व प्रकटीकरणे ह्यांच्याकडे आता वळतो.
2ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्य मला माहीत आहे, त्याला चौदा वर्षांमागे तिसर्‍या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते; (त्याला सदेह नेण्यात आले किंवा विदेही1 असे नेण्यात आले हे मला ठाऊक नाही; देवाला ठाऊक आहे;)
3,4त्याच मनुष्याविषयी मला माहीत आहे की, त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले, (सदेह किंवा विदेही हे मला ठाऊक नाही; देवाला ठाऊक आहे;) आणि माणसाने ज्यांचा उच्चारही करणे उचित नाही2 अशी वाक्ये त्याने ऐकली.
5अशा मनुष्याविषयी मी प्रौढी मिरवणार; मी स्वत:विषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन.
6कारण मी आपली प्रौढी मिरवण्याची इच्छा धरली तरी मी मूढ ठरणार नाही; मी खरे तेच बोलेन; तथापि मी बोलत नाही; कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो, किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्यापलीकडे मला कोणी मानू नये.
7प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे.
8हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केली;
9परंतु त्याने मला म्हटले आहे, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन.
10ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यांत मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.
आढ्यतेने लिहिण्याचे कारण
11मी मूढ बनलो! असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले; माझी शिफारस तुम्ही करायची होती; कारण जरी मी काही नसलो तरी ह्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नव्हतो.
12चिन्हे, अद्भुते व महत्कृत्ये ह्यांच्या योगे तुमच्यामध्ये प्रेषिताने करायची चिन्हे पूर्ण धीराने करून दाखवण्यात आली.
13कारण मी आपला भार तुमच्यावर टाकला नाही, ह्याखेरीज कोणत्या गोष्टीत इतर मंडळ्यांपेक्षा तुम्ही कमी ठरलात? माझ्या ह्या अपराधाची क्षमा करा.
14पाहा, तिसर्‍यांदा तुमच्याकडे येण्यास मी तयार आहे; आणि मी तुमच्यावर भार टाकणार नाही; कारण मी तुमचे काही मागत नाही, तर स्वतः तुम्हीच मला पाहिजे आहात; आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी आईबापांसाठी नव्हे.
15मी तुमच्या जिवांसाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वत: सर्वस्वी खर्ची पडेन. मी तुमच्यावर अतिशयच प्रीती करतो म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता की काय?
16असो, मी तुमच्यावर भार घातला नाही; तरी तुम्ही म्हणता मी धूर्त होतो म्हणून तुम्हांला कपटाने पकडले.
17ज्यांना मी तुमच्याकडे पाठवले त्यांच्यातील एकाच्या द्वारे तरी मी तुमचा गैरफायदा घेतला काय?
18मी तीतास विनंती केली, व त्याच्याबरोबर एका बंधूला पाठवले. तीताने तुमचा गैरफायदा घेतला काय? आम्ही एकाच आत्म्याने, सारख्याच चालीने चाललो नाही काय?
19तुमच्याशी आम्ही प्रतिवाद करत आहोत असे इतका वेळ तुम्हांला वाटले असेल; पण आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलत आहोत. प्रियजनहो, हे सर्व तुमच्या उन्नतीसाठी आहे.
20कारण मला भीती वाटते की, मी आल्यावर, जशी माझी अपेक्षा आहे तसे कदाचित तुम्ही मला दिसून येणार नाही, आणि तुमची अपेक्षा नाही तसा मी तुम्हांला दिसून येईन; कदाचित भांडणतंटे, ईर्ष्या, राग, तट, चहाड्या, कानगोष्टी, रुसणेफुगणे, अव्यवस्था ही मला आढळून येतील.
21मला भीती वाटते की, मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुमच्यापुढे खाली पाहायला लावील; आणि ज्यांनी पूर्वी पाप करून आपण आचरलेल्या अशुद्धपणाचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा पश्‍चात्ताप केला नाही, अशा पुष्कळ लोकांविषयी मला शोक करावा लागेल.

सध्या निवडलेले:

२ करिंथ 12: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन