YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 1:21-28

१ शमुवेल 1:21-28 MARVBSI

मग एलकाना परमेश्वराला आपले वार्षिक होमबली अर्पण करायला व नवस फेडायला आपल्या सगळ्या परिवारासह गेला. हन्ना तेवढी गेली नाही; ती आपल्या पतीला म्हणाली, “बालकाचे दूध तुटेपर्यंत मी थांबते. मग मी त्याला घेऊन जाईन म्हणजे तो परमेश्वरासमोर हजर होऊन तेथे निरंतर राहील.” तिचा नवरा एलकाना तिला म्हणाला, “तुला बरे वाटेल तसे कर; तू त्याचे दूध तोडीपर्यंत येथेच राहा; परमेश्वर आपले वचन पुरे करो म्हणजे झाले.” तेव्हा ती स्त्री घरी राहिली, आणि त्याचे दूध तुटेपर्यंत तिने त्याला स्तनपान दिले. त्याचे दूध तोडल्यावर ती त्याला घेऊन गेली; तिने तीन गोर्‍हे, एक एफाभर सपीठ, एक बुधलाभर द्राक्षारस बरोबर घेतला आणि ती शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात मुलाला घेऊन गेली; तो त्या वेळी केवळ बालक होता. त्यांनी गोर्‍हा बळी दिला आणि त्या बालकास एलीकडे नेले. तेव्हा हन्ना म्हणाली, “माझे स्वामी! आपल्या जीविताची शपथ, माझे स्वामी, जी स्त्री आपल्याजवळ येथे उभी राहून परमेश्वराची प्रार्थना करत होती तीच स्त्री मी आहे. ह्याच बालकासाठी मी प्रार्थना करत होते. परमेश्वराकडे जे मागणे मी केले ते त्याने मला दिले आहे. तसेच मीही ह्या बालकाला परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे, तो परमेश्वराला आमरण दिला आहे.” तेव्हा एलकानाने तेथे परमेश्वराची आराधना केली.