YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 28:20-25

१ शमुवेल 28:20-25 MARVBSI

मग शौल भूमीवर सपशेल पालथा पडला; शमुवेलाच्या भाषणाने तो अत्यंत भयभीत झाला; त्याच्यात काही त्राण उरले नाही. त्याने दिवसभर व रात्रभर बिलकुल अन्न सेवन केले नव्हते म्हणून त्याच्या अंगात मुळीच ताकद उरली नव्हती. मग ती स्त्री शौलाकडे आली व तो फार व्याकूळ झाला आहे असे पाहून त्याला म्हणाली, “पाहा, आपल्या दासीने आपले म्हणणे ऐकले, आणि आपला प्राण मुठीत धरून आपण मला सांगितलेले शब्द मी ऐकले. तर आता आपणही आपल्या दासीचे म्हणणे ऐका; मी आपणाला घासभर अन्न वाढते ते खा म्हणजे वाटेने चालायला आपणाला शक्ती येईल.” तो म्हणाला, “मला नको, मी खाणार नाही.” त्या स्त्रीप्रमाणे त्याच्या चाकरांनीही त्याला आग्रह केला तेव्हा त्याने त्यांचे म्हणणे ऐकले. तो जमिनीवरून उठून पलंगावर बसला. त्या स्त्रीच्या घरी एक लठ्ठ वासरू होते, ते तिने त्वरेने कापले, आणि थोडे पीठ घेऊन ते तिने मळले आणि बेखमीर भाकरी भाजल्या; मग तिने ते अन्न शौलापुढे व त्याच्या चाकरांपुढे ठेवले, आणि ते जेवले. नंतर ते त्या रात्री निघून गेले.