YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 3

3
फारोच्या मुलीशी शलमोनाचा विवाह
1शलमोनाने मिसर देशाचा राजा फारो ह्याच्याशी सोयरसंबंध केला; त्याने त्याच्या मुलीशी लग्न करून तिला दावीदपुरास आणले आणि आपले मंदिर, परमेश्वराचे मंदिर व यरुशलेमेच्या सभोवतालची तटबंदी बांधून होईपर्यंत त्याने तिला तेथेच ठेवले.
2त्या दिवसापर्यंत परमेश्वराच्या नामासाठी मंदिर बांधले नसल्याकारणाने लोकांना उच्च स्थानी यज्ञयाग करावे लागत.
आपणाला विवेकबुद्धी मिळावी अशी शलमोनाची प्रार्थना
(२ इति. 1:3-12)
3शलमोन राजाचे परमेश्वरावर प्रेम होते; आपला बाप दावीद ह्याने अनुसरलेल्या नियमांप्रमाणे तो चालत असे; पण तो उच्च स्थानी यज्ञयाग करी व धूप जाळीत असे.
4राजा गिबोन येथे यज्ञ करायला गेला; ते सर्वांत मोठे उच्च स्थान होते; तेथल्या वेदीवर शलमोनाने एक सहस्र होमबली अर्पण केले.
5गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शलमोनाला दर्शन दिले; देवाने त्याला म्हटले, “तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन.”
6शलमोन म्हणाला, “तुझा सेवक माझा बाप दावीद ह्याच्यावर तुझी मोठी दया असे; तो तुझ्यासमोर तुझ्याशी सत्याने, नीतीने व सरळ चित्ताने वागला. तुझ्याजवळ त्याच्याप्रीत्यर्थ दयेचा एवढा ठेवा होता की त्याच्या गादीवर बसायला त्याला तू पुत्र दिलास; वस्तुस्थितीही अशीच आहे.
7आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकाला माझा बाप दावीद ह्याच्या जागी राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे; चालचलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही.
8तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे; त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य व अगणित आहेत.
9ह्यास्तव आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी सावधान चित्त दे म्हणजे मला बर्‍यावाइटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे?”
10शलमोनाने हा वर मागितला म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला.
11देव त्याला म्हणाला, “तू असला वर मागितलास; दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश ह्यांपैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेकबुद्धी मागितलीस,
12म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो; मी तुला बुद्धिमान व विवेकी चित्त देतो; तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही.
13एवढेच नव्हे तर तू मागितला नाहीस असा आणखी एक वर तुला देतो; धन आणि वैभव हे तुला देतो; तुझ्या सर्व आयुष्यात सर्व राजांमध्ये तुझ्यासमान कोणी असणार नाही.
14तू आपला बाप दावीद ह्याच्याप्रमाणे माझ्या मार्गांनी चालून माझे नियम व माझ्या आज्ञा पाळशील तर मी तुझ्या आयुष्याची वृद्धी करीन.”
15शलमोन जागा झाला तेव्हा आपल्याला स्वप्न पडले असे त्याला समजले; मग यरुशलेमेला जाऊन त्याने परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभे राहून होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली व आपल्या सर्व सेवकांना मेजवानी दिली.
शलमोनाने केलेला यथार्थ न्याय
16त्या दिवसांत दोन वेश्या राजाकडे येऊन त्याच्यासमोर उभ्या राहिल्या.
17त्यांतली एक स्त्री म्हणाली, “माझे स्वामी, मी व ही स्त्री अशा आम्ही दोघी एकाच घरात राहतो. हिच्याबरोबर राहत असता मी प्रसूत होऊन मला मूल झाले.
18मी प्रसूत झाल्यावर तिसर्‍या दिवशी ही स्त्रीदेखील प्रसूत झाली. आम्ही दोघी एकत्र होतो; आणि आम्हा दोघींशिवाय घरात कोणी परके नव्हते.
19रात्री ह्या स्त्रीचे बालक हिच्या अंगाखाली सापडून मरण पावले;
20तेव्हा हिने अर्ध्या रात्री उठून मी आपली दासी निद्रिस्त असता माझा मुलगा माझ्यापासून घेऊन आपल्या उराशी निजवला आणि आपले मेलेले मूल माझ्या उराशी निजवले.
21सकाळी मी बाळाला दूध पाजण्यासाठी उठून पाहते तर मूल मेलेले आढळले. सकाळ झाल्यावर मी लक्षपूर्वक पाहिले तेव्हा मला झालेला मुलगा हा नव्हे असे मला दिसून आले.”
22दुसरी स्त्री म्हणाली, “छे, नाही; जिवंत मुलगा माझा आहे व मेलेला तुझा आहे.” पहिली म्हणाली, “छे, नाही; मेला तो तुझा मुलगा आणि जिवंत तो माझा मुलगा.” असे त्या राजापुढे त्या बोलल्या.
23राजा म्हणाला, “एक म्हणते, जिवंत मुलगा माझा आहे व मेलेला तुझा आहे; दुसरी म्हणते, छे, नाही; मेलेला तो तुझा मुलगा आणि जिवंत तो माझा मुलगा.”
24मग राजा म्हणाला, “मला तलवार आणून द्या.” तेव्हा राजाला तलवार आणून दिली.
25राजा म्हणाला, “ह्या जिवंत मुलाचे कापून दोन तुकडे करा, अर्धा हिला द्या आणि अर्धा तिला द्या.”
26तेव्हा ज्या बाईचे ते जिवंत मूल होते तिची आतडी आपल्या मुलग्यासाठी तुटून ती राजाला म्हणाली, “माझे स्वामी, जिवंत मुलगा तिला द्या, पण त्याला मारून टाकू नका.” दुसरी स्त्री म्हणाली, “तो न माझा न तुझा, त्याचे दोन भाग करा.”
27मग राजाने म्हटले, “हा जिवंत मुलगा पहिलीला द्या, त्याला मारू नका, कारण तीच त्याची आई.”
28राजाने हा न्याय केला तो सर्व इस्राएल लोकांच्या कानी गेला, तेव्हा त्यांच्या ठायी राजाविषयी पूज्यबुद्धी उत्पन्न झाली; कारण न्यायनिवाडा करण्याचे दैवी ज्ञान त्याच्या ठायी आहे हे त्यांना दिसून आले.

सध्या निवडलेले:

१ राजे 3: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन