YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 1

1
नमस्कार व धन्यवाद
1करिंथ येथील देवाच्या मंडळीस व तिच्यासह संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून :
2देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.
3आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो.
4तो आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हांला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.
5कारण आमच्या बाबतीत ख्रिस्ताची दु:खे जशी पुष्कळ होतात तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते.
6आमच्यावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते; आणि आम्हांला सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते; म्हणजे असे की, जी दु:खे आम्ही सोसतो, ती सहन करण्यास तुम्हांला सामर्थ्य मिळते.
7तुमच्याविषयीची आमची आशा दृढ आहे; कारण आम्हांला ठाऊक आहे की, जसे तुम्ही दु:खाचे सहभागी आहात तसे सांत्वनाचेही सहभागी आहात.
8बंधुजनहो, आशियात आमच्यावर आलेल्या संकटांविषयी तुम्हांला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो; इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हांला झाले.
9फार तर काय, आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हांला सांगत होते; आम्ही स्वत:वर नव्हे तर मृतांना सजीव करणार्‍या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे झाले.
10त्याने आम्हांला एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हांला ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे.
11तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हांला साहाय्य करावे; असे की जे कृपादान पुष्कळ जणांच्या योगे आम्हांला मिळाले त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ जणांनी उपकारस्तुती करावी.
पौलाचे शुद्ध हेतू
12आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषेकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्त्विकपणाने वागलो.
13कारण जे तुम्ही वाचता किंवा कबूल करता त्यांवाचून दुसरे काही आम्ही तुम्हांला लिहीत नाही; आणि तुम्ही शेवटपर्यंत ते कबूल कराल अशी माझी आशा आहे;
14त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हांला मान्यता दिली की, जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहात तसे आम्ही तुमच्या अभिमानाचा आहोत.
त्याची भेट पुढे ढकलण्यात आली
15असा भरवसा बाळगून तुम्हांला दोनदा कृपादान मिळावे म्हणून पहिल्याने तुमच्याकडे यावे,
16तुमच्याकडून मासेदोनियास जावे, नंतर पुन्हा मासेदोनियाहून तुमच्याकडे यावे, आणि तुम्ही मला यहूदीयाकडे वाटेस लावावे, असा माझा बेत होता.
17तर असा बेत असता मी चंचलपणा केला काय? अथवा मला होय होय, नाही नाही, अशी धरसोड करता यावी म्हणून जे मी योजतो ते देहस्वभावाप्रमाणे योजतो काय?
18देव विश्वसनीय आहे. आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे, होय, नाही असे नाही.1
19कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची घोषणा आमच्याकडून म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून तुमच्यामध्ये झाली ती होय, नाही, अशी नव्हती, तर त्याच्या ठायी होय अशीच होती.
20देवाची वचने कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे;2 म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारे आमेन म्हणतो.
21जो आम्हांला अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्ताच्या ठायी सुस्थिर करत आहे तो देव आहे;
22त्याने आम्हांला मुद्रांकित केले व आमच्या अंत:करणात आपला आत्मा हा विसार दिला.
23देवाला साक्षी ठेवून मी आपल्या जिवाची शपथ घेऊन सांगतो की, मी करिंथास येणे रहित केले, ह्यात तुमची गय केली.
24आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजवतो असे नाही, तर तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहोत; तुमची स्थिती आहे ती विश्वासाने आहे.

सध्या निवडलेले:

२ करिंथ 1: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन