१ राजे 20
20
अहाब अराम्यांचा पराभव करतो
1अरामाचा राजा बेन-हदाद ह्याने आपली सारी सेना एकवट केली; त्याच्याबरोबर बत्तीस राजे, घोडे व रथ होते; त्यांसह तो गेला; आणि शोमरोनास वेढा घालून त्याच्याशी लढला.
2त्याने इस्राएलाचा राजा अहाब ह्याला नगरात जासूदाच्या द्वारे येणेप्रमाणे सांगून पाठवले : “बेन-हदाद म्हणतो की,
3‘तुझे सोने व चांदी ही माझी आहेत, तुझ्या स्त्रिया व मुले ह्यांपैकी जी उत्तम असतील ती सर्व माझी आहेत.”’
4इस्राएलाच्या राजाने उत्तर पाठवले, “माझे स्वामीराज, आपल्या म्हणण्याप्रमाणे मी आपला व माझे सर्वस्वही आपलेच आहे.”
5जासुदांनी पुन्हा येऊन त्याला सांगितले, “बेन-हदाद असे म्हणतो, ‘आपले सोने, रुपे, स्त्रिया व मुले तुला माझ्या स्वाधीन करावी लागतील असे मी तुला सांगून पाठवले होते;
6पण उद्या ह्याच वेळी मी आपले चाकर तुझ्याकडे पाठवणार आहे, ते तुझे घर व तुझ्या चाकरांची घरे धुंडाळतील आणि तुझ्या दृष्टीने जे जे काही तुला प्रिय असेल ते ते हस्तगत करून नेतील.”
7तेव्हा इस्राएलाचा राजा देशातील सर्व वडील जनांना बोलावून आणून म्हणाला, “पाहा, हा मनुष्य माझे कसे अनिष्ट करू पाहत आहे; माझ्या स्त्रिया, मुले, सोने व रुपे हस्तगत करण्यासाठी त्याने माझ्याकडे मनुष्य पाठवला तेव्हा मी नाही म्हटले नाही.”
8सर्व वडील मंडळी व इतर लोक ह्यांनी त्याला सांगितले, “आपण त्याचे म्हणणे ऐकू नका, त्याला संमती देऊ नका.”
9ह्यावरून राजाने बेन-हदादाच्या जासुदांना म्हटले, “माझ्या स्वामीराजांना सांगा, आपण पहिल्याने जे काही सांगून पाठवले ते सगळे करण्यास मी कबूल आहे, पण हे माझ्याने व्हायचे नाही.” ते जासूद माघारी गेले आणि पुन्हा निरोप घेऊन आले.
10बेन-हदादाने परत असा निरोप पाठवला की, “शोमरोनाची धूळ माझ्याबरोबरच्या लोकांना एकेक पसा पुरली तर देव माझे तसेच, किंबहुना त्याहूनही अधिक करोत.”
11इस्राएलाच्या राजाने त्यांना उत्तर पाठवले, “युद्धासाठी कंबर बांधणार्याने युद्ध करून कंबर सोडणार्याप्रमाणे फुशारकी मारू नये.”
12हा निरोप बेन-हदादास मिळाला त्या वेळी तो व इतर राजे डेर्यांमध्ये पीत बसले होते; तो आपल्या सैनिकांना म्हणाला, “व्यूह रचा.” तेव्हा त्यांनी नगरापुढे व्यूह रचला.
13तेव्हा इस्राएलाचा राजा अहाब ह्याच्याकडे एक संदेष्टा येऊन म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, हा सगळा मोठा समुदाय तुला दिसतो आहे ना? पाहा, तो सर्व आज मी तुझ्या हाती देईन; मी परमेश्वर आहे ह्याची तुला जाणीव होईल.”
14अहाबाने विचारले, “कोणाच्या हस्ते?” तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो प्रांताधिकार्यांच्या पदरी असलेल्या माणसांच्या हस्ते.” त्याने विचारले, “लढाईस आरंभ कोण करणार?” तो म्हणाला, “तूच.”
15मग त्याने प्रांताधिकार्यांच्या पदरी असलेल्या माणसांची मोजदाद केली, ते दोनशे बत्तीस भरले; त्यांच्यानंतर एकंदर इस्राएल लोकांची मोजदाद केली, ते सात हजार भरले.
