YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 2

2
हूराम राजाबरोबर दाविदाचा करार
(१ राजे 5:1-18; 7:13-14)
1शलमोनाने परमेश्वराच्या नामाप्रीत्यर्थ एक मंदिर आणि एक राजमंदिरही बांधायचे योजले.
2शलमोनाने सत्तर हजार ओझेकरी, डोंगरातून धोंडे काढणारे ऐंशी हजार व त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी तीन हजार सहाशे लोक मोजून काढले.
3शलमोनाने सोरेचा राजा हूराम1 ह्याला सांगून पाठवले की, “माझा बाप दावीद ह्याच्याशी आपण जसा व्यवहार केला व त्याचे निवासमंदिर बांधण्यासाठी गंधसरू पाठवले तसाच व्यवहार माझ्याशी करा.
4पाहा, मी आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ एक मंदिर बांधत आहे. ते परमेश्वराला समर्पण करून त्याच्यासमोर सुगंधी द्रव्यांनी युक्त असा धूप जाळावा, नित्य समर्पित भाकर तेथे ठेवावी आणि रोज सकाळी व संध्याकाळी, शब्बाथदिनी व चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वर ह्याने नेमलेल्या पर्वकाळी होमबली अर्पावेत म्हणून ते मी बांधत आहे. इस्राएलाचा हा निरंतरचा विधी होय.
5जे मंदिर मी बांधत आहे ते मोठे होणार, कारण आमचा देव सर्व दैवतांहून मोठा आहे.
6आकाश व नभोमंडल ह्यांत तो सामावत नाही तर त्याच्याप्रीत्यर्थ मंदिर बांधण्याची कोणास ताकद आहे? त्याच्या निवासासाठी मंदिर बांधणारा मी तरी कोण? केवळ त्याच्यापुढे धूप जाळावा म्हणून मी हे मंदिर बांधत आहे.
7तर माझा पिता दावीद ह्याने तरतूद करून ठेवल्याप्रमाणे यहूदात व यरुशलेमेत जे कारागीर आहेत त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी सोने, रुपे, पितळ व लोखंड ह्यांच्या कामात आणि जांभळे, किरमिजी व निळ्या रंगाचे कापड तयार करण्याच्या कामात निपुण आणि खोदीव काम जाणणारा असा एक कारागीर माझ्याकडे पाठवून द्या.
8तशीच माझ्याकडे लबानोनाहून गंधसरू, देवदारू व रक्तचंदन ह्यांची लाकडे पाठवून द्या; मला ठाऊक आहे की, आपल्या सेवकांना लबानोन येथील झाडे कापण्याचे काम माहीत आहे; आपल्या सेवकांबरोबर माझेही सेवक राहून 9माझ्यासाठी विपुल लाकूड तयार करतील; कारण जे मंदिर मी बांधणार आहे ते भव्य होणार आहे.
10आपले जे सेवक लाकडे कापतील त्यांना मी वीस हजार कोर2 झोडलेले गहू, वीस हजार कोर जव, वीस हजार बथ2 द्राक्षारस व वीस हजार बथ तेल देईन.”
11तेव्हा सोराचा राजा हूराम ह्याने शलमोनाला असे पत्रोत्तर लिहिले की, “परमेश्वराचे आपल्या प्रजेवर प्रेम आहे म्हणून त्याने आपणाला तिच्यावर राजा नेमले आहे.”
12हूरामाने आणखी असे लिहिले की, “आकाश व पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता, इस्राएलाचा देव परमेश्वर धन्य; परमेश्वराप्रीत्यर्थ मंदिर बांधण्याच्या आणि राजमंदिर बांधण्याच्या कार्यासाठी त्याने दावीद राजाला बुद्धिसंपन्न आणि चातुर्य व अक्कल ह्यांनी मंडित असा पुत्र दिला आहे.
13तर मी आपला बाप हूराम ह्याचा एक बुद्धिमान कारागीर पाठवत आहे.
14तो दान वंशातील एका स्त्रीचा पुत्र असून त्याचा बाप सोर येथला होता; तो सोने, चांदी, पितळ, लोखंड, पाषाण व लाकूड ह्यांचे काम करण्यात, जांभळे, निळे, तलम सणाचे किरमिजी कापड तयार करण्यात, कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्यात व सर्व प्रकारचे नमुने तयार करण्यात निपुण आहे. आपल्या कारागिरांबरोबर व माझा स्वामी आपला बाप दावीद ह्याच्या कारागिरांबरोबर त्याला कामावर नेमा.
15आता माझ्या स्वामींनी गहू, जव, तेल व द्राक्षारस पाठवतो असे म्हटले आहे तर ते त्यांनी आपल्या नोकरांकडे पाठवून द्यावे.
16जितक्या लाकडांचे आपल्याला प्रयोजन आहे तेवढे लबानोनाहून कापून त्याचे तराफे करून आमचे लोक जलमार्गाने यापो येथे पोचते करतील; तेथून ते आपण यरुशलेमेला घेऊन जावे.”
17शलमोनाचा बाप दावीद ह्याने इस्राएल देशात राहणार्‍या सर्व उपर्‍या लोकांची गणती केली होती, त्याप्रमाणे शलमोनाने त्यांची गणती केली; तेव्हा ते एक लक्ष त्रेपन्न हजार सहाशे भरले.
18त्यांतून त्याने सत्तर हजार ओझेकरी, ऐंशी हजार पहाडातले धोंडे काढणारे व तीन हजार सहाशे त्यांच्यावर देखरेख करणारे नेमले.

सध्या निवडलेले:

२ इतिहास 2: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन