YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 18:20-40

१ राजे 18:20-40 MARVBSI

तेव्हा अहाबाने सर्व इस्राएल लोकांना बोलावणे पाठवले आणि संदेष्ट्यांना कर्मेल डोंगरावर जमवले. एलीया सर्व लोकांच्या सन्निध येऊन म्हणाला, “तुम्ही दोन्ही मतांमध्ये कोठवर लटपटाल? परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा; बआल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा.” लोकांनी त्याला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. एलीया लोकांना म्हणाला, “परमेश्वराच्या संदेष्ट्यांपैकी मी एकटाच उरलो आहे; बआलाचे संदेष्टे तर साडेचारशे आहेत. आम्हांला दोन गोर्‍हे द्यावेत; त्यांनी आपल्यासाठी वाटेल तो गोर्‍हा घ्यावा; त्याचे त्यांनी कापून तुकडे करावेत आणि ते लाकडांवर रचावेत, पण त्यांना अग्नी लावू नये; मग मीही दुसर्‍या गोर्‍ह्याचे तसेच करून तो लाकडांवर रचीन व त्याला अग्नी लावणार नाही. तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या आणि मी परमेश्वराचे नाव घेतो; जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा.” सर्व लोक म्हणाले, “ठीक आहे.” एलीया बआलाच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “प्रथम तुम्ही वाटेल तो गोर्‍हा निवडून सिद्ध करा, कारण तुम्ही पुष्कळ जण आहात, तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या, पण अग्नी मात्र लावू नका.” मग त्यांना दिलेला गोर्‍हा त्यांनी सिद्ध केला आणि सकाळपासून थेट दोन प्रहरपर्यंत ते बआलाचे नाव घेत, “हे बआला, आमचे ऐक,” असे म्हणत राहिले; पण काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही. जी वेदी त्यांनी केली होती तिच्याभोवती ते नाचूबागडू लागले. दोन प्रहरी एलीयाने त्यांची थट्टा करून म्हटले, “मोठ्याने पुकारा, देवच तो! तो विचारात गढून गेला असेल, तो एकान्तात गेला असेल, प्रवासात असेल, कदाचित तो निजला असेल, त्याला जागे केले पाहिजे.” ते मोठमोठ्याने हाका मारू लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे सुर्‍यांनी व भाल्यांनी आपल्याला घाव करून घेऊ लागले, एवढे की ते रक्तबंबाळ झाले. दुपार टळून गेल्यावर संध्याकाळच्या यज्ञसमयापर्यंत ते बडबडत राहिले पण काही वाणी झाली नाही, कोणी उत्तर दिले नाही किंवा लक्ष पुरवले नाही. मग एलीया सर्व लोकांना म्हणाला, “माझ्याजवळ या”; तेव्हा सर्व लोक त्याच्याजवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती ती त्याने दुरुस्त केली. ‘तुझे इस्राएल असे नाव पडेल’ असे याकोबाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते, त्याच्या वंशसंख्येइतके बारा धोंडे एलीयाने घेतले; त्या धोंड्यांची त्याने परमेश्वराच्या नावाने वेदी बांधली; आणि दोन मापे बी राहील एवढी खळगी त्याने वेदीसभोवार खणली. त्याने वेदीवर लाकडे ठेवली आणि गोर्‍हा कापून व तुकडे करून ते लाकडांवर रचले. मग तो म्हणाला, “चार घागरी पाणी भरून होमबलीवर व लाकडांवर ओता.” तो पुन्हा म्हणाला, “दुसर्‍यांदा तसेच करा”; तेव्हा लोकांनी दुसर्‍यांदा तसेच केले. तो म्हणाला, “तिसर्‍यांदा तसेच करा”; आणि त्यांनी तिसर्‍यांदा तसेच केले. पाणी वेदीवरून सभोवार वाहिले, आणि ती खळगीही पाण्याने भरली. संध्याकाळच्या यज्ञसमयी एलीया संदेष्टा पुढे होऊन म्हणाला, “हे परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांच्या देवा, इस्राएलामध्ये तूच देव आहेस, मी तुझा सेवक आहे, आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत हे सर्वांना कळू दे. हे परमेश्वरा, ऐक, माझी विनंती ऐक; हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच ह्यांची हृदये मागे फिरवली आहेस, ह्याची ह्या लोकांना जाणीव होऊ दे.” तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटले. हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, “परमेश्वर हाच देव! परमेश्वर हाच देव!” एलीया त्यांना म्हणाला, “बआलाच्या संदेष्ट्यांना पकडा; त्यांच्यातल्या एकालाही निसटून जाऊ देऊ नका.” तेव्हा त्यांनी त्यांना पकडले; एलीयाने त्यांना खाली किशोन ओहळानजीक आणून वधले.