२ इतिहास 1
1
विवेकबुद्धीसाठी शलमोनाची प्रार्थना
(१ राजे 3:3-15)
1दाविदाचा पुत्र शलमोन हा आपल्या गादीवर कायम झाला; त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर होता; त्याने त्याला अति थोर पदास चढवले.
2शलमोनाने सर्व इस्राएलाला म्हणजे सहस्रपती, शतपती, न्यायाधीश आणि सर्व इस्राएलाच्या पितृकुळांचे सर्व नायक ह्यांना सांगितल्यावरून
3शलमोनासह सर्व मंडळी गिबोन येथील उच्च स्थानी गेली; परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने रानात बनवलेला देवाचा दर्शनमंडप तेथेच होता.
4दाविदाने देवाच्या कोशासाठी जे स्थळ तयार केले होते तेथे किर्याथ-यारीमाहून तो आणला होता; त्याने यरुशलेमेत त्यासाठी डेरा उभारला होता.
5बसालेल बिन ऊरी बिन हूर ह्याने केलेली पितळेची वेदी परमेश्वराच्या निवासमंडपापुढे असे; शलमोन मंडळीसह तिकडे गेला.
6दर्शनमंडपाजवळ परमेश्वरासमोर जी पितळेची वेदी होती तिच्याजवळ शलमोनाने जाऊन तिच्यावर एक हजार होमबली अर्पण केले.
7त्या रात्री देवाने शलमोनाला दर्शन देऊन म्हटले की, “तुला काय वर हवा तो माग.”
8शलमोन देवाला म्हणाला, “माझा पिता दावीद ह्याच्यावर तुझी फार कृपा असे व तू मला त्याच्या जागी राजा केले आहेस.
9आता हे परमेश्वरा देवा, तू माझा बाप दावीद ह्याला दिलेले वचन पूर्ण कर; मातीच्या रजःकणांप्रमाणे संख्येने विपुल अशा प्रजेवर तू मला राजा केले आहेस.
10ह्या प्रजेसमोर वागण्यास मला आता चातुर्य व ज्ञान दे; तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचे शासन कोणाला करता येईल?”
11देव शलमोनाला म्हणाला, “ज्या अर्थी असा तुझा मानस आहे म्हणजे तू धनसंपत्ती व ऐश्वर्य हे मागितले नाहीस, आपल्या वैर्यांचे प्राणहरण करण्याचे अथवा दीर्घायुषी होण्याचे मागितले नाहीस, तर ज्या लोकांवर मी तुला राजा नेमले आहे त्या माझ्या लोकांचे शासन करण्यासाठी चातुर्य व ज्ञान एवढेच तू स्वत:साठी मागितलेस,
12त्या अर्थी चातुर्य व ज्ञान हे तर तुला देतोच; ह्यांखेरीज आणखी तुझ्यापूर्वी कोणाही राजाला प्राप्त झाली नव्हती व तुझ्यानंतर कोणालाही कधी प्राप्त व्हायची नाही एवढी धनसंपत्ती व ऐश्वर्य मी तुला देईन.”
13मग शलमोन गिबोन येथल्या उच्च स्थानाच्या दर्शनमंडपासमोरून यरुशलेमेस आला व तेथे इस्राएलावर राज्य करू लागला.
घोडे व रथ ह्यांचा शलमोनाने केलेला व्यापार
(१ राजे 10:26-29; २ इति. 9:25-28)
14शलमोनाने रथ व राऊत ह्यांचा संग्रह केला; त्याच्या-जवळ चौदाशे रथ व बारा हजार राऊत झाले; त्यांतले काही रथ ठेवायच्या नगरात व काही यरुशलेमेत आपल्याजवळ त्याने ठेवले.
15राजाने यरुशलेमेत चांदी व सोने धोंड्यांप्रमाणे आणि गंधसरू तळवटीतल्या उंबराच्या झाडांप्रमाणे विपुल केले.
16शलमोनाचे घोडे मिसर देशातून येत; राजाचे व्यापारी घोड्यांच्या एकेका तांड्यांची किंमत ठरवून तांडेच्या तांडे घेत.
17एकेका रथास सहाशे शेकेल चांदी व एकेका घोड्यास दीडशे शेकेल चांदी देऊन ते मिसर देशाहून आणीत; तसेच ते व्यापारी हित्ती व अरामी राजांसाठीही आणीत.
सध्या निवडलेले:
२ इतिहास 1: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.