शलमोनाने ते मंदिर बांधून पुरे केले. त्याने त्या मंदिराच्या भिंतींना आतल्या बाजूने गंधसरूंच्या तक्त्यांची मढवणी केली; जमिनीपासून कडीपाटापर्यंत आतून आणि मंदिराच्या जमिनीला त्याने देवदारूची तक्तपोशी केली. मंदिराच्या मागल्या भागी जमिनीपासून कडीपाटापर्यंत वीस हात गंधसरूच्या तक्त्यांची मढवणी केली; ह्या प्रकारे त्याने परमपवित्रस्थानासाठी मंदिराला एक गाभारा तयार केला. त्या गाभार्यासमोरील मंदिराची लांबी चाळीस हात होती. आतल्या भागी मंदिराच्या भिंती गंधसरूच्या तक्त्यांनी मढवल्या असून त्यांवर इंद्रावणे (रानकाकड्या) व फुललेली फुले कोरली होती; चोहीकडे गंधसरूच होता, दगड असा मुळीच दृष्टीला पडत नसे. मंदिराच्या आतल्या भागी परमेश्वराच्या कराराचा कोश ठेवण्यासाठी त्याने एक गाभारा तयार केला. त्या गाभार्याची लांबी, रुंदी व उंची प्रत्येकी वीस हात होती. त्याने तो शुद्ध सोन्याने मढवला होता; गंधसरूची केलेली वेदीही त्याने सोन्याने मढवली. शलमोनाने ते मंदिर आतून शुद्ध सोन्याने मढवले. परमपवित्रस्थानास त्याने सोन्याच्या साखळ्या आडव्या लावल्या व ते परमपवित्रस्थानही सोन्याने मढवले. त्याने सर्व मंदिर सोन्याने मढवून मंदिराचे काम समाप्त केले. तसेच त्याने परमपवित्रस्थानाला लागून असलेली वेदी सगळी सोन्याने मढवली. जैतून लाकडाचे दहा-दहा हात उंच असे दोन करूब करून त्याने गाभार्यात ठेवले. करूबाचा एक पंख पाच हात व दुसरा पंख पाच हात होता. एका पंखाच्या टोकापासून दुसर्या पंखाच्या टोकापर्यंत दहा हात अंतर होते. दुसरा करूबही दहा हात उंच होता; दोन्ही करूब एका मापाचे व एका आकाराचे होते. एका करूबाची उंची दहा हात होती, दुसर्या करूबाचीही तेवढीच होती. आतल्या गाभार्यात त्याने ते करूब ठेवले; करूबांचे पंख असे पसरले होते की एका करूबाचा एक पंख एका बाजूच्या भिंतीला व दुसर्या करूबाचा एक पंख दुसर्या बाजूच्या भिंतीला लागलेला होता; त्याचे दुसरे दोन पंख गाभार्याच्या मधोमध एकमेकांना लागलेले होते. त्याने ते करूब सोन्याने मढवले. त्या मंदिराच्या सर्व भिंतींवर सभोवार आतून व बाहेरून करूब, खजुरीची झाडे व फुललेली फुले कोरली होती. त्या मंदिराची आतली व बाहेरली जमीन सोन्याने मढवली होती. गाभार्याच्या दारांना त्याने जैतून लाकडाची कवाडे लावली होती; कपाळपट्टी व दाराच्या बाह्या ह्यांनी भिंतीचा पाचवा भाग व्यापला होता. ती दोन्ही दारे जैतून लाकडाची असून त्याने त्यांवर करूब, खजुरीची झाडे व फुललेली फुले कोरली असून ती सोन्याने मढवली होती; करूबांवर व खजुरीच्या झाडांवरही सोने लावले होते. त्याने मंदिराच्या दारासाठीही जैतून लाकडाची चौकट बनवली होती; तिने भिंतीचा चौथा भाग व्यापला होता. आणि त्याची दोन कवाडे देवदारूची होती; प्रत्येक कवाडाला दोन-दोन दुमटण्या होत्या. त्याने त्यांवरही करूब, खजुरीची झाडे व फुललेली फुले कोरली होती, व हे खोदकाम सोन्याने मढवले होते. त्याने आतले अंगण बांधले होते त्याला चिर्यांच्या तीन रांगा व गंधसरूच्या तुळयांची एक रांग लावली होती. चौथ्या वर्षी जिव महिन्यात परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला; आणि अकराव्या वर्षी बूल महिन्यात म्हणजे आठव्या महिन्यात मंदिर आतल्या एकंदर उपकरणसाहित्यासहित नमुन्याप्रमाणे पुरे झाले. ह्याप्रमाणे ते मंदिर बांधण्यासाठी शलमोनाला सात वर्षे लागली.
१ राजे 6 वाचा
ऐका १ राजे 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ राजे 6:14-38
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