योशीया राज्य करू लागला तेव्हा तो आठ वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत एकतीस वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले; ज्या मार्गांनी त्याचा पूर्वज दावीद चालला त्यांनीच तोही चालला; उजवीडावीकडे वळला नाही. आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी तो अल्पवयी असतानाच आपला पूर्वज दावीद ह्याच्या देवाच्या भजनी लागला; बाराव्या वर्षी तो उच्च स्थाने, अशेरा मूर्ती आणि कोरीव व ओतीव मूर्ती यहूदा व यरुशलेम ह्यांतून काढून टाकू लागला. लोकांनी त्याच्यासमक्ष बआल मूर्तींच्या वेद्या मोडून टाकल्या; त्यांच्या वरच्या भागी असलेल्या सूर्यमूर्ती त्याने फोडूनतोडून टाकल्या; अशेरामूर्ती आणि कोरीव व ओतीव मूर्ती त्याने फोडून त्यांचे चूर्ण केले व ते चूर्ण जे त्यांना यज्ञ करीत असत त्यांच्या कबरांवर पसरले. पुजार्यांच्या अस्थी त्याने त्यांच्याच वेद्यांवर जाळून टाकल्या; ह्याप्रमाणे त्याने यहूदा व यरुशलेम ही शुद्ध केली. त्याने मनश्शे, एफ्राईम, शिमोन व नफताली येथपर्यंतच्या शहरांत व त्यांच्या सभोवतालच्या ओस पडलेल्या जागी तसेच केले. त्याने वेद्या मोडून टाकल्या, अशेरामूर्ती व कोरीव मूर्ती कुटून त्यांचे चूर्ण केले आणि इस्राएल देशातल्या सर्व सूर्यमूर्ती त्याने तोडूनफोडून टाकल्या आणि मग तो यरुशलेमेस परत आला. आपल्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी योशीयाने देशाची व मंदिराची शुद्धी केल्यावर आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिराची दुरुस्ती करण्यास शाफान बिन असल्या, नगराचा कारभारी मासेया आणि योवाह बिन योवाहाज अखबारनवीस ह्यांना पाठवले. ते मुख्य याजक हिल्कीया ह्याच्याकडे गेले आणि द्वारपाळ लेवी ह्यांनी मनश्शे, एफ्राईम, इस्राएलाचे अवशिष्ट लोक, सर्व यहूदा व बन्यामीन आणि यरुशलेमनिवासी ह्या सर्वांकडून जो पैसा लेव्यांनी जमा करून देवाच्या मंदिरात आणला होता तो त्यांनी त्याच्या स्वाधीन केला. त्यांनी तो परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणार्या कामगारांच्या हाती दिला, आणि त्या मंदिराची जी मोडतोड झाली होती ती दुरुस्त करण्याकडे तो त्या कामगारांनी लावला. तासलेले चिरे, कैच्यांसाठी लाकूड आणि यहूदाच्या राजांनी मोडून टाकलेल्या घरांसाठी कडीपाट विकत घेण्यास त्यांनी तो पैसा सुतार व बांधकाम करणारे ह्यांना दिला. त्या माणसांनी ते काम सचोटीने केले; त्यांच्यावर देखरेख करण्यास नेमलेले मरारी वंशातील लेव्यांपैकी यहथ व ओबद्या, आणि कहाथी वंशातील जखर्या व मशुल्लाम हे होते; गायनवादनाचे मर्म जाणणारे लेवी हेही होते. बोजे वाहणार्यांवरही ते देखरेख करीत आणि हरप्रकारचे काम करणार्यांकडून ते काम करवून घेत; लेव्यांपैकी काही लेखक, कारभारी व द्वारपाळ होते. परमेश्वराच्या मंदिरात आणलेला पैसा बाहेर आणत असता मोशेच्या द्वारे दिलेला परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ हिल्कीया याजकाला सापडला. हिल्कीयाने शाफान चिटणीस ह्याला सांगितले की, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” मग हिल्कीयाने तो ग्रंथ शाफानास दिला. शाफान तो ग्रंथ घेऊन राजाकडे गेला आणि त्याला त्याने अशी खबर दिली की, “तुझ्या दासांना जे काही काम सोपवले होते ते ते करीत आहेत; आणि परमेश्वराच्या मंदिरात जो पैसा मिळाला तो थैल्यांत भरून देखरेख करणारे व कामगार ह्यांच्या हवाली केला आहे.” शाफान चिटणीसाने राजाला आणखी असे सांगितले की, “हिल्कीया याजकाने मला एक ग्रंथ दिला आहे.” शाफानाने तो राजाला वाचून दाखवला.
२ इतिहास 34 वाचा
ऐका २ इतिहास 34
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 34:1-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