16ते भर दोन प्रहरी चाल करून गेले. त्या प्रसंगी बेन-हदाद व त्याच्या कुमकेस आलेले बत्तीस राजे डेर्यांमध्ये पिऊन मस्त होत होते.
17प्रांताधिकार्यांच्या पदरची माणसे प्रथम बाहेर पडली; बेन-हदादाने हेर पाठवले व त्यांनी परत येऊन खबर दिली की, “शोमरोनातून काही माणसे बाहेर पडली आहेत.”
18त्याने सांगितले की, “ती सल्ला करण्यास येत असली तरी त्यांना जिवंत पकडा आणि लढाई करण्यास येत असली तरी त्यांना जिवंत पकडा.”
19प्रांताधिकार्यांच्या पदरचे ते लोक नगरातून बाहेर पडले व त्यांच्या पाठोपाठ सेना बाहेर पडली.
20एकेका माणसाने एकेका माणसाचा समाचार घेतला; तेव्हा अरामी लोक पळत सुटले आणि इस्राएल लोक त्यांच्या पाठीस लागले; अरामाचा राजा बेन-हदाद हा आपल्या घोड्यावर स्वार होऊन काही घोडेस्वारांनिशी निसटला.
21इस्राएलांच्या राजाने बाहेर पडून घोडे व रथ ह्यांवर मारा करून अराम्यांची मोठी कत्तल उडवली.
22मग तो संदेष्टा इस्राएलाच्या राजाकडे येऊन म्हणाला, “तू आपली मजबुती कर, सावध राहा, जपून वाग; नवे वर्ष लागताच अरामाचा राजा पुन्हा तुझ्यावर स्वारी करील.”
अरामाचा पुन्हा पराभव
23अरामाच्या राजाचे सेवक त्याला म्हणाले, “त्यांचे देव पहाडी देव आहेत; म्हणूनच ते आमच्यावर प्रबळ झाले; तर आता सपाटीवर आपण त्यांच्याशी युद्ध करू म्हणजे आपण खातरीने त्यांच्यावर प्रबळ होऊ.
24आता एवढे मात्र करा, राजांना काढून टाका, प्रत्येकाला त्याच्या जागेवरून दूर करा; आणि त्यांच्या जागी सुभेदार नेमा;
25आणि आपले जे सैन्य जायबंदी झाले तेवढ्याची घोड्यास घोडा, रथास रथ अशी भरती करा; मग आपण सपाटीवर त्यांच्याशी युद्ध करू व आपण त्यांच्यावर खातरीने प्रबळ होऊ.” त्यांची ही मसलत मान्य करून बेन-हदादाने तसे केले.
26नवीन वर्ष लागताच बेन-हदाद अरामी लोक एकवट करून इस्राएलाशी लढण्यासाठी अफेक येथे गेला.
27इकडे इस्राएल लोकही एकवट होऊन व अन्नसामग्रीचा पुरवठा करून त्यांच्याशी सामना करायला गेले; इस्राएल लोकांनी त्यांच्यासमोर तळ दिला; ते बकर्यांच्या दोन कळपांसारखे भासले, पण अरामी लोकांनी देश व्यापून टाकला.
28तेव्हा देवाच्या माणसाने इस्राएलाच्या राजाकडे जाऊन सांगितले, “परमेश्वर असे म्हणतो, ‘परमेश्वर हा पहाडी देव आहे, तळवटीचा देव नाही’ असे अरामी लोक म्हणाले आहेत, ह्यास्तव हा सर्व मोठा समुदाय मी तुझ्या हाती देतो; मग मी परमेश्वर आहे अशी तुम्हांला जाणीव होईल.”’
29सात दिवस ते एकमेकांसमोर तळ देऊन राहिले; सातव्या दिवशी लढाई सुरू झाली; तेव्हा इस्राएल लोकांनी एका दिवसात एक लक्ष अरामी पायदळाचा संहार केला.
30उरलेले लोक अफेक शहराकडे पळून जाऊन त्यात शिरले; तेव्हा शहराचा तट कोसळून त्यांच्यातल्या सत्तावीस हजार लोकांवर पडला. बेन-हदादही पळून व नगरातल्या एका घरातल्या आतल्या खोलीत लपून राहिला.
