YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 13

13
अबीयाची कारकीर्द
(१ राजे 15:1-8)
1यराबामाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीया यहूदावर राज्य करू लागला.
2त्याने यरुशलेमेत तीन वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव मीखाया; ही गिबा येथील उरीएल ह्याची कन्या. अबीया व यराबाम ह्यांची लढाई झाली.
3अबीया मोठमोठ्या लढवय्यांचे चार लक्ष सैन्य घेऊन लढाईस उभा राहिला; इकडे यराबाम मोठे शूर वीर असे निवडक आठ लक्ष पुरुष घेऊन त्याच्याशी सामना करायला व्यूह रचून सिद्ध झाला.
4अबीया एफ्राइमाच्या डोंगरवटीतल्या समाराईम पहाडावर उभा राहून बोलला, “हे यराबामा, अहो सर्व इस्राएलांनो, माझे ऐका;
5इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने दाविदाला व त्याच्या वंशजांना इस्राएलाचे राज्य मिठाचा करार करून सर्वकाळचे दिले आहे, हे तुम्हांला कळू नये काय?
6दावीदपुत्र शलमोन ह्याचा सेवक नबाटपुत्र यराबाम ह्याने आपल्या स्वामींवर उठून बंड केले आहे.
7त्याच्याजवळ हलके व अधम लोक जमले आहेत आणि शलमोनाचा पुत्र रहबाम तरुण व अल्लड असून त्याच्याशी सामना करण्यास समर्थ नाही म्हणून त्यांनी त्याच्याशी लढण्यास कंबर कसली आहे.
8आता दाविदवंशजांच्या हाती असलेले परमेश्वराचे जे राज्य त्याच्याशी तुम्ही विरोध करण्याचा विचार मांडला आहे; तुम्ही एकत्र होऊन तुमचा एक मोठा समुदाय झाला आहे आणि यराबामाने जी सोन्याची वासरे तुमचे देव व्हावेत म्हणून बनवली ती तुमच्याजवळ आहेत.
9तुम्ही परमेश्वराचे याजक जे अहरोनाचे वंशज आणि लेवी त्यांना घालवून देऊन इतर राष्ट्रांच्या लोकांप्रमाणे आपले याजक केले आहेत, हे खरे ना? एखाद्याने गोर्‍हा व सात एडके आणून स्वतःस संस्कार केला की जे देव नव्हेत त्यांचा तो याजक बनतो.
10आमच्या लोकांचा देव परमेश्वर आहे. आम्ही त्याला सोडले नाही; आणि परमेश्वराची सेवाचाकरी करणारे जे याजक आमच्याजवळ आहेत ते अहरोनाचे वंशज आहेत आणि लेवीही आपापली कामे करीत आहेत.
11ते नित्य सकाळी व संध्याकाळी परमेश्वराप्रीत्यर्थ होमबली व सुगंधी धूप जाळतात; ते शुद्ध मानलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात; सोन्याचा दीपवृक्ष व त्यावरचे दिवे दररोज संध्याकाळी ते उजळतात; आम्ही आपला देव परमेश्वर ह्याची आज्ञा पाळत असतो, पण तुम्ही त्याला सोडले आहे.
12पाहा, आमच्याबरोबर, आमच्यापुढे देव आहे; तुमच्याविरुद्ध लोकांना इशारा देण्यासाठी त्याचे याजक कर्णे हाती घेऊन असतात. इस्राएल लोकहो, तुम्ही आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्याशी लढू नका; तुम्हांला यश यायचे नाही.”
13तरीपण यराबामाने दबा धरणार्‍यांना वळसा घालायला सांगून शत्रूच्या पिछाडीस पाठवले; ह्या प्रकारे यहूदाच्या आघाडीस ते होते व पिछाडीस दबा धरणारे होते.
14यहूदी लोकांनी मागे वळून पाहिले तर आपल्यापुढे व मागे युद्ध होणार असे त्यांना दिसून आले, तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि याजक कर्णे वाजवू लागले.
15यहूदी लोकांनी जयघोष केला; ते जयजयकार करीत असता देवाने अबीया व यहूदा ह्यांच्यासमोर यराबाम व सर्व इस्राएल ह्यांचा मोड केला.
16इस्राएल लोक यहूदासमोरून पळाले आणि देवाने त्यांना त्यांच्या हाती दिले.
17अबीया व त्याचे लोक ह्यांनी त्यांची मोठी कत्तल उडवली; त्या दिवशी इस्राएलातल्या पाच लक्ष निवडक पुरुषांचा संहार झाला.
18ह्या प्रकारे इस्राएल लोक त्या प्रसंगी चीत झाले, आणि यहूदी लोक प्रबल झाले, कारण त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवली होती.
19अबीयाने यराबामाचा पाठलाग करून बेथेल, यशाना व एफ्रोन ही नगरे त्यांच्या आसपासच्या गावांसहित काबीज केली.
20अबीयाच्या कारकिर्दीत यराबाम पुन्हा काही सावरला नाही; परमेश्वराने त्याला ताडन केल्यामुळे तो मृत्यू पावला.
21अबीया प्रबळ झाला; त्याने चौदा बायका केल्या आणि त्याला बावीस पुत्र व सोळा कन्या झाल्या.
22अबीयाची वरकड कृत्ये, त्याची चालचलणूक व त्याची वचने ही संदेष्टा इद्दो ह्याच्या बखरीच्या पुस्तकात लिहिलेली आहेत.

सध्या निवडलेले:

२ इतिहास 13: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन