YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 7

7
1ह्यावरून किर्याथ-यारीमकर आले व त्यांनी परमेश्वराचा कोश नेऊन टेकडीवर अबीनादाबाच्या घरी ठेवला; आणि परमेश्वराच्या कोशाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी त्याचा पुत्र एलाजार ह्याला पवित्र केले. शमुवेल इस्राएल लोकांचा न्यायनिवाडा करतो 2किर्याथ-यारीम येथे कोश राहिला त्याला बहुत काळ लोटला, म्हणजे वीस वर्षे निघून गेली; त्यानंतर सर्व इस्राएल लोक परमेश्वराच्या दर्शनाविषयी आतुर झाले.
3तेव्हा शमुवेलाने अवघ्या इस्राएल घराण्याला सांगितले, “तुम्ही मनःपूर्वक परमेश्वराकडे वळला आहात तर तुमच्यातील अन्य देव व अष्टारोथ ह्यांना दूर करा, आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा, म्हणजे तो तुम्हांला पलिष्ट्यांच्या हातांतून सोडवील.”
4मग इस्राएल लोक बआलदेव व अष्टारोथ ह्यांना दूर करून केवळ परमेश्वराची उपासना करू लागले.
5शमुवेल म्हणाला, “सर्व इस्राएल लोकांना मिस्पात जमा करा म्हणजे मी तुमच्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करीन.”
6तेव्हा ते मिस्पात जमा झाले आणि त्यांनी पाणी काढून आणून परमेश्वरासमोर ओतले व त्या दिवशी उपास करून ते म्हणाले, “आम्ही परमेश्वराचा अपराध केला आहे.” तेव्हा शमुवेल मिस्पात इस्राएलाचा न्यायनिवाडा करत असे.
7इस्राएल लोक मिस्पात जमा झाले आहेत हे पलिष्ट्यांनी ऐकले तेव्हा त्यांचे सरदार इस्राएल लोकांवर चढाई करून आले. हे ऐकून इस्राएल लोकांना पलिष्ट्यांची भीती वाटली.
8इस्राएल लोक शमुवेलाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हांला पलिष्ट्यांच्या हातांतून सोडवावे म्हणून त्याची काकळूत करण्याचे थांबवू नका.
9मग शमुवेलाने एक दूधपिते कोकरू घेऊन व त्याचा परमेश्वराला नि:शेष होम करून इस्राएलासाठी परमेश्वराची आराधना केली व ती परमेश्वराने ऐकली.
10शमुवेल होमार्पण करत असताना पलिष्टी इस्राएलाशी लढायला जवळ येऊन ठेपले; त्या दिवशी परमेश्वराने प्रचंड गर्जना करून पलिष्ट्यांना घाबरे केले, आणि इस्राएलापुढे त्यांचा मोड झाला.
11इस्राएल लोकांनी मिस्पातून बाहेर पडून पलिष्ट्यांचा पाठलाग केला, आणि ते बेथ-कारापाशी पोचत तोपर्यंत त्यांना ते मार देत गेले.
12मग शमुवेलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेन ह्यांच्या दरम्यान उभी केली व तिला एबन-एजर हे नाव देऊन म्हटले की, “येथवर परमेश्वराने आमचे साहाय्य केले आहे.”
13ह्या प्रकारे पलिष्टी पराजित झाल्यावर ते पुन्हा इस्राएलाच्या मुलखात आले नाहीत; आणि शमुवेलाच्या सगळ्या हयातीत परमेश्वराचा हात पलिष्ट्यांवर होता.
14एक्रोनापासून गथपर्यंत जी नगरे पलिष्ट्यांनी इस्राएलापासून घेतली होती ती पुन्हा त्यांच्या ताब्यात आली, आणि त्यांच्या आसपासचा प्रदेशही इस्राएलाने पलिष्ट्यांच्या ताब्यातून सोडवला. त्या काळात इस्राएल व अमोरी लोक ह्यांच्यात स्वस्थता होती.
15शमुवेलाने आपल्या आयुष्यभर इस्राएलाचा न्यायनिवाडा केला.
16तो वर्षानुवर्ष बेथेल, गिलगाल व मिस्पा ह्या सर्व ठिकाणी फेरी करून इस्राएलाचा न्यायनिवाडा करत असे.
17तो रामा येथे परत येत असे; कारण तेथे त्याचे घर होते. तेथे तो इस्राएलाचा न्यायनिवाडा करी; तेथे त्याने देवाप्रीत्यर्थ एक वेदी बांधली.

सध्या निवडलेले:

१ शमुवेल 7: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन