२ इतिहास 31
31
1हे सर्व आटोपल्यावर तेथे हजर असलेल्या सर्व इस्राएलांनी यहूदाच्या नगरानगरांतून जाऊन यहूदा, बन्यामीन, एफ्राईम व मनश्शे ह्या प्रांतात असलेले मूर्तिस्तंभ मोडून टाकले, अशेरा मूर्ती फोडून टाकल्या आणि उच्च स्थाने व वेद्या मोडून फोडून टाकल्या; त्यांचा सर्वस्वी विध्वंस केला. मग सर्व इस्राएल लोक आपापल्या गावी आपापल्या वतनात गेले. याजक आणि लेवी ह्यांच्यासाठी हिज्कीया तरतूद करतो 2परमेश्वराच्या छावणीच्या द्वारात होमबली व शांत्यर्पणे करणे, सेवाचाकरी करणे, उपकारस्तुती व स्तवन करणे ह्या सर्वांसाठी हिज्कीयाने याजकांचे व लेव्यांचे त्यांच्या-त्यांच्या सेवेप्रमाणे क्रमवार वर्ग नेमले.
3मग त्याने आपल्या संपत्तीतून होमार्पणासाठी राजभाग ठरवला; परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे नित्य सकाळची व संध्याकाळची होमार्पणे, शब्बाथ, चंद्रदर्शने व नियतपर्वे ह्यांच्या होमबलींसाठी त्याने राजभाग ठरवला.
4परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार याजक व लेवी ह्यांना मनापासून आपली कामे करता यावीत म्हणून त्यांचा भाग त्यांना द्यावा अशी आज्ञा त्याने यरुशलेमेत राहणार्या लोकांना केली.
5ही आज्ञा कानी पडताच इस्राएल लोक धान्य, द्राक्षारस, तेल, मध आदिकरून भूमीचा प्रथमउपज आणि सगळ्या उत्पन्नाचा दशमांश सढळ हाताने देऊ लागले.
6जे इस्राएल व यहूदी यहूदाच्या नगरांत राहत असत त्यांनी बैल व शेरडेमेंढरे ह्यांचा दशमांश आणि त्यांचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ समर्पित केलेल्या पवित्र वस्तूंचा दशमांश आणून त्यांच्या राशी केल्या.
7राशी घालण्याचे त्यांनी तिसर्या महिन्यात आरंभून सातव्या महिन्यात संपवले.
8हिज्कीया व सरदार ह्यांनी येऊन त्या राशी पाहिल्या तेव्हा ते परमेश्वराचा व त्याचे लोक इस्राएल ह्यांचा धन्यवाद करू लागले.
9हिज्कीयाने याजक व लेवी ह्यांना त्या राशींविषयी विचारले.
10तेव्हा सादोक घराण्यातला अजर्या मुख्य याजक त्याला म्हणाला, “लोक परमेश्वराच्या मंदिरात अर्पणे आणू लागले तेव्हापासून आम्हांला पोटभर खायला मिळून पुष्कळ शिल्लकही राहते; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे कल्याण केले आहे; जे शिल्लक राहिले आहे त्याची ही मोठी रास आहे.”
11मग हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिरात खोल्या बांधण्याची आज्ञा केली व त्याप्रमाणे त्या बांधल्या.
12लोक अर्पणे, दशमांश व वाहिलेल्या वस्तू प्रामाणिकपणे आणून पोचवू लागले; त्यांचा मुख्य अधिकारी कोनन्या नावाचा एक लेवी असून त्याचा दुय्यम त्याचा भाऊ शिमी हा होता.
13कोनन्या व त्याचा भाऊ शिमी ह्यांच्या हाताखाली यहीएल, अजज्या, नहथ, असाएल, यरीमोथ, योजाबाद, अलीएल, इस्मख्या, महथ व बनाया हे हिज्कीया राजा व देवाच्या मंदिराचा अधिकारी अजर्या ह्यांच्या आज्ञेने कारभारी नेमले होते.
14परमेश्वराला केलेली अर्पणे व परमपवित्र वस्तू ह्यांची वाटणी करता यावी म्हणून इम्ना लेवी ह्याचा पुत्र कोरे जो पूर्ववेशीचा द्वारपाल होता त्याला स्वेच्छार्पणांची देखरेख करण्यासाठी नेमले होते.
15त्याच्या हाताखाली एदेन, मिन्यामीन, येशूवा, शमाया, अमर्या व शखन्या हे होते; ते याजकांच्या नगरात राहत असत; त्यांच्या सर्व भाऊबंदांना, मग ते लहान असोत की मोठे असोत, त्यांच्या-त्यांच्या क्रमानुसार प्रामाणिकपणे वाटणी करून देण्यासाठी त्यांना नेमले होते.
16तसेच पुरुषांच्या वंशावळीत नोंदलेले जे पुरुष तीन वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे असून प्रत्येक दिवसाच्या कामासाठी परमेश्वराच्या मंदिरात जात असत, त्यांच्या-त्यांच्या क्रमानुसार जी त्यांची सेवा असे तिच्याप्रमाणे त्यांना वाटणी देत असत.
17त्याप्रमाणे ज्या याजकांची त्यांच्या पितृकुळांप्रमाणे वंशावळीत नोंद झाली होती त्यांना आणि जे लेवी वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे असून आपापल्या क्रमानुसार काम करीत असत त्यांनाही वाटणी देत असत.
18शिवाय वंशावळीत नोंदलेल्या मुलाबाळांना, स्त्रियांना, पुत्रांना व कन्यांना अशा सर्व समुदायाला वाटणी देत असत, कारण ते आपणांस प्रामाणिकपणाने पवित्र करत असत.
19त्याप्रमाणे जे अहरोन वंशातले याजक त्यांच्या प्रत्येक नगरात व शिवारात राहत असत त्या सर्व याजक पुरुषांना आणि लेव्यांपैकी ज्यांची वंशावळीत नोंद झाली होती त्यांनाही वाटणी देण्यासाठी माणसे नेमली होती.
20हिज्कीयाने ह्या प्रकारे सर्व यहूदात हाच नियम लावून दिला; त्याचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे काही बरे, योग्य व खरे ते तो करी.
21आणि आपल्या देवाला शोधायला देवाच्या मंदिरातील सेवा, नियमशास्त्र व आज्ञा ह्यांच्यासंबंधाने जे काम त्याने आपल्या देवाच्या भजनी लागून आरंभले ते त्याने पूर्ण मनोभावे केले व त्यात त्याला यश आले.
सध्या निवडलेले:
२ इतिहास 31: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.