31त्याचे सेवक त्याला म्हणाले, “पाहा, आम्ही असे ऐकतो की इस्राएल घराण्याचे राजे दयाळू असतात; तर आमच्या कंबरांना गोणपाट गुंडाळून व गळ्यांत दोर्या बांधून आम्हांला इस्राएलाच्या राजाकडे जाऊ द्या; तो कदाचित आपला प्राण वाचवील.”
32त्याप्रमाणे ते कंबरांना गोणपाट गुंडाळून व गळ्यांत दोर्या बांधून इस्राएलाच्या राजाकडे जाऊन म्हणाले, “आपला दास बेन-हदाद म्हणतो, मला जीवदान द्यावे.” राजा म्हणाला, “तो अजून जिवंत आहे काय? तो तर माझा बंधू आहे.”
33हा शुभशकुन समजून त्यांनी त्याच्या मनात काय आहे ते समजण्यासाठी त्याचे शब्द चटकन झेलून म्हटले, “आपला बंधू बेन-हदाद!” राजा त्यांना म्हणाला, “जा, त्याला घेऊन या.” बेन-हदाद त्याच्याकडे आल्यावर त्याने त्याला आपल्या रथात घेतले.
34बेन-हदाद त्याला म्हणाला, “जी नगरे माझ्या बापाने आपल्या बापापासून घेतली ती मी परत देतो; माझ्या बापाने शोमरोनात पेठा वसवल्या तशाच आपणही दिमिष्कात आपल्या नावाच्या पेठा वसवा;” अहाब म्हणाला, “ह्या शर्तींवर तुला सोडून देतो,” त्याने बेन-हदादाशी करारमदार करून त्याला सोडून दिले.
बेन-हदादाला सोडल्याबद्दल अहाबाला शिक्षा
35त्यानंतर संदेष्ट्यांच्या शिष्यांपैकी एक जण परमेश्वराच्या स्फूर्तीने आपल्या सोबत्याला म्हणाला, “मला मार.” पण तो मनुष्य त्याला मारायला कबूल होईना.
36मग तो त्याला म्हणाला, “तू परमेश्वराचे वचन मानले नाहीस तर पाहा, माझ्याकडून तू जाताच सिंह तुला मारून टाकील.” तो त्याच्याकडून जाताच त्याला एका सिंहाने गाठून फाडून टाकले.
37त्या शिष्याला दुसरा मनुष्य भेटला; त्याला तो म्हणाला, “मला मार.” त्या मनुष्याने त्याला मारून घायाळ केले.
38मग तो संदेष्टा चालता झाला, आणि आपले डोके पागोट्याच्या पदराने झाकून राजाची मार्गप्रतीक्षा करीत रस्त्यात उभा राहिला.
39राजा जवळून जात असताना त्याने त्याला हाक मारून म्हटले, “आपला सेवक रणभूमीवर गेला होता तेव्हा एक मनुष्य दुसर्या एका मनुष्याला घेऊन माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘ह्या मनुष्याला सांभाळ; जर का हा नाहीसा झाला तर तुझा जीव त्याच्या जिवाचा मोबदला होईल, नाहीतर तुला शंभर रत्तल रुपे दंड होईल.’
40आपला सेवक इकडे तिकडे कामात गुंतला असता तो निसटून गेला.” इस्राएलाच्या राजाने त्याला म्हटले, “तोच तुझा न्याय; तू आपल्याच तोंडाने निर्णय केलास.”
41त्या संदेष्ट्याने आपल्या डोक्यांवरचा पागोट्याचा पदर चटकन काढला; तेव्हा हा कोणी संदेष्टा आहे असे इस्राएलाच्या राजाने ओळखले.
42तो राजाला म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ज्या मनुष्याचा नाश मी योजला होता तो मनुष्य तू आपल्या हातचा जाऊ दिलास तर त्याच्या प्राणाबद्दल तुझा प्राण जाईल व त्याच्या लोकांबद्दल तुझे लोक जातील.”
43मग इस्राएलाचा राजा उदास व खिन्न होऊन शोमरोनास आपल्या घरी गेला.
सध्या निवडलेले:
१ राजे 20: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.